कुंकळ्ळीतील अग्निशमन दलाची गरज पुन्हा एकदा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 06:12 PM2019-02-08T18:12:43+5:302019-02-08T18:19:18+5:30

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत काही धोकादायक कारखाने असल्याने या भागात अग्निशमन दलाचे केंद्र सुरू करणे अत्यावश्यक असल्याची ओरड करुन कुंकळ्ळीवासियांचा घसा कोरडा पडला तरीही अजुन या भागात केंद्र सुरू झालेले नाही.

need fire brigade in Cuncolim goa | कुंकळ्ळीतील अग्निशमन दलाची गरज पुन्हा एकदा ऐरणीवर

कुंकळ्ळीतील अग्निशमन दलाची गरज पुन्हा एकदा ऐरणीवर

googlenewsNext
ठळक मुद्देकुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत काही धोकादायक कारखाने असल्याने या भागात अग्निशमन दलाचे केंद्र सुरू करणे अत्यावश्यक आहे.शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीत जॉन फर्नांडीस यांच्या मालकीचा फायबर बोट बनवण्याचा कारखाना जळून खाक झाला. कुंकळ्ळीत अशी कुठलीही दुर्घटना घडल्यास आग विझविण्याचे बंब मडगाव अथवा कुडचडे येथून आणावे लागतात.

सुशांत कुंकळयेकर

कुंकळ्ळी - कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत काही धोकादायक कारखाने असल्याने या भागात अग्निशमन दलाचे केंद्र सुरू करणे अत्यावश्यक असल्याची ओरड करुन कुंकळ्ळीवासियांचा घसा कोरडा पडला तरीही अजुन या भागात केंद्र सुरू झालेले नाही. शुक्रवारी या औद्योगिक वसाहतीत झालेल्या आगीच्या दुघर्टनेमुळे ही मागणी किती रास्त होती त्याचा प्रत्यय आला. या दुर्घटनेमुळे कुंकळ्ळीतील अग्निशमन दलाच्या केंद्राचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीत जॉन फर्नांडीस यांच्या मालकीचा फायबर बोट बनवण्याचा कारखाना जळून खाक झाला. ही आग अन्य कारखान्यातही पसरण्याची भीती होती. मात्र सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ही आग दुसरीकडे पसरू शकली नाही असे जरी असले तरी आग विझवण्याचे बंब वेळेवर न पोहचल्याने या कारखान्यातील झालेलं नुकसान मात्र ते थांबवू शकले नाहीत.

आगीची घटना घडल्यानंतर तब्बल अर्धा तासाने आगीचे बंब घटनास्थळी पोहचले. त्यामुळेच तत्परतेने आग आटोक्यात येऊ शकली नाही. यासंबंधी चिंता व्यक्त करताना कुंकळ्ळीचे नागरिक रेझन आल्मेदा म्हणाले, कुंकळ्ळीत अशी कुठलीही दुर्घटना घडल्यास आग विझविण्याचे बंब मडगाव अथवा कुडचडे येथून आणावे लागतात. ही दोन्ही केंद्रे कुंकळ्ळीपासून १८ कि.मी. अंतरावर असल्याने कितीही वेगाने ती हाकली तरी घटनास्थळी पोहचण्यासाठी किमान अर्धा ते पाऊण तास लागतोच.

तीन वर्षापूर्वी याच औद्योगिक वसाहतीत ग्लोबल इस्पात या लोखंडी सळ्या बनवण्याच्या कारखान्यातील बॉयलरचा स्फोट होऊन ५ कामगारांना जळून मृत्यू आला होता. त्यावेळीही आपत्कालीन यंत्रणा उशीराच पोचली होती. त्यावेळीही अशी व्यवस्था कुंकळ्ळीच्या जवळच असावी अशी मागणी झाली होती अशी माहिती या औद्योगिक वसाहती जवळच राहणारे कमलाक्ष प्रभूगावकर यांनी दिली. प्रभूगावकर म्हणाले, वास्तविक या दुर्घटनेत किमान १० ते १५ कामगारांचा जीव जाण्याची शंका त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती. मात्र अधिकृतरित्या ५ मृतांचीच नावे जाहीर करण्यात आली.

मागची कित्येक वर्षे आम्ही कुंकळ्ळकर अग्निशमन दलाची मागणी करतो आहोत. मात्र शासनाने या मागणीकडे गंभीरपणे लक्ष दिलेले नाही अशी प्रतिक्रिया रेझन आल्मेदा यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, मी स्वत:च मुख्यमंत्र्यांना ४ ते ५ वेळा यासंबंधी पत्रे पाठवली आहेत. मात्र प्रत्येकवेळी तुमच्या मागणीवर आम्ही लक्ष देऊ असे उत्तर देऊन आपली बोळवण केल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले, वास्तविक ज्या ठिकाणी औद्योगिक वसाहत आहे. त्या प्रत्येक ठिकाणी अग्निशमन दल असण्याची नितांत गरज आहे. शुक्रवारच्या घटनेने त्यावर पुन्हा एकदा शिक्का मोर्तब केले आहे.

औद्योगिक वसाहतीतील हायड्रंट चालेना

कुंकळ्ळीच्या औद्योगिक वसाहतीतील आग लागण्याची घटना घडली तर ती विझवण्यासाठी त्वरीत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याच्या हायड्रंटची सोय केली आहे. मात्र हे हायड्रंट चालत नसल्याचे शुक्रवारच्या दुर्घटनेच्या वेळी दिसून आले. ही आग विझवण्यासाठी पाच बंब आणले गेले होते. मात्र एकदा बंबातील पाणी संपल्यावर ते पुन्हा भरण्यासाठी त्यांना जवळपासच्या नदीवर जाण्याची पाळी आली असे या घटनेचे साक्षीदार असलेले कमलाक्ष प्रभूगावकर यांनी सांगितले. वास्तविक हे हायड्रंट चालू अवस्थेत आहेत की नाहीत याची ठराविक कालावधीनंतर वसाहतीतील अधिकाऱ्यांनी पाहणी करायची गरज असल्याचे ते म्हणाले.

गवतही कापले नाही

शुक्रवारी जी आगीची दुर्घटना घडली ती या भागातील रानटी गवताला (करडाला) आग लागल्यामुळेच घडल्याचे सांगण्यात येते. या औद्योगिक वसाहतीत कित्येक प्लॉट्स वापराशिवाय बंद आहेत. या प्लॉट्सची निगराणी कुणी करत नसल्याने तिथे रानटी गवत वाढले आहे. वास्तविक औद्योगिक वसाहतीतर्फे असे वाढलेले गवत कापून टाकण्यात येते. मात्र यंदा ही खबरदारी न घेतल्याने कित्येक प्लॉट्समध्ये असे गवत वाढलेले असून त्यामुळे संपूर्ण वसाहतच धोक्याच्या कक्षेत असल्याचे सांगितले जाते.

Web Title: need fire brigade in Cuncolim goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :firegoaआगगोवा