पाटणेकर विजयी, राणे पराभूत, चर्चिल अनुपस्थित, ढवळीकरांचे मत काँग्रेसला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 04:40 PM2019-06-04T16:40:11+5:302019-06-04T16:47:55+5:30

सभापतींच्या निवडीसाठी एक दिवसाचे विधानसभा अधिवेशन मंगळवारी बोलविण्यात आले होते.

Rajesh Patenkar wins, Rane defeats, Churchill absent, Dhawlikar vote for Congress | पाटणेकर विजयी, राणे पराभूत, चर्चिल अनुपस्थित, ढवळीकरांचे मत काँग्रेसला

पाटणेकर विजयी, राणे पराभूत, चर्चिल अनुपस्थित, ढवळीकरांचे मत काँग्रेसला

Next

 

पणजी : विधानसभेच्या सभापतीपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीवेळी अपेक्षेप्रमाणे डिचोलीचे भाजप आमदार राजेश पाटणेकर हे जिंकले. पाटणेकर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंग राणे यांचा 22 विरुद्ध 16 मतांच्या फरकाने पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आमदार सभागृहात आलेच नाही तर मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी प्रथमच सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मत दिले.

सभापतींच्या निवडीसाठी एक दिवसाचे विधानसभा अधिवेशन मंगळवारी बोलविण्यात आले होते. निवड प्रक्रियेवेळी कार्यकारी सभापती या नात्याने उपसभापती मायकल लोबो यांनी सभापतींचे स्थान भुषविले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीचे उमेदवार म्हणून पाटणेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. विरोधकांचे उमेदवार म्हणून पर्येचे आमदार राणे यांनी उमेदवारी सादर केली होती. जे भाजप उमेदवारासाठी ठरावाच्या बाजूने आहेत, त्यांनी उभे राहून आपला पाठिंबा दाखवून द्यावा, असे सभापती लोबो यांनी सांगितले. त्यावेळी भाजपच्या आमदारांसह, गोवा फॉरवर्डचे आमदार व अपक्ष तीन आमदार उभे राहिले.

फक्त कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांना उभे न राहता जागेवर बसूनच हात वर करावा अशी मुभा सभापतींनी दिली होती. त्यानुसार मडकईकर यांनी पाटणेकर यांना पाठिंबा देताना हात वर केला. मडकईकर हे अजुनही खूप हळू चालतात. ते आले व त्यांनी सभागृहात दाराच्या बाजूलाच असलेल्या खुर्चीवर जागा घेतली. ही खुर्ची वास्तविक म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांच्यासाठी होती. जोशुआ यांना उठविले गेले, दुसरी खुर्ची म्हणजे मडकईकर पूर्वी जिथे बसायचे ती खुर्ची दिली गेली.

पाटणेकर यांना बावीस मते मिळाल्याचे लोबो यांनी जाहीर केले. सत्ताधारी आघाडीकडे तेवीस आमदारांचे संख्याबळ असले तरी, लोबो हे सभापती या नात्याने मत देऊ शकले नाहीत. राणे यांच्या उमेदवारीचा ठराव मतदानाला टाकला गेला तेव्हा सोळा आमदार उभे राहिले. काँग्रेसचे पंधरा व मगोपचा एक असे मिळून सोळा मते राणे यांना प्राप्त झाली. लोबो यांनी पाटणेकर यांना नवे सभापती म्हणून जाहीर केले. मुख्यमंत्री सावंत व विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी हात देऊन पाटणेकर यांना मोठ्या सन्मानाने सभापतींच्या खुर्चीवर बसवले. मुख्यमंत्र्यांसह कवळेकर, राणे, माविन गुदिन्हो, बाबू आजगावकर, सुदिन ढवळीकर आदींनी पाटणेकर यांचे अभिनंदन करणारी भाषणे केली.

डिचोलीचा गौरव : सावंत 
डिचोली तालुक्यातील सर्व तिन्ही मतदारसंघांच्या आमदारांना सभापती होण्याचा मान मिळाला आहे. पाटणेकर हे गोड बोलणारे आमदार आहेत. त्यांनी सर्वांना समान न्याय द्यावा. यापूर्वी मयेचे अनंत शेट सभापती होते. मग मी साखळीचा आमदार या नात्याने सभापती झालो व आता डिचोलीचे आमदार सभापती झाले ही गौरवास्पद गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले व त्यांनी पाटणेकर यांचे अभिनंदन केले. कवळेकर यांनीही पाटणेकर यांचे अभिनंदन केले. आम्ही सभापतीपदाची निवडणूक खूप गंभीरपणे घेतली व त्यामुळेच राणे यांना रिंगणात उतरविले होते. आम्हाला या निवडणुकीचे महत्त्व ठाऊक होते. सभापतींनी सर्व सदस्यांना समान न्याय द्यावा, अशी अपेक्षा कवळेकर यांनी व्यक्त केली.

अपात्रता याचिका निकाली काढीन 
आपण सर्वाना न्याय देईन. आपण पूर्णपणे निपक्षपाती वागण्याचा प्रयत्न करीन. आपल्याला सभापतींचा सन्मान प्राप्त झाल्याविषयी खूप आनंद वाटतो, असे पाटणेकर म्हणाले. तसेच यावेळी आपल्याला स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांची खूप आठवण होते. सभागृहात पर्रीकर यांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे. ते विरोधकांच्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण पद्धतीने उत्तरे द्यायचे. त्यासाठी योग्य आकडेवारी वगैरे सादर करायचे. त्यांची ती स्टाईल विधिमंडळ कामकाजाची मजा वाढवत असे, असे पाटणेकर म्हणाले. विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर पाटणेकर यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. आपल्याकडे काही आमदारांविरुद्ध ज्या अपात्रता याचिका आहेत, त्या याचिकांचा आपण अभ्यास करीन. आपण संबंधित अधिकारी व अन्य घटकांशी चर्चा करीन आणि मगच या याचिकांवर शक्य तेवढय़ा लवकर निवाडा देऊन त्या निकालात काढीन, असे पाटणेकर यांनी सांगितले. 

Web Title: Rajesh Patenkar wins, Rane defeats, Churchill absent, Dhawlikar vote for Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा