काळ आला होता, पण वेळ आली नव्हती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:19 AM2018-08-22T00:19:49+5:302018-08-22T00:20:11+5:30

अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडमपासून दोन किमी अंतरावर असलेल्या नंदीगाव नाल्यात सोमवारी सायंकाळी बस कोसळली. पुराच्या वाहत्या पाण्याची ताकद पाहता आता आपला काळ जवळ आला याची जाणीव बस प्रवाशांना झाली, पण त्यांची वेळ आली नव्हती. नंदीगाव, तिमरम व गुड्डीगुडम या तीन गावातील युवकांनी आपला जीव धोक्यात घालून दोरखंडाच्या मदतीने नाल्याच्या प्रचंड प्रवाहातूनही बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

The time had come, but the time had not yet come | काळ आला होता, पण वेळ आली नव्हती

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती

Next
ठळक मुद्देनंदीगावच्या नाल्यातील सुटकेचा थरार : गुड्डीगुड्डम, तिमरम व नंदीगावातील युवक ठरले देवदूत

उमेशकुमार पेंडियाला ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडमपासून दोन किमी अंतरावर असलेल्या नंदीगाव नाल्यात सोमवारी सायंकाळी बस कोसळली. पुराच्या वाहत्या पाण्याची ताकद पाहता आता आपला काळ जवळ आला याची जाणीव बस प्रवाशांना झाली, पण त्यांची वेळ आली नव्हती. नंदीगाव, तिमरम व गुड्डीगुडम या तीन गावातील युवकांनी आपला जीव धोक्यात घालून दोरखंडाच्या मदतीने नाल्याच्या प्रचंड प्रवाहातूनही बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. नाल्यातून बाहेर निघताच प्रत्येक प्रवाशाच्या चेहऱ्यावर मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडल्याचा आनंद आणि भीतीही दिसून येत होती.
आलापल्ली-सिरोंचा मार्गावर नंदीगावजवळ रार्लावाघू नाला आहे. या नाल्याचे पूल कमी उंचीचे आहे. अहेरी तालुक्यात रविवारी व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रार्लावाघू नाला ओसंडून वाहत होता. यादरम्यान गडचिरोली आगाराची एमएच-१४-बीटी-५०६४ क्रमांकाची गडचिरोली-हैदराबाद बस नंदीगाव नाल्यावर पोहोचली. पाण्याच्या प्रवाहाचा वेग पाहून पुलावरून बस टाकण्यास स्पष्ट नकार दिला व बस काही वेळ मार्गाच्या बाजूला उभी केली. तेवढ्यातच एसटी महामंडळाच्या दोन बसेस, एक काळीपिवळी वाहन व स्कारपिओ चालकाने पुलावरून वाहने टाकली. या वाहनांनी पूल सुखरूप पार केला. त्यामुळे हैदराबाद बसमध्ये बसलेल्या प्रवाशांनीही बस टाकण्यासाठी आग्रह केला. प्रवाशांच्या आग्रहाखातर वाहनचालकाने बस पाणी असलेल्या पुलावरून टाकली. मात्र तोपर्यंत पाण्याचा प्रवाह आणखी वाढला होता. त्याचबरोबर पुलाचा अंदाज आला नाही. त्यामुळे बस पुलाच्या खाली कोसळली. यामुळे बसचा समोरचा बहुतांश भाग बुडाला. तर मागच्या भागात खिडक्यांपर्यंत बस बुडाली. अशातच पाण्याचा प्रवाह अतिशय वेगाने सुरू होता. बसमधील प्रवाशांनी व मार्गावर असलेल्या प्रवाशांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. बस नाल्यात कोसळली असल्याची माहिती गुड्डीगुडम, तिमरम व नंदीगाव येथे वाºयासारखी पसरली. तिनही गावच्या युवकांनी नाल्याकडे धाव घेतली. तिमरम येथील आनंदराव चिन्नू मडावी व नंदीगाव येथील जावई असलेला विनोद विस्तारी कर्णम या दोन युवकांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून बसपर्यंत पोहोचले. बसला मागे व पुढे दोन्ही बाजूने दोरखंड बांधून सदर दोरखंड नाल्याच्या काठावरील झाडाला बांधले. त्यानंतर तिमरम येथील सतीश पेंदाम, राकेश सडमेक, रूपेश पेंदाम, गणेश सलके, नरेंद्र सडमेक, आनंदराव मडावी, प्रशांत सडमेक, उमेश पेंड्याला, डॉ.रत्नागिरी, अविनाश पानावार तसेच गुड्डीगुडम येथील श्रीकांत पेंदाम, प्रमोद कोडापे, अनिल गावढे, सुरेश गज्जी, सूरज पेंदाम, धनंजय आत्राम या युवकांनीही घटनास्थळी धाव घेऊन दोरखंडाच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढले. श्रीनिवास पातावार, शासकीय आश्रमशाळेचे अधीक्षक धवंडे यांनी प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था केली. रात्री १०.३० वाजता नाल्यावरील पाणी ओसरले. सर्व प्रवाशांना सकाळी सुखरूप सोडण्यात आले.
युवकांनी अशी केली बस प्रवाशांची सुटका
बस कोसळल्याची माहिती मिळताच गुड्डीगुडम, तिमरम व नंदीगाव येथील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. एसटीच्या समोरच्या भागात अगदी वरपर्यंत पाणी वाहत होते. त्यामुळे मुख्य दरवाजातून बाहेर पडणे शक्यच नव्हते. अशा स्थितीत युवकांनी एसटीच्या मागील बाजूचे आपात्कालीन खिडकीचे काच फोडले. यामधून प्रवाशांना बाहेर काढले जात होते. एसटी व नाल्याच्या झाडाला दोरखंड बांधला. नाल्यातील पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने एसटीमधून निघलेला प्रवाशी पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ नये, यासाठी प्रत्येक प्रवाशाला युवक स्वत: धरून दोरखंडाच्या मदतीने बाहेर काढत होते. सायंकाळी ५ वाजता सुरू झालेले मदतकार्य ७ वाजेपर्यंत सुरू होते. बस कशी कोसळली व मदत कार्याचे वर्णन अंगावर शहारे आणणारे आहे.

Web Title: The time had come, but the time had not yet come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.