खून करून फेकून देण्याचे प्रकार वाढले; गोव्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 08:46 PM2018-10-13T20:46:48+5:302018-10-13T20:56:27+5:30

गोव्यात गुन्हेगारांचे पोलिसांना आव्हान

dead body thrown after murder new crime pattern in goa | खून करून फेकून देण्याचे प्रकार वाढले; गोव्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर 

खून करून फेकून देण्याचे प्रकार वाढले; गोव्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर 

Next

पणजी: खून करून मृतदेह फेकून देण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून गोव्यात उघडकीस येऊ लागल्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोव्यात दीड महिन्यात असे तीन मृतदेह सापडले आहेत. 

जुने गोवे येथे एका महिलेचा मृतदेह शुक्रवारी सापडला होता. या महिलेवर बलात्कार करून नंतर तिचा खून करण्यात आल्याचे शवविच्छेदनात आढळून आले आहे. ही घटना ताजी असतानाच शनिवारी आमोणे येथे आणखी एक मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाला डोकेच नसल्यामुळे तो खूनाचा प्रकारच असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा नोंदवला जाणार आहे. पोलिसांनी नंतर या मृतदेहाची ओळख पटवली आहे. मयताचे नाव राजेश सावंत असे आहे. तीन दिवसात दोन मृतदेह आढळले व तेही खून व बलात्काराचे प्रकार असल्यामुळे राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा धोक्याचा इशारा आहे. जुने गोवे खून प्रकरण आता जुने गोवे पोलिसांकडून काढून गुन्हे अन्वेषण विभागाकडे देणयात आले आहे. 

आमोणे येथील प्रकरण हे अत्यंत भयानक असून खून करून इसमाचे डोके धडापासून छाटून मृतदेह टाकून देण्यात आला आहे. मडगावातील बेल्लारी सुलतान खून प्रकरणाच्या स्मृती जाग्या व्हाव्यात एवढ्या भयंकर क्रूर पद्धतीने हा खून करण्यात आला आहे. पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणे अशक्य व्हावे आणि गुन्हेगाराचा शोध घेणे आणखी कठीण व्हावे, या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला. आता मृतदेहाची ओळख पटल्यामुळे गुन्हेगारांचाही छडा लागेल अशी अपेक्षा आहे. 

या दोन्ही घटनांच्यापूर्वी ऑगस्ट महिन्यात शहापूर - फोंडा इथे एका महिलेचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. परंतु अद्याप या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. फोंडा पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी  असाच एक हात पाय वगैरे नसलेला मृतदेह आढळला होता. चौकशीअंती तो रतन करोल या ऊस रस विक्रेत्या व्यावसायिकाचा मृतदेह असल्याचे आढळून आले होते. हा खून एका पोलिसानेच केल्याचे पुरावे आढळून आले होते. गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी या प्रकरणाचा तपास लावून न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात यश मिळवले होते. या पार्श्वभूमीवर या तीन पैकी किती खून प्रकरणाचा छडा लागतो ते पाहणे महत्त्वाचे आहे.
 

Web Title: dead body thrown after murder new crime pattern in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.