भाजपाकडून हिंदू बहुजन व्होटबँक आकर्षित करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 12:17 PM2018-10-17T12:17:30+5:302018-10-17T12:20:06+5:30

2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोव्यातील हिंदू बहुजन समाजाने भाजपाला मते दिली नाहीत.

BJP tried to attract Hindu Bahujan Votebank in goa | भाजपाकडून हिंदू बहुजन व्होटबँक आकर्षित करण्याचा प्रयत्न

भाजपाकडून हिंदू बहुजन व्होटबँक आकर्षित करण्याचा प्रयत्न

Next

पणजी - 2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोव्यातील हिंदू बहुजन समाजाने भाजपाला मते दिली नाहीत. यापुढे लोकसभा निवडणुका होणार असल्याने लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपाने हिंदू बहुजन व्होट बँक स्वत:कडे आकर्षित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मिलिंद नाईक यांना मंत्रिपद देणे व सुभाष शिरोडकर, दयानंद सोपटे यांना काँग्रेसमधून फोडून स्वत:कडे वळविणे हा याच योजनेचा भाग आहे, असे मानले जात आहे. मात्र आयाराम-गयाराम राजकारण हे अशाच मतदारांमधील अनेकांना मान्य नाही व भाजपाचेही माजी मंत्री, माजी मुख्यमंत्री त्यावर टीका करत असल्याने भाजपासाठी वाट निसरडी बनली आहे.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने भंडारी समाजातील एकूण 10 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी नऊजण पराभूत झाले. या उलट काँग्रेसच्या तिकीटावर बहुजन समाजातील जास्त उमेदवार निवडून आले. एसटी समाजातील जास्त नेते भाजपकडे नसले तरी, अनुसूचित जमातीतील (एसटी) मतदारांना भाजपाने गृहित धरलेले आहे. एसटींची लोकसंख्या गोव्यात 12 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. भंडारी समाजातील अधिकाधिक मते स्वत:कडे वळली नाही तर, येत्या लोकसभा निवडणुकीवेळी धोका निर्माण होऊ शकतो याची कल्पना भाजपाला आहे. अगोदरच खनिज खाणी बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेला सांगे, डिचोली, सत्तरी, केपे या चार तालुक्यांमधील हिंदू बहुजन समाजत अस्वस्थ आहे. खाण बंदीबाबत बरेच लोक मुख्यमंत्री पर्रीकर यांनाही अप्रत्यक्षरित्या दोष देत आहेत. भाजपाने प्रथम मिलिंद नाईक यांना मंत्रिपद दिले व आता भंडारी समाजातीलच सुभाष शिरोडकर सोपटे यांना आपल्याबाजूने घेऊन भाजपाने शिरोडा व मांद्रे मतदारसंघातील बहुजन व्होट बँकेवर दावा सांगितला आहे. मात्र काँग्रेसचे दोन आमदार फोडणे व त्यांना भाजपामध्ये प्रवेश देणे हे लोकांच्या पचनी पडलेले नाही. जे कट्टर भाजपा समर्थक आहेत, त्यांच्याकडूनच या फुटीचे समर्थन केले जात आहे.  खुद्द ज्येष्ठ भाजपा नेते तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी नव्या फुटीच्या विषयावरून भाजपाच्या नेतृत्वावर टीका केली आहे तर माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी फुटीच्या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

गिरीश चोडणकर हे भंडारी समाजातीलच नेते काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आल्यापासून भाजपाने हिंदू बहुजन व्होट बँक आपल्याकडे ओढण्यासाठी सर्व ते प्रयत्न चालविले आहेत. श्रीपाद नाईक यांना आता पक्षात थोडे तरी महत्त्व दिले जात आहे. मात्र भाजपा स्वत:च्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होईल काय हे आगामी काळातच कळून येईल. श्रीपाद नाईक यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली तर, भाजपाला ते जास्त उपयुक्त ठरेल अशी भाषा पक्षातील एक गट करत आहे.

Web Title: BJP tried to attract Hindu Bahujan Votebank in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.