१३ हजार हेक्टरवर रबीची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:08 AM2018-12-03T00:08:05+5:302018-12-03T00:10:12+5:30

नोव्हेंबर महिन्याच्या अंतिम आठवड्यापर्यंत जिल्हाभरात १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांची पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे, एकूण रबी क्षेत्राच्या केवळ ५२ टक्के क्षेत्रावरच अजूनपर्यंत पेरणी झाली आहे. पेरणीची कामे सुरू असल्याने पेरणीचे क्षेत्र आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Rabi sowing on 13 thousand hectare | १३ हजार हेक्टरवर रबीची पेरणी

१३ हजार हेक्टरवर रबीची पेरणी

Next
ठळक मुद्दे२५ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी : धान कापणीनंतर मशागतीच्या कामांना आला वेग

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नोव्हेंबर महिन्याच्या अंतिम आठवड्यापर्यंत जिल्हाभरात १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांची पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे, एकूण रबी क्षेत्राच्या केवळ ५२ टक्के क्षेत्रावरच अजूनपर्यंत पेरणी झाली आहे. पेरणीची कामे सुरू असल्याने पेरणीचे क्षेत्र आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. या पिकाची प्रामुख्याने खरीप हंगामात लागवड केली जाते. सुमारे २ लाख हेक्टरवर धानपीक घेतले जाते. धान पिकानंतर काही शेतकरी रबी पिकांचीही पेरणी करतात. काही शेतकऱ्यांकडे रबीसाठी स्वतंत्र शेतजमीन आहे. तर काही शेतकरी धान निघाल्यावर त्याच शेतात रबी पिकांची लागवड करतात. धान कापणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता त्याच बांधीत रबी पिकांची पेरणी करण्याच्या उद्देशाने जमिनीची मशागत करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे, रबी पिकांचे उत्पादन कमी असले तरी यावर खर्चही कमी असल्याने काही शेतकरी रबी पिकांची पेरणी करण्यास प्राधान्य देतात. रबी पिकांना पाण्याची गरज पडत नाही. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापर्यत जमिनीत राहत असलेल्या ओलाव्याच्या भरवशावर सदर पिके टिकतात.
रबी पिकांमध्ये प्रामुख्याने शेतकरी गहू, मका, हरभरा, लाखोळी, मूग, उडीद, बरबटी, कुळता, वाल, पोपट, जवस, रबी तिळ, भूईमूग या पिकांची लागवड करतात. पूर्वी शेतकरी उडीद, मूग, बरबटी, कुळता या पिकांची लागवड करीत होते. आता मात्र शेतकरी नगदी पिकांकडे वळत चालला आहे.
ज्या धान्याला बाजारपेठेत अधिक भाव मिळते व तुलनेने अधिक उत्पादन होते. अशा पिकांना प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच गहू, हरभरा, भूईमूग यासारख्या पिकांचे क्षेत्र वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे.

रबी पिकांसाठी विहिरी ठरल्या वरदान
जिल्ह्यात कन्नमवार जलाशय वगळता मोठा सिंचन प्रकल्प नाही. याही प्रकल्पाचे पाणी केवळ खरीप हंगामासाठीच सोडले जाते. रबीमध्ये या प्रकल्पाचा काहीच फायदा नाही. तलाव, बोड्या, डिसेंबर महिन्यातच आटतात. त्यामुळे रबी पिकांना त्यांचाही फायदा होत नाही. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतकºयांना सिंचन विहिरी देण्यात आल्या आहेत. काही शेतकºयांनी स्वत:हून बोअरवेल खोदले आहेत. यामुळे सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. रोजगाराच्या शोधात इतरत्र भटकण्यापेक्षा रबी पिकांची लागवड करण्यास शेतकरी प्राधान्य देत आहे.
पाच हजार हेक्टरवर लाखोळीचे पीक
लाखोळी हे अतिशय कमी खर्चात येणारे पीक आहे. धान कापणीच्या १५ दिवसांपूर्वी लाखोळीचे बियाणे धानाच्या बांधीत शिंपडली जातात. धानाची कापणी झाल्यानंतर लाखोळीच्या पिकाची वाढ होते. या पिकाला सिंचन, खत, कीटकनाशके आदींची गरज पडत नाही. त्यामुळे या पिकाच्या लागवडीचा खर्च अतिशय नगण्य आहे. केवळ पिकाची कापणी व मळणीचा खर्च येतो. त्यामुळे या पिकाची जिल्ह्यात सर्वाधिक लागवड होते. यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत ५ हजार ५४२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात २४ हजार ९५५ हेक्टर रबीचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यापैकी १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांची लागवड झाली आहे. यामध्ये ज्वारी २६५ हेक्टर, गहू १९८, मका ७५५, हरभरा १ हजार ६०८, लाखोळी ५ हजार २४२, मूग ८६९, उडीद ८९६, बरबटी ४२४, कुळता ४८२, चवळी १०८, पोपट ६६७, जवस ४७०, भूईमूगाची ६६४ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. पेरणीची कामे सुरूच असून त्यामुळे पेरणीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Rabi sowing on 13 thousand hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.