या राज्यात अजूनही 85 टक्के गावांतील लोक बसतात उघड्यावर शौचास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 03:43 PM2018-11-23T15:43:59+5:302018-11-23T15:44:06+5:30

आरोग्य आणि शिक्षण सुविधा या दोन माध्यमांमध्ये गोव्याने प्रगती केली आहे, असे जरी सांगण्यात येत असले तरी गोव्यातील गावांची स्थिती वेगळीच असल्याचे अंत्योदय योजनेच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

In this state, 85 percent of villages are still open toilet in the villages | या राज्यात अजूनही 85 टक्के गावांतील लोक बसतात उघड्यावर शौचास

या राज्यात अजूनही 85 टक्के गावांतील लोक बसतात उघड्यावर शौचास

Next

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव: आरोग्य आणि शिक्षण सुविधा या दोन माध्यमांमध्ये गोव्याने प्रगती केली आहे, असे जरी सांगण्यात येत असले तरी गोव्यातील गावांची स्थिती वेगळीच असल्याचे अंत्योदय योजनेच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. गोव्यातील 85 टक्के गाव अजूनही उघड्यावर शौच करण्यापासून मुक्त झालेले नाहीत. तर 84 टक्के गावात शुश्रृषालयाची सोय नसल्याचे उघड झाले आहे. एवढेच नव्हे तर केवळ 12 टक्के गावातच व्यावसायिक प्रशिक्षण देण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत.

अंत्योदय योजनेखाली ग्रामीण विकास मंत्रालयाने देशभरातील 1,10,765 गावांचे सर्वेक्षण केले आहे. त्यात गोव्यातील 384 गावांचा समावेश होता. वीज, पाणी, दूरसंचार यंत्रणा, रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक याबाबतीत गोव्यातील गावांची स्थिती उत्तम असली तरी शेतकी सुविधांच्या बाबतीत गोव्यातील गाव बरेच मागास असल्याचेही उघडकीस आले आहे. गोव्यातील केवळ 9 गावातच माती परीक्षण केंद्रे उपलब्ध असून, 15 गावांमध्ये बियाणांची केंद्रे तर 38 गावामध्ये खतांची दुकाने उपलब्ध असल्याचे या सर्वेक्षणातून माहिती पुढे आली आहे.

या योजनेखाली गोव्यातील 186 ग्रामपंचायतींच्या खाली येणाऱ्या गावांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, या गावात असलेल्या सुविधेप्रमाणे त्यांना गुण देण्यात आले होते. गोव्यातील एकाही गावाला 80 पेक्षा जास्त गुण मिळालेले नसून 70 ते 80 या गुण मर्यादेत सहा, 60 ते 70 या गुण मर्यादित 52, तर 50 ते 60 या गुण मर्यादेत 79 गावांचा समावेश आहे. गोव्यात सर्वाधिक गुण कांदोळी (79) या पंचायतीला प्राप्त झाले असून, राष्ट्रीय क्रमवारीत या गावाला 22 वे स्थान मिळाले आहे. तर सर्वात कमी गुण सत्तरी भागातील केरी (29) या पंचायतीला प्राप्त झाले असून, राष्ट्रीय क्रमवारीत या गावाचा क्रमांक 72 वा आहे.

गोव्यातील उत्कृष्ट पाच पंचायतींमध्ये कांदोळी नंतर फोंड्यातील कवळे, सासष्टीतील राय तसेच फोंड्यातील तिवरे-वरगाव व बांदोडा यांचा समावेश होत असून राष्ट्रीय क्रमवारीत या पंचायतींचे स्थान अनुक्रमे 23, 26, 27 व 30 असे आहे. तर निकृष्ट पाच पंचायतींमध्ये सत्तरीतील केरी व सावर्डे, सांगेतील काले, बार्देसातील नादोरा तर केपेतील कावरे या पंचायतींचा समावेश आहे. या पंचायतींचा राष्ट्रीय स्तरावरील क्रमांक अनुक्रमे 72, 70, 69, 67 व 66 असे आहेत. राष्ट्रीय पातळीवरील चित्र पहाता आंध्रप्रदेश, केरळ व तामिळनाडू या तीन राज्यांनी आघाडी घेतली असून तळांच्या राज्यांमध्ये छत्तीसगड व बिहार यांचा समावेश होत आहे. ग्रामपातळीवरील साधनसुविधा आणि मानवविकास व आर्थिक विकास या गुणनिकषावर हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
 

Web Title: In this state, 85 percent of villages are still open toilet in the villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.