रेशनचे धान्य वाटप जुन्याच पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:41 AM2017-10-28T00:41:04+5:302017-10-28T00:41:18+5:30

कॅशलेस व्यवहार करून डिजीटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न सुरू आहेत.

Ration distribution in old age | रेशनचे धान्य वाटप जुन्याच पद्धतीने

रेशनचे धान्य वाटप जुन्याच पद्धतीने

Next
ठळक मुद्दे‘पॉस’चा वापर २६ टक्केच : इंटरनेटअभावी ग्रामीण भागात मशीन ठरताहेत कुचकामी

मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कॅशलेस व्यवहार करून डिजीटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून गोरगरीबांना दिल्या जाणाºया स्वस्त धान्यासाठीही कॅशलेस व्यवहार करण्याची सक्ती करण्यात आली आहे. पण या व्यवहारात इंटरनेट कव्हरेजअभावी खोळंबा निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांमध्ये लावलेल्या ‘पॉस’ मशिन कुचकामी ठरून ७४ टक्के दुकानदारांकडून जुन्याच पद्धतीने धान्य वाटप केले जात आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य वाटपात केली जाणारी गडबड थांबविण्यासाठी स्वस्त धान्याच्या अनुदानाची रक्कम थेट रेशन कार्डधारकाच्या खात्यात जमा करण्याची पद्धत लागू करण्यात आली. त्यासाठी प्रत्येक रेशन कार्डधारकाने कॅशलेस व्यरहार करावेत म्हणून प्रत्येक रेशन दुकानदाराकडे पॉस मशिन लावण्याची सक्ती पुरवठा विभागाकडून करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील ११९५ दुकानांपैकी ११९३ दुकानदारांनी पॉस मशिन बसविल्या. त्यापैकी ११९१ मशिन कार्यरत करून सरकारी यंत्रणेशी लिंकअप करण्यात आल्या. त्यामुळे कोणत्याही रेशन कार्डधारकाने धान्य खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे चुकते करताच त्याचा हिशेब सरकारी यंत्रणेकडे येईल अशी व्यवस्था यातून करण्यात आली. मात्र एवढी सर्व कसरत केल्यानंतर प्रत्यक्षात मात्र ७४ टक्के व्यवहार अजूनही पॉस मशिनचा वापर न करता जुन्याच पद्धतीने सुरू आहेत.
जिल्ह्यात १ लाख ८८ हजार ८५३ रेशन कार्डधारक आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४८ हजार ६४२ जणांनी मशिनद्वारे कॅशलेस व्यवहार केले आहेत. ग्रामीण भागात इंटरनेट आणि अनेक ठिकाणी मोबाईलचे कव्हरेजच राहात नसल्यामुळे रेशन दुकानदारांसमोर अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आधी इंटरनेट, मोबाईल कव्हरेजची सुविधा द्या, मगच ही सक्ती करा, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
विशेष म्हणजे ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना याचा डिजीटल व्यवहार कसे करायचे याची माहितीसुद्धा नाही. त्यामुळे जुन्याच पद्धतीने आर्थिक व्यवहार करण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. प्रशासनाने जिल्ह्यात सर्वदूर टॉवर उभारून मोबाईल आणि इंटरनेट कव्हरेजची सुविधा देणे गरजेचे झाले आहे.
एटापल्लीत दोन टक्के डिजीटल व्यवहार
डिजीटल व्यवहारात एटापल्ली तालुका सर्वात मागे आहे. या तालुक्यात अवघ्या २ टक्के कार्डधारकांनी पॉस मशिनने रेशन दुकानात व्यवहार केले आहेत. सिरोंचा तालुक्यात हे प्रमाण ८ टक्के तर धानोरा व अहेरी तालुक्यात ९ टक्के लोकांकडून पॉसचा वापर केला जात आहे.
देसाईगंज तालुका आघाडीवर
डिजीटल व्यवहारात देसाईगंज तालुक्यात आघाडी घेतली आहे. या तालुक्यात रेशन दुकानांमध्ये ५१ टक्के लोकांनी पॉसचा वापर केला आहे. गडचिरोली तालुक्यात ४८ टक्के, तर कोरची तालुक्यात ४२ टक्के व्यवहार डिजीटल झाले आहेत. आरमोरी तालुक्यात ३७ टक्केच व्यवहार डिजीटल झाले.

Web Title: Ration distribution in old age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.