प्रियजनांना न्यायासाठी धडपडतात पाच जणी

By admin | Published: March 24, 2017 08:02 PM2017-03-24T20:02:15+5:302017-03-24T20:02:15+5:30

या पाचही जणी एकत्र येण्याचा उद्देश स्कार्लेटची आई फियोना मॅकइवॉन हिने स्पष्ट केला आहे.

Five people struggling for justice for loved ones | प्रियजनांना न्यायासाठी धडपडतात पाच जणी

प्रियजनांना न्यायासाठी धडपडतात पाच जणी

Next

सुशांत कुंकळयेकर

मडगाव, दि. 24 - राजबाग-काणकोण येथे डॅनियली मेक्लॉग्लिन या २८ वर्षीय आयरिश युवतीचा खून मागच्या आठवड्यात झाल्यानंतर गोव्यापेक्षा जास्त खळबळ उडाली ती तिच्या मायदेशी ब्रिटन व आयर्लंडमध्ये. याचदरम्यान गोव्यापासून लाखो मैलावरील ब्रिटनमधील शेल्टनहॅम येथील एका कॅफेमध्ये मावरिन स्विनी, फियोना मॅकइवॉन, अमांडा बॅनेट, मीना फिरहॉम व साना फिरहॉम कटर या पाच जणी जमल्या. काय संबंध होता त्यांचा डॅनियलीच्या खुनाशी?

ब्रिटिश आॅनलाईन टेब्लॉइड मिड डे डॉट कॉम येथे या पाच जणींच्या एकत्र येण्याच्या घटनेचे सविस्तर वृत्त आहे. त्यांचे एकत्रित छायाचित्रही या व्हॅब मॅगझिनवर आहे. या पाच जणींचा गोव्याशी संबंध म्हणजे त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती गोव्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. मात्र, पुन्हा त्या घरी कधीही परतल्या नाहीत. गोव्यातच त्यांना संशयास्पद मृत्यू आला. या पाचही जणींच्या मते गोव्यातील पोलिसांनी या प्रकरणांचा योग्य तऱ्हेने तपासच केला नाही. या पाचही महिला ब्रिटन, आयर्लंड व फिनलँड येथील असून कुटुंबीयांच्या मृत्यूप्रकरणात एकत्रित लढा देण्याच्या उद्देशानेच त्या एकत्र आल्या होत्या.

यातील फियोना मॅकइवॉन ही २00८ मध्ये अंजुणे येथे मृत पावलेल्या स्कार्लेट किलिंग या ब्रिटिश युवतीची आई. जिने अजूनही मुलीच्या मृत्यू प्रकरणातील लढा थांबविलेला नाही. दुसरी मावरिन स्विनी ही अंजुणे येथेच २0१0 मध्ये संशयास्पदरीत्या मृत पावलेल्या डॅनिस स्विनी हिची मोठी बहीण. डॅनिसला अंजुणेतील एका हॉस्पिटलात दाखल केले असता मृत्यू आला होता. सुरुवातीला अमली पदार्थांच्या अतिरेकी सेवनामुळे हा मृत्यू आल्याचे गोवा पोलिसांनी नमूद केले होते. मात्र, मावरिनने या प्रकरणात लढा देत सुमारे दोन वर्षे संपूर्ण ब्रिटन ढवळून काढल्यानंतर ब्रिटिश दुतावासाच्या दबावावरून गोवा पोलिसांनी हा मृत्यू खून प्रकरण म्हणून नोंद केले. मीना फिरहॉम ही दोन वर्षांपूर्वी म्हणजे २0१५ मध्ये पाटणे-काणकोण येथे मरण आलेला फिनलँडचा युवक फेलिक्स दहाल याची आई. दहालला डोक्याला मार बसल्याने मृत्यू आला होता. नशेत तो खाली पडल्याने हा मृत्यू आल्याचे सुरुवातीला काणकोण पोलिसांनी म्हटले होते. मात्र, याही प्रकरणात युरोपमध्ये खळबळ माजल्यानंतर आॅक्टोबर २0१६ मध्ये हे खून प्रकरण म्हणून नोंद करण्यात आले. यातील चौथी महिला साना फिरहॉम कटर ही फेलिक्सची मावशी. तर अमांडा बॅनेट ही २00६ मध्ये गोव्यात मृत्यू आलेल्या स्टीफन बॅनेट या युवकाची बहीण. याशिवाय २00८ मध्ये गोव्यात मृत्यू आलेल्या मार्टिन नेबर याची बहीण सारा नेबर आणि २0१५ मध्ये गोव्यात मृत्यू आलेल्या जेम्स डास्कीन याचे वडील जिमी डास्कीन. या दोघांचीही या पाच जणींनी भेट घेतल्याचे मिड डे डॉट कॉमने म्हटले आहे.

या पाचही जणी एकत्र येण्याचा उद्देश स्कार्लेटची आई फियोना मॅकइवॉन हिने स्पष्ट केला आहे. ती म्हणते गोव्यात प्रत्येकवर्षी कित्येक विदेशी पर्यटकांना संशयास्पदरीत्या मृत्यू येऊनही या प्रकरणांचा तपास योग्यरीतीने केला जात नाही. हा तपास योग्यरीतीने व्हावा यासाठी गोव्यातील पोलीस अधिकाऱ्यांवर कसा दबाव आणता येईल हे ठरविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. या पाचही जणींनी मिळून फेसबुकवर एक ग्रुप पेज तयार केले असून या पेजवरून ब्रिटनचे पंतप्रधान तेरेझा मे व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्या आपली कैफियत मांडणार आहेत. एवढेच नव्हे तर गोवा विदेशी पर्यटकांना किती असुरक्षित आहे, याची माहितीही त्या या पेजवरून इतर पर्यटकांमध्ये पोहचविणार आहेत.

 

Web Title: Five people struggling for justice for loved ones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.