गोव्याच्या समुद्राला उधाण, ‘लुबान’ व ‘तितली’ या चक्रीवादळांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 05:20 PM2018-10-12T17:20:00+5:302018-10-12T17:22:38+5:30

वातावरण बदलाचे संकट किती तीव्र होऊ लागले आहे, याची चाहूल २०१८ सालीच लागली असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिलेला असतानाच गोव्यात गेले दोन दिवस समुद्राने किना-यावर केलेले आक्रमण त्याचाच भाग असल्याचे जाणवते.

The danger of cyclones of the Goa sea, 'lubaan' and 'titli' | गोव्याच्या समुद्राला उधाण, ‘लुबान’ व ‘तितली’ या चक्रीवादळांचा धोका

गोव्याच्या समुद्राला उधाण, ‘लुबान’ व ‘तितली’ या चक्रीवादळांचा धोका

Next

- राजू नायक

गोवा- वातावरण बदलाचे संकट किती तीव्र होऊ लागले आहे, याची चाहूल २०१८ सालीच लागली असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिलेला असतानाच गोव्यात गेले दोन दिवस समुद्राने किना-यावर केलेले आक्रमण त्याचाच भाग असल्याचे जाणवते. समुद्र विज्ञान संस्थेचे माजी संशोधक डॉ. बबन इंगोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना जरी समुद्रपातळी वाढ ‘लुबान’ व ‘तितली’ या दोन चक्रीवादळांमुळे झाली आहे, असे नमूद केले असले तरी अंतिमत: तो वातावरण बदलाचाच परिणाम असल्याचे मान्य केले.

वातावरण बदलामुळे जगभर नैसर्गिक प्रतिक्रियांचे अतितीव्र परिणाम जाणवत असून तापमानाच्या वाढीमुळे आर्क्टिक व अंटार्टिकाचे हिमखंड वितळू लागले आहेत. त्यामुळे समुद्रपातळी वाढ एका बाजूला होत असतानाच दुस-या बाजूला तीव्र पाऊस, वादळे, भूकंप व हवामानातील बदलामुळे पिकांवर परिणाम होऊन दुष्काळी परिस्थितीत वाढ होत आहे.

गोव्यात किनारपट्टी ही समुद्रपातळी वाढीमुळे धोक्यात येऊ शकते. तरीही किना-यावर नियम तोडून अनेक बांधकामे, हॉटेल उभी झाली आहेत. शिवाय खानपानगृहांची संख्या वाढत आहे. ही शॅक्स जरी तात्पुरती असली तरी त्यांचे बांधकाम पक्के असते व ती किना-यांच्या नैसर्गिक परिस्थितीत फेरफार करतात, शिवाय मानवी व्यवहार व कचरा यामुळे हे किनारे संवेदनशील बनले आहेत. यावर्षी ऑलिव्ह रिडले कासवांनी या किना-यांकडे पाठ फिरविली आहे. गालजीबाग व मोरजी किना-यांवर यापूर्वी कासव येत असत.

तज्ज्ञांच्या मते, समुद्रपातळी वाढ झाली किंवा आताच्या सारखे समुद्राचे आक्रमण वाढल्याच्या घटना वारंवार घडल्या तर गोवेकरांच्या आवडीचे मासळीचे उत्पादन घटेल तसेच ‘शॅक्स’ या पर्यटकांच्या आवडीच्या विरंगुळ्याच्या ठिकाणावर संक्रांत येईल. मासळीचे उत्पादन २०१७मध्ये ११७.७  टन झाले असून, गोव्याहून ती निर्यात केली जातेय. त्याशिवाय शॅक्स व्यवसायातही करोडो रुपयांची गुंतवणूक होते. किनारी पर्यटनाच्या ओढीनेच गोव्यात पर्यटक येत असतात.

गोव्यात हल्लीच्या काळात पर्यटनाला विलक्षण बरकत आली असून १५ लाख लोकसंख्येच्या गोव्यात हंगामात ८० लाख पर्यटक येत असतात, त्यात सहा लाख विदेशी पर्यटक असतात. यंदा तर चार्टर विमानांच्या संख्येत वाढ होऊन ती हजारावर जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ९०० चार्टर विमाने उतरली होती. या पर्यटकांचा भर किना-यांवर असतो. त्यामुळे किना-यांवर पर्यटकांची गर्दी वाढलीय, शिवाय तेथे ब-याच बेकायदेशीर बांधकामे व अनिष्ट गोष्टींचा वेढा पडला आहे. या गोष्टी प्रदूषणात भर घालतात व त्यामुळे हे किनारे संवेदनशील बनले आहेत. त्यातच तापमान वाढीचा धोका व समुद्रात नित्यनेमाने येणारी वादळे यांनी किना-यांचा नाश होऊन राज्यावर आर्थिक संकट येण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करतात. डॉ. बबन इंगोले म्हणाले की, मत्स्य उत्पादनावर नक्कीच परिणाम होऊन रोजगार व आर्थिक परिस्थितीवर तीव्र परिणाम होऊ शकतो.

Web Title: The danger of cyclones of the Goa sea, 'lubaan' and 'titli'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा