मराठी पत्रकारांनो आता पुढे या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 07:50 AM2024-01-08T07:50:14+5:302024-01-08T07:51:35+5:30

'गोवा मराठी पत्रकार संघाचे पुनरुज्जीवन व्हावे' हा दि. ६ जानेवारीच्या लोकमतमध्ये वामन प्रभू यांनी लिहिलेला लेख वाचला.

goa marathi journalists should come forward now | मराठी पत्रकारांनो आता पुढे या...

मराठी पत्रकारांनो आता पुढे या...

जयंत संभाजी, ज्येष्ठ पत्रकार

'गोवा मराठी पत्रकार संघाचे पुनरुज्जीवन व्हावे' हा दि. ६ जानेवारीच्या लोकमतमध्ये वामन प्रभू यांनी लिहिलेला लेख वाचला. एका महत्त्वाच्या विषयाकडे गोव्यातील मराठी पत्रकारांचे लक्ष वेधल्याबद्दल त्यांचे सर्वच पत्रकारांनी आभार मानायला हवेत. दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान केला गेला त्यात मी होतो. सत्काराला आभारादाखल उत्तर देताना हाच विषय मी आग्रहाने मांडला होता, पण त्याची संबंधितांनी दखल घेतली नाही. दुर्दैव !

गोव्यातील मराठी पत्रकारितेचा प्रदेशाच्या आकारमानाच्या तुलनेत संख्यात्मक विचार करता प्रचंड विकास झाला आहे. आठ-दहा मराठी दैनिके आहेत; पण दर्जात्मक विकास झाला नाही हे माझे प्रांजळ मत. काही मराठी संपादकांकडेही मी हे बोललो आहे आणि त्यांनी मान्यही केले आहे. तांत्रिकदृष्ट्या पत्रकारिता खूप पुढे गेली असली, नवी आव्हाने तयार झालेली असली तरी मराठी भाषा, तिचे व्याकरण, वृत्तमूल्य अशा अनेक गोष्टींची जाण नसलेली, त्याचबरोबर आपण चुकीचे लिहितो याचे भान नसलेली अनेक माणसे व्यवसायात शिरली. त्यांना सहन करण्याशिवाय संपादकांपुढे पर्याय नाही. रागवावे तर 'चाललो दुसऱ्या वर्तमानपत्रात' अशी अवस्था, अशावेळी पत्रकारांना मार्गदर्शक करण्यासाठी मराठी पत्रकारांची संघटना अत्यावश्यक असताना मराठी पत्रकारसंघ तीस वर्षापेक्षा जास्त काळ निद्रिस्तावस्थेत राहावा हे आम्हा सगळ्यांसाठी भूषणावह निश्चितच नाही.

काही वर्षापूर्वी या संघाला बाजूला ठेवून राजू नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नवा मराठी पत्रकारसंघ स्थापन झाला होता; पण अल्पावधीतच त्यांचे कार्य थंडावलेले दिसते. बदलत्या परिस्थतीत पत्रकारांसमोर कामाचा रेटा खूप आहे, तरीही आणि त्यामुळेही मराठी वृत्तपत्रे दर्जात्मकदृष्ट्या जागरूक राहावीत यासाठी एखादी संस्था आवश्यक आहेच. आता निद्रिस्त संघाचा संस्थापक सदस्य या नात्याने काही माहिती देतो.

१९७६-७७ च्या दरम्यान अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे तत्कालीन कार्यवाह यशवंत मोने आणि श्री. पुरोहित यांनी माझ्याशी संपर्क साधून गोव्यात परिषदेची शाखा व्हावी यासाठी प्रयत्न करण्याबद्दल सुचविले. मी होकार दिला. लोकभारतचे संपादक रमेश कोलवाळकर यांच्याशी बोललो. ते सहमत झाले आणि आम्ही दोघांनी सभासद नोंदणीसाठी सुरुवात केली. उत्साही पत्रकार जमा झाले आणि रीतसर पहिली निवडणूकही झाली. त्यात लक्ष्मीदास बोरकर अध्यक्ष म्हणून निवडून आले. काहीकाळ संघ व्यवस्थित चालला, पण नंतर पत्रकारिता हेच ज्यांचे चरितार्थाचे साधन, पूर्णवेळ व्यवसायी अशांनाच संघात सभासदत्व द्यावे या मुद्द्यावरून दोन गट झाले. 

