व्हाळशी-डिचोलीत लाइनमनचा शॉक लागून मृत्यू, ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांविरोधात उद्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 04:06 PM2024-04-19T16:06:05+5:302024-04-19T16:06:53+5:30

लाइनमनच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वीज खात्याच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला.

Lineman died of shock in Walshi-Dicholi, villagers erupted against the authorities | व्हाळशी-डिचोलीत लाइनमनचा शॉक लागून मृत्यू, ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांविरोधात उद्रेक

व्हाळशी-डिचोलीत लाइनमनचा शॉक लागून मृत्यू, ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांविरोधात उद्रेक

डिचोली : व्हाळशी येथे शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या वीज खांबावर दुरुस्तीच्या कामासाठी चढलेल्या लाइनमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. मनोज वामन जांबावलीकर (३४) असे या दुर्दैवी लाइनमनचे नाव आहे. लाइनमनच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वीज खात्याच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवा आणि कारवाई करा असा आग्रह धरत घटनास्थळावरून मृतदेह उचलण्यास तब्बल दोन तास विरोध दर्शवला. अखेर पोलिसांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावल्यानंतर संतप्त नागरिकांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून बांबोळी येथील गोमेकॉमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

सकाळी साडेअकराच्या सुमाराला ही घटना घडली. येथील रस्त्यालगत असलेल्या एका फिटनेस सेंटरमध्ये विजेचा कमी दाब असल्याची तक्रार आल्याने लाइनमन मनोज जांबावलीकर हे विजेच्या खांबावर चढून दुरुस्ती करीत होते. त्यावेळी विद्युत पुरवठा बंद केल्याचे वीज खात्याचे म्हणणे आहे. मात्र, याचदरम्यान, विजेचा जोरदार धक्का बसल्याने मनोज यांचा खांबावरच मृत्यू झाला. हे पाहताच घटनास्थळी गर्दी जमा झाली. 

दरम्यान, घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान आणि डिचोली पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी खांबावरील मृतदेह खाली उतरवला. मात्र, संतप्त लोकांनी तो मृतदेह जागेवरून हलवू दिला नाही. आधी अधिकाऱ्यांना बोलवा, नंतरच मृतदेह हलवू अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. यावेळी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. मनोज यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

उपलब्ध माहितीनुसार, लाइनमन खांबावर चढला होता, त्यावेळी त्याच्या हातात ग्लोव्हज नव्हते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत वीज खात्याने तसेच सरकारने तातडीने दखल घेऊन कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वर्षभरातील तिसरी घटना

दरम्यान, डिचोली तालुक्यात गेल्या काही वर्षांत घडलेली ही तिसरी घटना आहे. वीज खात्यात कार्यरत लाइनमन,  हेल्पर जीव धोक्यात घालून काम करतात. त्यांना नाहक जीव गमवावा लागतो. आता मनोज यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या मृत्यूस जबाबदार कोण? असा संतप्त सवाल त्यांचे नातेवाईक व संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या प्रकारचा कसून तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

ग्रामस्थांमधून हळहळ

मृत मनोज जांबावलीकर हे पिळगाव- गावकरवाडा येथील आहेत. ते दोन वर्षापूर्वी नोकरीत रुजू झाले होते. त्यांना सहा महिन्यांची मुलगी आहे. उमद्या लाइनमनचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Lineman died of shock in Walshi-Dicholi, villagers erupted against the authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.