अवकाळी वादळाचा पुन्हा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 11:57 PM2019-04-21T23:57:37+5:302019-04-22T00:07:08+5:30

गेल्या तीन ते चार दिवसांपासून अहेरी उपविभागात अवकाळी वादळाने थैैमान घातले आहे. शिवाय मेघगर्जनेसह पाऊस होत असल्याने अनेकांच्या घरावरील छत उडून नुकसान झाले आहे. आता वादळाने उत्तरभाग आपल्या ताब्यात घेणे सुरू केले आहे.

The storm hits again | अवकाळी वादळाचा पुन्हा तडाखा

अवकाळी वादळाचा पुन्हा तडाखा

Next
ठळक मुद्देअर्ध्या जिल्ह्यात धुमाकूळ : शंकरपुरात मुसळधार पाऊस; काटली-साखरादरम्यान झाड कोसळले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या तीन ते चार दिवसांपासून अहेरी उपविभागात अवकाळी वादळाने थैैमान घातले आहे. शिवाय मेघगर्जनेसह पाऊस होत असल्याने अनेकांच्या घरावरील छत उडून नुकसान झाले आहे. आता वादळाने उत्तरभाग आपल्या ताब्यात घेणे सुरू केले आहे. रविवारी आरमोरी, गडचिरोली, देसाईगंज तालुक्यालाही अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला. रविवारी सायंकाळच्या सुमारास वादळाने काटली-साखरादरम्यान मुख्य मार्गावर मोठे झाड कोसळल्याने गडचिरोली-आरमोरी मार्गावरील वाहतूक काही वेळ प्रभावित झाली होती.
देसाईगंज - तालुका मुख्यालयापासून चार किमी अंतरावर असलेल्या सावंगी-गांधीनगर परिसरात रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास गारपीटसह वादळाचा तडाखा बसला. यामुळे गांधीनगर येथील अनेक घरांचे छत कोसळले. काही मार्गावरील झाडे कोसळल्याने वीज तारा तुटल्या. परिणामी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकूणच वादळामुळे देसाईगंज तालुक्यातील जनजीवन प्रभावित झाले आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण देसाईगंज तालुक्याला वादळाचा तडाखा बसला. जवळपास दीड तास वादळी पावसाने तालुक्याला झोडपले. गांधीनगर गावाला वादळाचा सर्वाधिक फटका बसला. अनेक घरांची टिनपत्रे उडाली. तर घरालगतची झाडे पडल्याने घरांचे मोठे नुकसान झाले. गांधीनगर येथील प्रेमदास चहांदे, विनोद चंडिकार, विकास भिमटे, संजय दोनाडकर आदींच्या घराचे मोठे नुकसान झाले. तसेच इतर घरांची अल्प नुकसान झाले.
गडचिरोली - रविवारी सायंकाळच्या सुमारास गडचिरोली शहरासह तालुक्यात अवकाळी वादळी पाऊस बरसला. दरम्यान गडचिरोली-आरमोरी मार्गावर काटली-साखरादरम्यान झाड कोसळले. त्यामुळे काहीवेळ वाहतूक प्रभावित झाली. दरम्यान झाडाच्या बाजूने वाहतूक सुरूच होती. तशी माहितीही गडचिरोली एसटी आगाराचे प्रमुख मंगेश पांडे यांनी दिली. दरम्यान गोगाव व डांबर प्लॅन्टच्यादरम्यान रस्त्यावर वादळाने झाड कोसळले. मात्र वाहतूक सुरूच होती.
विसोरा - उन्हाची तीव्रता अधिकच वाढत असताना २० एप्रिल रोजी शनिवारला सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन देसाईगंज तालुक्याच्या विसोरा, शंकरपूर येथे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसला. अवकाळी वादळाचाही तडाखा या भागाला बसला. उन्हाळी धानपिकाला फटका बसला. शिवाय आंब्याच्या झाडाला लगडून आलेल्या कैऱ्या पडल्या. अवकाळी वादळीपावसाने या भागात आयोजित करण्यात आलेल्या विवाह समारंभ व स्वागत समारंभांना फटका बसला. त्यामुळे वऱ्हाड्यांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणच्या कार्यक्रमातील अन्नाची नासाडी झाली. शनिवारी सायंकाळपासून रात्री ८ वाजेपर्यंत अवकाळी वादळी पाऊस बरसला. त्यानंतर वीजगर्जना थांबल्या. पुन्हा पहाटे ५ नंतर या भागात दमदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे रस्ते ओलेचिंब झाले.
गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागाला अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. परिणामी ग्रामीण भागातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे.
गडचिरोलीत वीज पुरवठ्याचा लपंडाव
रविवारी सायंकाळच्या सुमारास गडचिरोली शहरासह तालुक्यात वातावरणात बदल होऊन वादळ सुटले. वादळामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर झाडे कोसळली. परिणामी गडचिरोली शहरासह बºयाच गावांचा वीज पुरवठा काही वेळेसाठी खंडित झाला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठ्याचा लपंडाव सुरू होता. उन्हाळ्याच्या दिवसात उकाडा जाणवत होता. दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली. ग्रामीण भागात रात्री अनेकदा वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे.
मोसम येथे झाड पडून एक गाय ठार तर पाच जखमी
अहेरी तालुक्याच्या गुड्डीगुडम भागात गुरूवारी अवकाळी वादळी पाऊस बरसला. वादळाने मोसम येथे खूप जुने चिंचेचे झाड कोसळून एक गाय ठर तर पाच जनावरे जखमी झाल्याची घटना घडली. कोसळलेले झाड हे ३०० वर्षांपासूनचे जुने झाड होते. आविसंच्या कार्यकर्त्यांनी झाडाखाली दबलेल्या जनावरांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले. वादळामुळे मोसम गावातील अनेक घरांचे छत उडाले. कवेलू फुटल्या. त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. यावेळी पाहणीदरम्यान मोसमचे उपसरपंच जगन्नाथ मडावी, श्रीनिवास राऊत, जोगेश मडावी, साईनाथ मडावी, गोरेंतराव सडमेक, दौलत मडावी, रामू मडावी, प्रमोद सिडाम, नामदेव मडावी, श्यामराव चिंचोडकर आदी उपस्थित होते.

Web Title: The storm hits again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस