बत्ती गूल होताच ४९ लाख वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:32 AM2017-11-24T00:32:06+5:302017-11-24T00:32:34+5:30

वीज पुरवठा खंडित होताच काही नागरिकांनी वीज बिल भरण्यास सुरूवात केली आहे. २१ व २२ नोव्हेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत सुमारे २ हजार ६२६ नागरिकांचा वीज पुरवठा खंडित केला होता.

4 lakh in recovery | बत्ती गूल होताच ४९ लाख वसूल

बत्ती गूल होताच ४९ लाख वसूल

Next
ठळक मुद्देवसुलीचा धसका : दोन दिवसात २ हजार २६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वीज पुरवठा खंडित होताच काही नागरिकांनी वीज बिल भरण्यास सुरूवात केली आहे. २१ व २२ नोव्हेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत सुमारे २ हजार ६२६ नागरिकांचा वीज पुरवठा खंडित केला होता. त्यापैकी सुमारे २ हजार २०९ नागरिकांनी तत्काळ वीज बिलाचा भरणा केला आहे. दोन दिवसांत सुमारे ४९ लाख ९२ हजार रूपयांची वसुली झाली आहे. नाक दाबल्यानंतर तोंड आपोआप उघडते, याची प्रचिती वीज कंपनीला येत असल्याने वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्याची शक्यता आहे. ४७१ ग्राहकांनी मात्र अजूनपर्यंत वीज बिल भरले नसल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडीतच आहे.
विजेचे बिल महिन्याला पाठविले जात असले तरी १०० टक्के वसुली कधीच होत नसल्याने दिवसेंदिवस वीज विभाग अडचणीत आला आहे. त्यामुळे थकबाकीदारांवर कारवाई करून वसुलीचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश वीज विभागाने दिले आहेत. त्यानुसार महावितरणचे गडचिरोली अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के यांनी ५०० रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांची वीज जोडणी खंडीत करण्याचे निर्देश दिले आहेत. वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम २१ नोव्हेंबरपासून हाती घेण्यात आली आहे. गडचिरोली अधीक्षक अभियंता कार्यालयांतर्गत गडचिरोली, ब्रह्मपुरी व आलापल्ली या तीन विभागांचा समावेश होतो. या तिन्ही विभागांमध्ये वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गडचिरोली विभागात एकूण १ लाख १४ हजार २९२, आलापल्ली विभागात ८२ हजार २९० वीज ग्राहक आहेत. महिन्याला वीज बिल भरणे सक्तीचे असले तरी काही नागरिक दोन ते तीन महिने उलटूनही वीज बिल भरत नाही. अशा थकबाकीदारांवर कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. २१ ते २२ नोव्हेंबर या दोन कालावधीत जिल्ह्यातील २ हजार ६२६ थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. काही नागरिकांनी वीज खंडीत होताच बिल भरले. त्यांचा वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. ज्यांनी वीज बिल भरले नाही अशांचा मात्र वीज पुरवठा अजूनही खंडितच आहे.

वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई महावितरणला करावी लागत आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यास संबंधित व्यक्तीची समाजात बदनामी होते. काही दिवस वीज पुरवठा खंडीतच राहिल्यास अंधारात रात्र काढून शारीरिक त्रासही सहन करावा लागतो. थकीत वीज बिल भरण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळे नियमित वीज बिल भरावे.
- अशोक म्हस्के, अधीक्षक अभियंता, महावितरण गडचिरोली

३६२ कर्मचारी मोहिमेवर
वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ३६२ कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली डिव्हिजनमधील २१० कर्मचारी व आलापल्ली डिव्हिजनमधील १५२ कर्मचाºयांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी डिव्हिजनमध्येही १२३ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. वीज बिल भरण्याची तारीख संपूनही वीज बिल न भरलेल्या नागरिकांची माहिती घेऊन वीज पुरवठा खंडित केला जात आहे. वीज विभागाच्या या मोहिमेमुळे थकबाकीदार ग्राहकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला वीज भरण्याचा सल्ला सुध्दा काही लाईनमन थकबाकीदारांना देत आहेत.
सहा कोटींच्या वसुलीचे आव्हान
गडचिरोली व आलापल्ली विभागातील २७ हजार ७५८ नागरिकांकडे ५ कोटी ७८ लाख रूपयांचे वीज बिल थकले आहे. तेवढी रक्कम वसुली करणे वीज विभागासमोरील मोठे आव्हान आहे. थकबाकीचे प्रमाण कमी करण्यासाठीच वीज विभागाने वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
गडचिरोली उपविभागात ९९ लाख, आरमोरीत २५ लाख, देसाईगंज ५१ लाख, कुरखेडा ३६ लाख, धानोरा ३० लाख, कोरची १० लाख, आलापल्ली ११७ लाख, चामोर्शी ७३ लाख, एटापल्ली ४४ लाख, सिरोंचा ४४ लाख, मुलचेरा १५ लाख व भामरागड उपविभागात ३४ लाख रूपये थकीत आहेत.

Web Title: 4 lakh in recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.