अंधेरा छटेगा कमल खिलेगा; पर्रीकरांनी गोव्यात भाजपाला 'अच्छे दिन' दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 03:17 PM2019-03-18T15:17:09+5:302019-03-18T15:17:36+5:30

गोव्यात भाजप बळकट करण्यामागे मनोहर पर्रीकर यांचे मोठे योगदान आहे. पक्षाच्या हितासाठी कोणतेही काम, कोणत्याही क्षणी पूर्ण करण्याचा त्यांचा हातखंडा.

bjp flourishes in goa under the leadership of manohar parrikar | अंधेरा छटेगा कमल खिलेगा; पर्रीकरांनी गोव्यात भाजपाला 'अच्छे दिन' दाखवले

अंधेरा छटेगा कमल खिलेगा; पर्रीकरांनी गोव्यात भाजपाला 'अच्छे दिन' दाखवले

googlenewsNext

- पंकज शेट्ये

गोव्यात भाजप बळकट करण्यामागे मनोहर पर्रीकर यांचे मोठे योगदान आहे. पक्षाच्या हितासाठी कोणतेही काम, कोणत्याही क्षणी पूर्ण करण्याचा त्यांचा हातखंडा. कोणत्याही प्रकारचे ‘टास्क’ ठेवल्यास ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतलेत. त्यासाठी त्यांची इच्छाशक्ती मोठी असे. माझी व मनोहर यांची ३० वर्षांहून जास्त काळची मैत्री. गोव्यात भारतीय जनता पक्ष बांधणीपासून भाजप सरकार स्थापन करण्यापर्यंत पर्रीकर यांनी खरोखरच मोठे योगदान दिले. माजी सभापती तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र आर्लेकर ‘लोकमत’शी बोलत होते. पर्रीकर यांनी गोव्यात भाजप पक्ष बांधणीसाठी केलेली वाटचाल सांगताना ते भारावून गेले होते.

९८९ मध्ये भारतीय जनता पक्षात माझा प्रवेश झाला. त्यापूर्वी मी तसेच मनोहर पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, श्रीपाद नाईक आदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करायचो. पर्रीकर यांचा भाजपमध्ये १९९१ मध्ये प्रवेश झाला. उत्तर गोव्यातून भारतीय जनता पक्षाचा लोकसभा उमेदवार म्हणून त्यांना उभे करण्याचा निर्णय सर्व ज्येष्ठ नेत्यांनी तेव्हा एकत्रितपणे घेतलेला. त्या काळात भाजपला उत्तर गोव्यातून लोकसभेसाठी योग्य उमेदवार मिळत नव्हता. पर्रीकर यांना एके प्रकारे पक्षात आकस्मिकच आणलेले. त्यांनी उत्तर गोव्यातून लोकसभा निवडणूक लढवली. श्रीपाद नाईक यांनी तेव्हा दक्षिण गोव्यातून भाजपसाठी निवडणूक लढवलेली. गोव्यात सध्या सत्तेवर असलेल्या भाजपची तेव्हा राजकीय ताकद कमी होती. पर्रीकर आयआयटी अभियंते असूनही कोणत्याही राजकीय कार्यक्रमांचे व्यवस्थापन कसे करायचे ते त्यांना नेमके माहीत. त्याचा फायदा पक्षाबरोबरच त्यांच्याबरोबर असलेल्या इतर भाजप नेत्यांनाही झाला. पर्रीकर उत्तर गोव्यातून पहिल्यांदाच भाजपसाठी लोकसभा निवडणूक लढले तेव्हा त्यांना २५ हजारांच्या आसपास मते मिळालेली. या काळात मतांचा हा आकडा पक्षासाठी खरोखरच एक मोठा आकडा होता. याचे कारण असे की गोव्यात भाजपच्या कार्यकर्त्यांची संख्या खूप कमी होती. पक्षाची लोकप्रियता कमी होती. त्यामुळे गोव्यात संघ बळकट करण्यासाठी आम्हाला गोव्याच्या विविध गावांत जावे लागायचे. आमच्यामधील भाजप नेत्यांमध्ये तेव्हा म्हणजे १९९१ च्या काळात फक्त दोघांचीच चारचाकी होती. यात मनोहर पर्रीकर यांची ‘मारुती’ व श्रीपाद नाईक यांची ‘फियाट’. पक्ष बळकट करण्यासाठी या चारचाकीने मी, मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर व इतर अनेक भाजप नेते गोव्यातील गावागावांत फिरून नवीन कार्यकर्ते बनविणे, पक्षाने दिलेले कार्यक्रम पार पाडणे अशी कामे करत असू.
कार्यकर्त्यांना कशा प्रकारे जवळ करणे, कार्यकर्त्यांकडून कशा प्रकारे पक्षासाठी जास्तीत जास्त काम करून घेणे याची जाणीव पर्रीकरांना पक्की असे. त्याचा भविष्यकाळात भाजपला गोव्यात मोठा फायदा झाला. ते आमच्यासाठी एक प्रेरक शक्ती ठरले. पक्षाचे काम तर ते प्रारंभापासून करतच होते; पण मुख्यमंत्रिपद सांभाळतानाही ते पक्षाच्या हितासाठी झटलेत. सर्वांना एकत्र घेऊन भाजपचे गोव्यात कशा प्रकारे चांगले दिवस आणावेत यासाठी त्यांनी भरपूर विचार करून काम केले आहे. त्यांच्याबरोबर पक्षासाठी काम करताना जेवढा आनंद मिळायचा तेवढेच शिकायलाही मिळायचे. त्यामुळेच म्हणावेसे वाटते की, पर्रीकरांसारख्या कार्यकर्ता-नेत्याबरोबर काम करायला मिळाले हे आमचे भाग्यच. पर्रीकरांनी गोमंतकीयांच्या हितासाठी अनेक उत्तम पावले उचललेली असून विविध सामाजिक योजना या त्याची उत्तम उदाहरणे आहेत. त्यांच्या सुवर्णकामगिरीमुळेच भाजपला गोव्यात सोनेरी दिवस पाहायला मिळाले.

...आणि पुसला गेला बायणाचा कलंक
कोणतीही गोष्ट करण्याचे मनोहर पर्रीकर यांनी ठरविल्यानंतर ती पूर्ण केल्याशिवाय ते गप्प बसत नसत. याचे एक मोठे उदाहरण म्हणजे बायणा येथील वेश्यावस्ती जमीनदोस्त करणे. बायणा वेश्यावस्ती फक्त वास्को शहरासाठी कलंक नसून तो संपूर्ण गोव्यासाठी कलंक बनून राहिला होता. या वेश्यावस्तीमुळे अनेकांनी घर-संसार बरबाद तर केलाच शिवाय अनेकांना ‘एड्स’ होऊन मृत्यूच्या जबड्यात जावे लागले. पर्रीकरांना वेश्यावस्ती जमीनदोस्त करण्याचे ठरविले आणि ते कामाला लागले. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. काही बिगरसरकारी संस्थांचा विरोध, राजकीय दबावापुढे ते नमले नाहीत. सर्व कायदेशीर प्रकारची पावले उचलत जून २००४ मध्ये पर्रीकर यांच्यामुळे बायणाचा कलंक पुसला गेला. त्यामुळे आजही असंख्य लोक त्यांना आशीर्वाद देतात.
 

Web Title: bjp flourishes in goa under the leadership of manohar parrikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.