Goa: Former Chief Minister Ravi Naik's son Roy is next to SIT probe | गोवा : माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय यांची एसआयटीच्या चौकशीला बगल 
गोवा : माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय यांची एसआयटीच्या चौकशीला बगल 

पणजी : काँग्रेसचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय यांनी खाण घोटाळा प्रकरणात एसआयटीच्या चौकशीला बगल दिली. एसआयटीने समन्स काढून काल शुक्रवारी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र ते फिरकलेच नाहीत. उपस्थितीसाठी आणखी पाच दिवसांची मुदत त्यांनी मागितली असून एसआयटीने आता त्यांना येत्या बुधवारी हजर राहण्यास बजावले आहे. 

समन्स पाठवून काल सकाळी ११ वाजता त्यांना एसआयटीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास बजावले होते. परंतु त्यांच्यावतीने त्यांचे वकील अ‍ॅड. सतीश पिळगांवकर हे हजर राहिले आणि आपल्या अशिलासाठी पाच दिवसांची मुदत त्यांनी मागितली. ती दिलेली आहे आणि बुधवारी त्यांना बोलावले आहे, असे एसआयटीचे पोलिस अधिक्षक कार्तिक कश्यप यांनी सांगितले. 

रॉय नाईक यांची किंवा त्यांच्या कुटुंबीयांची खाण नाही. तसेच ते खनिज वाहतूकदारही नाहीत. परंतु काही गब्बर खनिज ट्रेडर्सशी त्याचा संबंध असल्याची माहिती एसआयटीला मिळाली आहे. तसेच खाण घोटाळ्यातील प्रकरणातच त्याचा सहभाग आढळून आल्याचा दावाही एसआयटीने केला आहे. 

दरम्यान, तब्बल ३५ हजार कोटी रुपयांच्या खनिज घोटाळ्याची चौकशी करणाºया एसआयटीने आजपावेतो सहा प्रकरणांमध्ये आरोपपत्रे दाखल केलेली आहेत. मुख्य प्रकरणातही गेल्याच आठवड्याते आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील केवळ १३५ कोटी रुपयांच्या बाबतीत हे आरोपपत्र असून नंतर टप्प्याटप्प्याने इतर प्रकरणे जोडली जाणार आहेत.

रॉय नाईक यांचा संबंध कोणत्या खाणीच्या बाबतीत आलेला आहे, हेही एसआयटीने अद्याप स्पष्ट केलेले नाही. वाळपई मतदारसंघात गेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत रॉय हे विश्वजीत राणे यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे रिंगणात उतरले होते त्यात त्यांचा पराभव झाला होता. 


Web Title: Goa: Former Chief Minister Ravi Naik's son Roy is next to SIT probe
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.