गोवा भाजपाला घरातूनच हाणला पुन्हा शालजोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 02:49 PM2019-02-18T14:49:12+5:302019-02-18T14:49:28+5:30

गोव्यातील भारतीय जनता पक्षाला घरातूनच सतत शालजोडे खावे लागत आहेत. असा जोड्याचा तडाखा रविवारी पुन्हा एकदा बसला. भाजपाचे कळंगुटचे आमदार आणि उपसभापती मायकल लोबो यांनी हा जोडा हाणला आहे.

BJP MLA michael lobo criticized Goa BJP over many issues | गोवा भाजपाला घरातूनच हाणला पुन्हा शालजोडा

गोवा भाजपाला घरातूनच हाणला पुन्हा शालजोडा

Next

- सुरेश गुदले
 
पणजी : गोव्यातील भारतीय जनता पक्षाला घरातूनच सतत शालजोडे खावे लागत आहेत. असा जोड्याचा तडाखा रविवारी पुन्हा एकदा बसला. भाजपाचे कळंगुटचे आमदार आणि उपसभापती मायकल लोबो यांनी हा जोडा हाणला आहे. कळंगुट हा जगप्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. या किनारपट्टीतील वजनदार राजकीय नेता म्हणून लोबो यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणी आणि अवलिया कलावंत विष्णू सूर्या वाघ यांच्या पार्थिवावर रविवारी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. येथे लोबो म्हणाले, विष्णू सूर्या वाघ गोव्यातील जनतेचा बुलंद आवाज होते. ते लोकप्रिय नेतृत्व होते. सडेतोड बोलणारे नेतृत्व होते. भाजपाने त्यांच्यावर अन्याय केला.

भाजपने विष्णू सूर्या वाघ यांना मंत्री करतो असे सांगितले होते. ते निवडून येण्यापूर्वीच्या जाहीर सभेत मनोहर पर्रीकरांनी असे आश्वासने दिले होते. विष्णू जिंकले; पण आश्वासन हवेतच विरलेले. याची खंत विष्णू यांनीही व्यक्त केली होती. यासंदर्भाने लोबो यांच्या टीकेकडे पाहिले जाते. मायकल लोबो, कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, भाजपा नेते असणारे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आदींनी मात्र भाजपावर हल्ला करण्याची एकही संधी सोडलेली नाही.

सरकार चालत नाही म्हणालेले...

या तिघांपैकी लोबो यांनी पर्यटन, ट्रॅक्सी व्यावसायिकांच्या समस्या, समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न आदींवरून स्वत:च्याच सरकारला झोडपून काढले आहे. स्वत:ला मंत्रिपद न मिळाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांना लक्ष्य केले होते. सरकार गंभीर आजारी आहे. राज्य सरकार चालत नाही, असे ते म्हणाले होते.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक बोलले आणि...

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच्या एका समारंभानंतर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केलेल्या विधानामुळे भाजप अस्वस्थ झालेला होता. आता नेतृत्व बदलाची गरज असल्याचे नाईक म्हणाले होते. याविषयी उलट-सुलट प्रतिक्रिया आल्यानंतर मात्र त्यांनी तलवार म्यान केली होती.

तत्त्वांना तिलांजली...

लक्ष्मीकांत पार्सेकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतील आणि गोव्यात भाजपला सत्तास्थानी नेण्यापर्यंतच्या वाटचालीतील एक महत्त्वाचे नाव. सध्याचे पक्षाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्यामुळे भाजपची कशी वाट लागली ते प्रा. पार्सेकरांनी जाहीरपणे अनेकवेळा सविस्तर सांगितले. पक्षाने तत्त्वांना तिलांजली दिल्याचा त्यांच्या एकूण टीकेचा सूर राहिला.

पूल पाहून पोट भरत नसते

कुडचडेचे आमदार आणि वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी मांडवी नदीवरील नवीन पुलाच्या संदर्भाने केलेली टीका खूप गाजली. हा तिसरा ‘पूल पाहून पोट भरत नसते’ असे ते म्हणालेले. गोव्यातील बंद खाणी पुन्हा सुरू होत नाहीत म्हणून त्यांची ही चरफड. निवडणुकीत लोक भाजपला हिसका दाखवतील, अशी त्यांच्या टीकेची सततची ‘वनलाइन’ असते. कुडचडे हा खाण परिसर असून काब्राल यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत आणि त्यांची गुंतवणूकही असे बोलले जाते.

Web Title: BJP MLA michael lobo criticized Goa BJP over many issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.