आंघोळीसाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 04:19 PM2018-05-24T16:19:52+5:302018-05-24T17:24:09+5:30

 चामोर्शी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या चिचडोह बॅरेजजवळील डोहात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि.२३ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

Two children death In Gadchiroli | आंघोळीसाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

आंघोळीसाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

googlenewsNext

गडचिरोली -  चामोर्शी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या चिचडोह बॅरेजजवळील डोहात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि.२३ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. मात्र ही घटना सायंकाळी उघडकीस आल्यानंतर राबविलेल्या शोधमोहिमेत गुरूवारी दुपारी १२ वाजता दोन्ही मृतदेह सापडले. राकेश प्रदीप रॉय (१५) व प्रताप पंकज मंडल (१६), दोघेही रा.जयनगर अशी मृतांची नावे आहेत.
जयनगर लगतच्या वैैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या चिचडोह बॅरेजमधील गेटच्या खालील भागात असलेल्या नदीपात्रात पाच किशोरवयीन मित्र बुधवारी दुपारी १२ वाजता आंघोळीसाठी गेले होते. त्यामध्ये रणेन गणेश मंडल, सुब्रत सुशांत वैैष्णव, रजनीरतन साना, राकेश प्रदीप रॉय, प्रताप पंकज मंडल आदींचा समावेश होता. आंघोळीसाठी सर्वांनी आपले कपडे, चप्पल काठावर काढून पाण्यात प्रवेश केला. पाण्याचा अंदाज घेण्याच्या प्रयत्नात दोघेजण अतिशय खोल पाण्यात गेले व बुडायला लागले. तेव्हा जवळच असलेल्या तीन मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र राकेश व प्रताप हे जास्त खोल पाण्यात गेल्याने बुडाले. 


घाबरलेल्या सोबतच्या मित्रांनी या घटनेची वाच्यता केली नाही. मात्र सायंकाळी या घटनेची कुणकुण लागल्यानंतर ६ वाजता सदर माहिती पोलीस ठाणे व तहसीलदारांना देण्यात आली. त्यानंतर चिचडोह बॅरेजचे पाणी बंद करून रात्री ९ वाजता लाईटची व्यवस्था करून रात्रभर शोधकार्य राबविण्यात आले. 
गुरूवारी नवीन पथक बोलावून पहाटे ५.३० वाजतापासून मार्र्कंडादेव ते घटनास्थळापर्यंत मुलांना शोधण्याचे काम सुरू होते. याकरिता बंगाली व ढिवर समाजातील मासेमारांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बोटने आणि मासे पकडण्याच्या जाळीच्या सहाय्याने शोधकार्य सुरू होते. दुपारी १२ वाजता वैैनगंगा नदीपात्रातील २५ फुट खोल पाणी असलेल्या डोहात दोन्ही मृतदेह सापडले. चामोर्शी येथे पाणबुडी उपलब्ध नसल्याने शोधकार्य लांबले. 
दरम्यान गुरूवारी सकाळी ९ वाजता आ.डॉ. देवराव होळी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी  तहसीलदार अरूण येरचे, नायब तहसीलदार तनगुलवार, तलाठी डी.एस.शेडमाके, कालिदास मांडवगडे, पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात, प्रीतम पुजारी, श्यामराव वडेट्टीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.


दुचाकी व कपड्यांवरून घटना उघडकीस
 पाचपैकी दोन मित्र बुडाल्यानंतर उर्वरित तिघे मित्र अर्धा तास घटनास्थळी थांबले. पण नंतर घटनेची माहिती कोणालाही न सांगता ते परत जयनगर येथे गेले. दुपारी ३ वाजता गावातीलच काही युवक आंघोळीसाठी बॅरेजमध्ये गेले असता त्यांना मृत मुलांनी नेलेली दुचाकी, त्यांचे कपडे व चपला दिसून आल्या. दुचाकी ओळखून त्या युवकांनी गावात जाऊन माहिती दिली. त्यानंतर मृतकाच्या आईने सोबत गेलेल्या एका युवकास ‘माझा मुलगा कुठे आहे?’ असे विचारल्यानंतर झालेला प्रकार उघडकीस आला.

Web Title: Two children death In Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.