मडगाव पालिकेची एकूण थकबाकी 100 कोटींच्यावर! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 05:45 PM2018-10-25T17:45:57+5:302018-10-25T17:46:08+5:30

गोव्याची आर्थिक राजधानी मानले गेलेल्या मडगाव शहरातील नगरपालिकेची कर व इतर स्वरुपात येणा-या महसुलाची तब्बल 100 कोटींची थकबाकी अद्यापही बाकी आहे.

Margao Municipal Corporation's total outstanding amount of 100 crore! | मडगाव पालिकेची एकूण थकबाकी 100 कोटींच्यावर! 

मडगाव पालिकेची एकूण थकबाकी 100 कोटींच्यावर! 

Next

- सुशांत कुंकळयेकर 

मडगाव: गोव्याची आर्थिक राजधानी मानले गेलेल्या मडगाव शहरातील नगरपालिकेची कर व इतर स्वरुपात येणा-या महसुलाची तब्बल 100 कोटींची थकबाकी अद्यापही बाकी आहे. गोव्यातील सर्वात मोठी आर्थिक उलाढाल ज्या शहरात होते. त्या मडगावात अजूनही कित्येक दुकाने व्यवसाय परवाना नसतानाही राजरोसपणे चालू असल्याचे दिसून आले आहे.

ही माहिती खुद्द शहराच्या नगराध्यक्ष डॉ. बबिता प्रभुदेसाई यांनीच दिली. त्या म्हणाल्या, मडगावात अजुनही कित्येक आस्थापनांनी घरपट्टी आणि व्यवसाय परवान्याचे शुल्क भरलेले नाही. त्याशिवाय कित्येक दुकानदारांनी आपल्या दुकानात जे अंतर्गत बदल केले त्याचे पैसेही पालिकेच्या तिजोरीत भरलेले नाहीत. हे थकित शुल्क आणि दंडाची रक्कम यांची बेरीज केल्यास ही रक्कम सहज शंभर कोटींच्या घरात जाऊ शकते.

गुरुवारी पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. प्रभुदेसाई यांनी ही माहिती दिली. सध्या मडगाव पालिकेने थकबाकी वसुल करण्यासाठी मोहीम हाती घेतली असून कित्येक थकबाकी न भरलेल्या दुकानांना सीलही ठोकण्यात आले होते. याचा परिणाम म्हणून आतापर्यंत सुमारे 4 कोटींची वसुली पालिकेने केली असून राहिलेली रक्कम वसुल करण्यासाठी हाती घेतलेली मोहीम यापुढेही चालू राहील असे त्यांनी सांगितले.

मडगाव व फातोर्डा या दोन मतदारसंघासह कुडतरी व नावेलीच्या मतदारसंघातील काही भाग मडगाव पालिकेच्या कक्षेखाली येतो. या शहरात सुमारे 25 हजारांच्या वर व्यावसायिक आस्थापने आहेत. मात्र या पैकी निम्म्या आस्थापनांकडे आवश्यक असलेला व्यवसाय परवानाच नसल्याचे पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. मागील कित्येक वर्षे ही आस्थापने असा परवाना नसताना आपला व्यवसाय चालवित आली आहेत.
पालिका मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, मडगावात कित्येकांनी आपली घरे आणि दुकाने दुस-यांना भाड्यांनी दिली आहेत. पालिकेच्या नियमांप्रमाणे वर्षाकाठी एक महिन्याचे भाडे पालिकेत कर म्हणून भरावे लागते. कित्येक दुकानदारांनी मोठय़ा मोठय़ा रकमा आकारुन आपली दुकाने भाडय़ाने दिली असली तरी आजवर या दुकानांचे मालक 1988 साली जो कर भरायचे तोच आतापर्यंत भरत होते. त्यामुळे ही थकबाकी झपाटय़ाने वाढली असे ते म्हणाले. या दुकान मालकांकडून मागील बाकी वसूल करण्यावर आता पालिका भर देणार असे ते म्हणाले.

मिळत असलेल्या माहितीप्रमाणे, आतापर्यंत कित्येक दुकानदार स्थानिक आमदारांशी असलेल्या जवळीकीचा फायदा घेऊन आजवर पालिकेला फसवत आले होते. या पालिकेवर बहुतेकवेळा आमदाराचे वर्चस्व असलेलेच नगरमंडळ निवडून येत असल्यामुळे या फसवणुकीकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र यावेळी प्रथमच फातोर्डाचे आमदार असलेले नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी उभे केलेले पॅनल सत्तेवर आल्यामुळे यावेळी पहिल्यांदाच थकबाकी वसुलीकडे गंभीरपणो पाहिले जात आहे. मडगावातील सर्वात मोठा कमर्शिअल प्रकल्प असलेल्या ओशिया कॉम्प्लेक्स या प्रकल्पातील दुकानदारांकडूनही ब-याच मोठय़ा प्रमाणावर पालिकेला थकबाकी येणे बाकी आहे.

Web Title: Margao Municipal Corporation's total outstanding amount of 100 crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा