१४ लाखांचा कृषी महोत्सव नेमका कुणासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:58 PM2018-02-22T23:58:17+5:302018-02-22T23:58:54+5:30

कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय जिल्हा कृषी व पलास महोत्सव नुकतेच पार पडले. महोत्सवाच्या दिमाखदार आयोजनासाठी कृषी विभागाने कुठलीही कसर सोडली नाही.

14 lacs for agriculture festival? | १४ लाखांचा कृषी महोत्सव नेमका कुणासाठी ?

१४ लाखांचा कृषी महोत्सव नेमका कुणासाठी ?

Next
ठळक मुद्देपाच दिवसात पाच हजार शेतकऱ्यांची भेट नाही : ढिसाळ नियोजनाचा फटका

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय जिल्हा कृषी व पलास महोत्सव नुकतेच पार पडले. महोत्सवाच्या दिमाखदार आयोजनासाठी कृषी विभागाने कुठलीही कसर सोडली नाही. यासाठी पाच दहा नव्हे तर तब्बल १४ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. ज्या शेतकऱ्यांसाठी हा महोत्सव आयोजित केला होता, तो शेतकरीच या महोत्सवात कुठे आढळला नाही. त्यामुळे नेमका हा महोत्सव शेतकऱ्यांचा होता की केवळ कृषी विभागाचा हे समजायला मार्ग नाही.
जिल्ह्यातील शेतकरी मागील दोन तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. हवामान बदलाचा शेतीवर झपाट्याने परिणाम होत आहे. त्यामुळे पिकांचा पॅटर्न बदलण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. एकंदरीत या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी गोंधळाच्या स्थिती असून त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठीच जिल्हा कृषी विभागाने कृषी महोत्सवाचे आयोजन केले असावे. असा समज जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचा होता. कृषी विभागाने पाच दिवसीय कृषी महोत्सवावर तब्बल १४ लाखांच्या खर्चाचे नियोजन केले. येथील क्रीडा संकुलाच्या भव्य पटागंणावर तीन ते चार मोठे डोम उभारण्यात आले. त्या महिला बचत गटांना २०० स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र सुदैवाने त्यापैकी ४० ते ५० स्टॉल रिकामेच होते. जे काही स्टॉल महोत्सव स्थळी लागले होते. त्यात खाद्य पदार्थ आणि सौंदर्य प्रसाधनाचेच स्टॉल अधिक होते.
त्यामुळे हा खाद्य की कृषी महोत्सव हे समजण्यास मार्ग नाही. मोजक्या दोन तीन शेतकºयांच्या स्टॉल शिवाय एकाही स्टॉलवर कृषी विषयक माहिती व प्रयोग आढळले नाही. कृषी उपयोगी ट्रॅक्टरच्या साहित्याशिवाय कुठल्याच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणारा स्टॉल आढळला नाही. जिल्ह्यातील प्रगतिशिल शेतकऱ्यांचा या महोत्सवात कुठेच वावर दिसला नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत महोत्सवाची माहिती पोहचली की नाही यावर प्रश्न चिन्ह आहे.
महोत्सवस्थळी शेतकऱ्यांना कृषी विषयक मार्गदर्शन करण्यासाठी मोठे डोमे व मंच उभारण्यात आले होते. मात्र यात मार्गदर्शकाचा अभाव होताच शिवाय डोममध्ये शेतकऱ्यांपेक्षा रिकाम्या खुर्च्यांची संख्या अधीक होती.
कृषी विभागाचे अधिकारी वगळता या डोममध्ये शेतकरी भटकलेच नाही. महोत्सवस्थळी गर्दी भासविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी आणि त्यांचे अधिनस्त कर्मचारी स्टॉल बाहेर व डोममध्ये खुर्च्यांवर बसून होते. त्यामुळे हा कृषी महोत्सव नेमका शेतकऱ्यांसाठीच होता की कृषी विभागासाठी असा प्रश्न निर्माण होतो. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी म्हणून हे भव्य कृषी महोत्सव आयोजित केल्याचे या विभागाचे अधिकारी सांगतात. मात्र पाच दिवसीय महोत्सवात शेतकरी अभावानेच आढळला. त्यामुळे कृषी विभागाने नेमके या महोत्सवाने काय साधले असा सवाल उपस्थित केला जात आहे. कृषी महोत्सवाच्या निमित्ताने कृषी विभागाचा ढिसाळ कारभार आणि नियोजन अभाव या निमित्ताने पुढे आला.
प्रगतीशिल शेतकऱ्यांची पाठ
जिल्ह्यात प्रगतीशिल शेतकऱ्यांची संख्या कमी नाही. मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रमात सुध्दा पाच ते सहा प्रगतीशील शेतकºयांचा सत्कार करण्यात आले. शिवाय या शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगानी उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना सुध्दा भूरळ घातली. त्यामुळे त्यांनी या शेतकऱ्यांना उत्तर प्रदेशात येण्याचे निमंत्रण दिले. मात्र कृषी विभाग या शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यात अपयशी ठरला. त्यामुळेच प्रगतीशिल शेतकऱ्यांनी या महोत्सवाकडे पाठ दाखविल्याचे बोलले जाते.
शहरात जनजागृती
जिल्ह्यात अडीच लाखावर शेतकरी आहेत. ग्रामीण भागातच शेतकरी मोठ्या प्रमाणात राहतात. मात्र कृषी विभागाने कृषी महोत्सवाची जनजागृती शहरात अधिक केली तर ग्रामीण भागात माहितीच पोहचली नाही.त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना महोत्सवाची माहिती वर्तमान पत्रात बातम्या आल्यानंतरच मिळाली. शेतकरी ग्रामीण भागात अन जनजागृती शहरात असेच चित्र होते.
पाच हजारही शेतकऱ्यांची भेट नाही
कृषी महोत्सवाला पाच दिवसात पाच हजारही शेतकऱ्यांनी भेट दिली नाही. कृषी महोत्सवाला भेट देणाऱ्या सर्वच नागरिकांची शेतकरी म्हणून नोंद केल्यानंतरही हा आकडा चार ते चाडेचार हजारपर्यंत पोहचला नाही. त्यामुळे १४ लाखांचा कृषी महोत्सव घेवून कृषी विभागाने नेमके काय साध्य केले याच उत्तर केवळ याच विभागाकडे असू शकते.
महोत्सव स्थळाची निवड चुकली
कृषी विभागाने कृषी महोत्सवाचे आयोजन शहराबाहेर असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल परिसरात ठेवले. त्यामुळे रेल्वेने कृषी महोत्सवासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना या स्थळापर्यंत पोहचण्यासाठी आॅटो करून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी महोत्सवस्थळी न जाणेच पसंत केले.
वाहने लावूनही गर्दी वाढविण्यात अपयश
सुरूवातीच्या तीन दिवसात कृषी महोत्सवाकडे शेतकरी भटकले नाही. त्यामुळे कृषी महोत्सव फसल्याचा संदेश जाऊ नये यासाठी कृषी विभागाने स्वत:च्या विभागाचे वाहने लावून ग्रामीण भागातून शेतकऱ्यांना आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला देखील प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी वाहने लावून गर्दी वाढविण्यात या विभागाला अपयश आले.

Web Title: 14 lacs for agriculture festival?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.