२४ हजारांवर मजुरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:40 PM2019-02-04T22:40:19+5:302019-02-04T22:40:32+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत व यंत्रणास्तरावर मिळून सद्य:स्थितीत जिल्हाभरात एकूण ८७२ कामे सुरू आहेत. या कामाच्या माध्यमातून २४ हजार २४२ नोंदणीकृत मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे. शेतीची कामे संपल्याने गेल्या काही दिवसांपासून रोहयोच्या कामांची मागणी ग्रामीण भागात वाढली आहे.

Employment of 24 thousand workers | २४ हजारांवर मजुरांना रोजगार

२४ हजारांवर मजुरांना रोजगार

Next
ठळक मुद्देजिल्हाभरात ८७२ कामे सुरू : रोहयोच्या कामावर मजुरांची उपस्थिती वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत व यंत्रणास्तरावर मिळून सद्य:स्थितीत जिल्हाभरात एकूण ८७२ कामे सुरू आहेत. या कामाच्या माध्यमातून २४ हजार २४२ नोंदणीकृत मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे. शेतीची कामे संपल्याने गेल्या काही दिवसांपासून रोहयोच्या कामांची मागणी ग्रामीण भागात वाढली आहे.
नोंदणीकृत मजुरांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्याबाबतचा कायदा शासनाने केला असून रोजगार हमी योजनेंतर्गत त्याची अंमलबजावणी केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात जवळपास पाच लाख नोंदणीकृत मजूर आहेत. शेतीची कामे दिवाळीनंतर आटोपल्यावर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दरवर्षी रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी वाढत असते. रोजगार हमी योजनेंतर्गत रस्ते, बोडी, मजगी, मामा तलाव, खोलीकरण, सिमेंट बंधारे, नाला सरळीकरण, शौचालय, नाडेप कंपोस्ट, घरकूल, सिंचन विहीर आदीसह अनेक कामे केली जातात. ही कामे मार्गी लावण्यासाठी नरेगा विभागाच्या वतीने यंत्रणा व ग्रामपंचायत अशा दोन स्तरावर कामाची विभागणी केली जाते. रोहयोच्या कामाचे प्रत्येक ग्रामपंचायतींना उद्दिष्ट दिले जाते. त्यापूर्वी नरेगा विभागाच्या वतीने रोहयो कामाचा वार्षिक आराखडा मंजूर केला जातो. त्यानंतर पंचायत समितीच्या नियंत्रणात ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने रोहयोच्या कामाला प्रारंभ केला जातो.
महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ५० टक्के कामे ग्रामपंचायत व ५० टक्के कामे यंत्रणास्तरावर केली जातात. जिल्ह्यातील एकूण ४५७ ग्रामपंचायतीपैकी २०० वर ग्रामपंचायती मार्फत हद्दितील गावात सद्य:स्थितीत ७१९ कामे सुरू आहेत. या कामांवर १८ हजार ९१ मजूर कार्यरत आहेत. यंत्रणास्तरावर १५३ कामे सुरू असून या कामावर ६ हजार १९१ मजूर कार्यरत आहेत. ग्रामपंचायत व यंत्रणास्तरावर मिळून एकूण ८७२ कामांवर २४ हजार २४२ इतकी मजूर उपस्थिती आहे. विशेष म्हणजे, सदर मजूर उपस्थितीतचा आकडा हा सोमवारचा (दि.४) आहे. रोहयोच्या कामावर पुरूषांसोबतच महिला मजुरही मोठ्या संख्येने जात आहेत. काही गावात बेरोजगार युवक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनीही कुटुंबाला हातभार लागावा म्हणून रोहयोची कामे करीत आहेत.
उन्हाळ्यात रोहयोच्या माध्यमातून जिल्ह्यातील नोंदणीकृत मजुरांना हक्काचा रोजगार प्राप्त होत असतो. गतवर्षी सुध्दा रोजगार हमी योजनेतून अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली होती.

ही कामे सुरू आहेत प्राधान्याने
रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सद्य:स्थितीत मजगी, बोडी, शौचालय, घरकूल, शोषखड्डे, पांदन रस्ते, सिंचन विहीर, वर्मी कंपोस्ट आदी कामे प्राधान्याने केली जात आहेत. बाराही तालुक्याच्या ग्रामीण भागात हीच कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. प्रशासनाच्या वतीने ही कामे गतीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दोन दिवसांत १० हजार मजूर वाढले
रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४५७ ग्रामपंचायतीपैकी १५० वर ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये ४८६ कामे सुरू आहेत. २ फेब्रुवारी रोजी शनिवारला या कामांवर ७ हजार ८५९ इतकी मजूर उपस्थिती होती. दोन दिवसात ग्रामपंचायतस्तरावरील कामांमध्ये वाढ झाली असून मजूर उपस्थितीचा आकडाही वाढला आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसात तब्बल १० हजार २३२ इतकी मजूर उपस्थिती वाढली आहे. आणखी येत्या चार-पाच दिवसांत मजूर उपस्थितीचा हा आकडा ३५ हजारवर पोहोचण्याची शक्यता आहे.

घरकूल लाभार्थ्यांना ९५ दिवसांची अतिरिक्त मजुरी
रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाच्या विविध योजनेंतर्गत घरकुलाचे बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या घरकुलाच्या कामाची अतिरिक्त मजुरी दिली जाते. घरकूल लाभार्थ्यांना ९५ दिवसाच्या मजुरीची रक्कम दिली जाते. शासनाच्या योजनेंतर्गत घरकूल लाभार्थ्यांना १ लाख ३० हजार रूपये अनुदान दिले जाते. यामध्ये नरेगा अंतर्गत ९५ दिवसांची मजुरी म्हणून २० हजार रूपये अदा केली जातात. अशा प्रकारे घरकूल लाभार्थ्यांना एकूण १ लाख ५० हजार रूपयांचा लाभ दिला जातो. विशेष म्हणजे, घरकूल बांधकामादरम्यान संबंधित नोंदणीकृत मजूर इतरत्र कोणत्याही कामावर जात नसल्याने त्याची मजुरी बुडते. भरपाई म्हणून नरेगा अंतर्गत ९५ दिवसांची मजुरी दिली जाते.

Web Title: Employment of 24 thousand workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.