पणजी : गोव्यात अलिकडेच ईडी व प्राप्ती कर खाते अशा तपास यंत्रणांनी 36 ठिकाणी छापे टाकले व त्यावेळी त्या यंत्रणांना 100 कोटींचे ब्लॅक मनी व्यवहार सापडले आहेत. हे व्यवहार कॅसिनो जुगाराशीसंबंधित आहेत, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

नोट बंदीच्या मोदी सरकारच्या निर्णयामुळे देशाला कसा फायदा झाला आहे ते पर्रीकर यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पत्रकारांनी पर्रीकर यांना गोव्यात कॅसिनो हे ब्लॅक मनीचे मोठे केंद्र असतानाही गोवा सरकार त्याविरुद्ध कधीच का बोलत किंवा कृती करत नाही असे विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. ब्लॅक मनीविरोधी कारवाई ही राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. तथापि केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईत 100 कोटींचे व्यवहार आढळून आल्याचे आपल्या वाचनात आले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोवा सरकारचा महसुल जीएसटीनंतरही 22 टक्क्यांनी वाढला आहे. गोवा सरकारला सर्वत्र कॅशलॅस व्यवहार व्हावेत असे वाटते. येत्या मार्चपासून सरकारी पातळीवरील सर्व 95 टक्के  व्यवहार हे कॅशलॅस पद्धतीने होतील. सरकारला कॅशलॅस पद्धतीनेच महसूल येईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या देणग्या ह्या कॅशलॅस पद्धतीने म्हणजेच डिजीटलाईज पद्धतीने दिल्या जाव्यात असे वाटत नाही काय असे पत्रकारांनी विचारले असता, प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते तशी  डिजीटलाईज पद्धतीलाही मर्यादा आहे असा दावा पर्रीकर यांनी केला. एखाद्या कंपनीने एखाद्या सत्ताधारी पक्षाला मोठी देणगी दिली असे जर दुसर्‍या पक्षाला कळाले तर तो दुसरा पक्ष स्वत: सत्तेवर आल्यानंतर त्या कंपनीवर सूड उगवू शकतो. त्यामुळे राजकीय पक्षांना मोठ्या देणग्या ह्या कॅशलॅस पद्धतीने देता येणार नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले.

नोटबंदीच्या निर्णयामुळे अधिक लोक कराच्या जाळ्याखाली येतील व त्यामुळे जनसामान्यांवरील कराचा बोजा कमी होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, ही पत्रकार परिषद आटोपून मुख्यमंत्री जेव्हा बाहेर जाऊ पाहू लागले त्यावेळी भाजप कार्यालय असलेल्या इमारतीखाली मुख्य दरवाजावरच पॅरा शिक्षक महिलांनी मोठे धरणे आंदोलन केले. या दरवाजाला घेरण्यात आले. आपल्याला वेतन अत्यल्प असूनही बदल्या मात्र दूरवर करण्यात आल्या आहेत असा दावा करून त्याविषयी निषेध करण्यासाठी राज्यातील पॅरा शिक्षक महिलांनी हे आंदोलन केले. महिला पॅरा शिक्षकांनी रूद्रावतार धारण केल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पोलिस बंदोबस्तात जावे लागले. खासदार विनय तेंडुलकर यांनाही तिथेच या शिक्षकांनी घेराव घातला.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.