तसे केल्याने स्वतःची नोकरी, व्यवसाय सांभाळून पत्रकारिता करणारे हौशी पत्रकार सदस्यत्वाला मुकले असते. तसे करता कामा नये असे मानणारा एक गट होता. मी त्यात होतो. गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टस् ही पूर्णवेळ पत्रकारांची संघटना आहेच, मग मराठी पत्रकार म्हणून तसाच वेगळा गट कशाला? मराठी पत्रकार संघ म्हणजे 'युनियन' नव्हे. पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रशिक्षण, सांस्कृतिक आदान-प्रदान अशी कामे मराठी पत्रकार संघ करील असा तो मुद्दा होता. याच मुद्द्यावर त्यावेळी गुरुनाथ नाईक विजयी झाले. अध्यक्ष बनले. त्या कार्यकारिणीत मी उपाध्यक्ष होतो. पण संघाची एखादी बैठक अभावाने झाली असावी असे मला वाटते. त्याला तीस वर्षांहून जास्त काळ उलटला.

या काळात कसलेच कार्यक्रम संघाने केले नाहीत. वर्षातून एकदा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एखादी लांबची सहल काढायची, वर्तमानपत्रात बातमी छापून आली की झाले. मग अधून-मधून साहित्य सेवक मंडळासारख्या संस्थांच्या कार्यक्रमात सहभाग दाखवायचा. झाले संघाचे काम. संस्थेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतल्यामुळे ही अवस्था पाहून मला दुःख व्हायचे, पण करणार काय?

एवढ्या मोठ्या काळात संस्थेकडे असलेल्या निधीचे काय झाले? अफरातफर नक्कीच झाली नसेल. पण संस्थेचा पैसा एखाद्या बँकेकडे किती काळ पडून राहणार? एकदोनदा मी गुरुनाथ नाईक यांच्याकडे हा प्रश्न उपस्थित केला होता, संस्था जेव्हा निष्क्रिय होतात तेव्हा त्यांच्याकडे असलेला निधी अगदी आयता बँकांच्या घशात जातो, तसा काही प्रकार होण्याआधी या संघाला उभारी देण्यासाठी, नव्याने कार्य पुढे नेण्यासाठी तरुण नेतृत्व पुढे यायला हवे. आज मराठी पत्रकारितेची ती फार मोठी गरज आहे. वर्षातून एखादा कार्यक्रम करून नाव छापून आल्यावर तेवढ्यावर समाधान मानणे ठीक नाही.

गोवा मराठी पत्रकार संघाची मालमत्ता कोठे आहे याचाही शोध घ्यावा लागेल. जुन्ता हाऊसमधील जागेत संघाची तीन कपाटे ठेवण्यात आली होती. त्यात एक मराठी टाइपरायटर, काही समया, संघाचे दप्तर वगैरे होते. गोवा प्रेस सर्कल या संस्थेकडे त्या जागेचा मूळ ताबा होता. गोवा युनियन ऑफ जर्नलिस्ट्स या संघटनेचे कामही तेथूनच चालायचे. 'गुज'ला सरकारने पाटो येथील श्रमशक्ती भवनात जागा दिल्यानंतर सरकारने जुन्ता हाऊसमधील या जागेचा ताबा घेतला तेव्हा ही कपाटे, त्यातले सामान कोठे गेले? पत्रकार संघाने ते ताब्यात घेतले, की सार्वजनिक बांधकाम खात्याने बेवारशी ठरवून त्याची वासलात लावली?

केवळ मराठी पत्रकारांनी नव्हे तर गोव्यातील सर्व मराठी वर्तमानपत्रांच्या संपादकांनी एकत्र येऊन ही संस्था उभी करण्यासाठी प्रयत्न करावे. आपल्या वृत्तपत्रांचा दर्जा सुधारण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत राहावे, असे मी आवाहन करतो. वर्तमानपत्र चालविणे यात व्यवहार महत्त्वाचा बनला आहे हे, मान्य करूनही आपण वाचकांच्या हाती देतो ते उत्तमच असले पाहिजे हे लक्षात घ्यायला हवे. काही नवे पत्रकार मला सांगतात, 'तुमची पत्रकारिता कालबाह्य झाली, आमच्यासमोर वेगळी आव्हाने आहेत.' आव्हाने बदलली हे खरे असले तरी आव्हान पेलताना दर्जा घसरणार नाही याचे भानही ठेवायला हवे. त्यासाठी पत्रकार संघासारख्या माध्यमातून मार्गदर्शन घेता येईल.
 

Web Title: goa marathi journalists should come forward now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.