व्यावसायिकदृष्ट्या मराठी चित्रपट मागेच

By admin | Published: November 24, 2014 01:28 AM2014-11-24T01:28:17+5:302014-11-24T01:28:47+5:30

नंदू माधव : नव्या दमाच्या निर्मात्यांमुळे आशादायक चित्र

Commercially back in Marathi films | व्यावसायिकदृष्ट्या मराठी चित्रपट मागेच

व्यावसायिकदृष्ट्या मराठी चित्रपट मागेच

Next

सुखदेव नारायणकर-पणजी : मराठी चित्रपट बदलतो आहे हे खरे आहे; मात्र व्यावसायिकदृष्ट्या ती एक चळवळ झाली आहे असे मात्र म्हणता येणार नाही. त्याकरिता सार्वत्रिक प्रयत्नांची गरज आहे. नव्या दमाचे चेहरे आता चित्रपट निर्मितीत येत असल्याने आगामी काळात अधिक आशादायक चित्र दिसेल, असा विश्वास मराठी चित्रपट अभिनेते नंदू माधव यांनी व्यक्त केला. इफ्फीनिमित्त गोव्यात आलेल्या या कसदार अभिनेत्याने ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला.
नंदू माधव म्हणाले, मराठी चित्रपटांना चळवळीचे स्वरुप आले आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल. नाटक, पथनाट्य हा चळवळीचा भाग झाला; पण मराठी चित्रपटांमध्ये हा बदलही होत असल्याची काही सुचिन्हे दिसायला लागली आहेत. चळवळीचेच म्हणत असाल तर बंगालमध्ये चित्रपटांची चळवळ रुजली.
नव्या दमाच्या दिग्दर्शकांमुळे सध्या मराठी चित्रपटसृष्टीस चांगले दिवस येत आहेत. नवे आशय विषय आणि तंत्रज्ञान यामुळे चित्रपटांची समज वाढीस लागत आहे हे चांगले लक्षण आहे. जागतिक स्तरावर मराठी चित्रपटांची दखल घेतली जात आहे हा मोठ्या बदलांचाच भाग आहे.
ते म्हणाले, शासनाने थेट मदत देण्यापेक्षा जर मराठी चित्रपटांसाठी स्वत:ची हक्काची चित्रपटगृहे निर्माण केली तर मराठी चित्रपटांचे अनेक प्रश्न खऱ्या अर्थाने सुटतील. निर्मितीमूल्यांबरोबरच त्याच्या मार्केटिंगकडे विशेषत्वाने पाहण्याची गरज आहे. स्वत:चं घर असल्यावर मला जागा द्या, असं म्हणायची वेळच मराठी चित्रपटांवर येणार नाही. इफ्फीत विषयकेंद्रित चित्रपट पाहावयास मिळतात. त्यामुळे विविध देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय संस्कृती पाहावयास मिळते. नव्या दिग्दर्शकांच्या सामाजिक जाणिवा वाढण्यासाठी याचा निश्चित लाभ होतो. वेगळ्या संकल्पना, वेगळ्या समस्यांना भिडण्याची ताकद निर्माण होते. परिणामी त्याचे दृश्य परिणाम चित्रपटांच्या निर्मितीत दिसतात. चित्रपटांच्या दर्जा वाढीस ही गोष्ट अनुकूल आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटांची इफ्फीतील संख्याही वाढत आहे हेच आश्वासक चित्र आहे. गोव्यातही मराठी चित्रपट आता बऱ्यापैकी झळकू लागले आहेत. इंडियन पॅनोरमा विभागातील मराठी चित्रपटांची संख्या लक्षात घेता हे बदल दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Commercially back in Marathi films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.