तान्हा पोळ्याची ३५ वर्षांची पंरपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:00 PM2017-08-21T23:00:34+5:302017-08-21T23:01:01+5:30

तान्हा पोळा सण म्हणजे, बालकांच्या उत्साहाचा दिवस. यादिवशी लहान मुले लाकडांपासून बनविलेला नंदीबैैल सजवून त्याची पूजा करतात.

35-year-old fashion trends | तान्हा पोळ्याची ३५ वर्षांची पंरपरा

तान्हा पोळ्याची ३५ वर्षांची पंरपरा

Next
ठळक मुद्देसांस्कृतिक वैभव : विसोरात तीन नंदीबैलांच्या साक्षीने सुरू झालेला उत्सव विस्तारला

अतुल बुराडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : तान्हा पोळा सण म्हणजे, बालकांच्या उत्साहाचा दिवस. यादिवशी लहान मुले लाकडांपासून बनविलेला नंदीबैैल सजवून त्याची पूजा करतात. शोभायात्रा सुध्दा काढतात. जिल्ह्यातील नावाजलेले तथा सामाजिक, सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या विसोरा गावातही दरवर्षी तान्हा पोळानिमित्त मोठा आनंदोत्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे अवघ्या तीन नंदीबैलांच्या साक्षीने सुरु केलेला हा उत्सव आज तब्बल ३५ वर्षांचा झाला आहे.
शेती करतांना बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण वर्षभर दिवसरात्र राबराब राबणाºया बैलांना पुजण्याचा नव्हे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा ग्रामीण जीवनातला एक मुख्य सण पोळा. पोळ्याच्या दुसºया दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो.
विसोरा येथील प्रतिष्ठित व्यक्ती सुखदेव मुंडले यांनी १९८३ रोजी महेश या आपल्या मुलाच्या हट्टापायी तान्हा पोळा सुरु करण्याचा मानस सहकाºयांसमोर व्यक्त केला. राष्ट्रसंताचे अनुयायी लव्हाजी वाघाडे गुरुजी आणि किसन राऊत या मित्रांनी त्यांना होकार देताच मुंडले यांना आनंद झाला. लागलीच तान्हा पोळ्याच्या दिनी नंदीबैल सजवून पूजा-अर्चा करण्यात आली. वाघाडे गुरुजींच्या भजनी मंडळींच्या सहयोगाने तान्हा पोळानिमित्त नंदीबैलाची गावात मिरवणूक काढण्यात आली. पहिल्या वर्षी फक्त तीन नंदीबैल यामध्ये सहभागी झाले होते. सुखदेव मुंडले यांचे कुटूंब, घरशेजारी व मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत अगदी आनंदात तान्हा पोळा साजरा करण्यात आला. पोटच्या लहान मुलाखातर सुरु केलेला तान्हा पोळा त्यानंतरही साजरा करण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. वर्षानुवर्षे कधीही खंड पडू न देता प्रत्येक वर्षी सुखदेव मुंडले यांनी तान्हा पोळा उत्सव सुरुच ठेवला. पस्तीस वर्षांपूर्वी मोजक्या सहकाºयांच्या साथीने आरंभलेल्या या उत्सवाला कालांतराने गावातील अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने उत्सवातील नंदीबैलांची संख्या वाढत गेली. त्यामुळे आजघडीला या तान्हा पोळ्याला संपूर्ण गावाच्या उत्सवाचे रुप प्राप्त झाले आहे.
तान्हा पोळा सणाला सुखदेव मुंडले यांच्या घरी जणू यात्रेचे स्वरुप प्राप्त होत असते. तान्हा पोळादिनी मुंडले यांच्या घराजवळ उत्सवात सहभागी होण्यासाठी गावातील शेकडो बालक आपल्या सजवलेल्या नंदीबैलासह येतात. सर्वप्रथम सुखदेव मुंडले सपत्निक नंदीबैलाची पूजा करतात. त्यानंतर गावचे प्रथम नागरिक सरपंच फित कापून नंदीबैल शोभायात्रेला सुरुवात करतात. वाजतगाजत गावातून भव्य मिरवणूक काढली जाते. सदर उत्सवातील सर्वच्या सर्व बालकांना बक्षीस दिल्या जाते. यासाठी स्वत: मुंडले कुटूंब तसेच ग्राम पंचायत, गावातील प्रतिष्ठित नागरिक सहकार्य करतात. भजनी मंडळी, मोहल्ल्यातील नागरिक सर्वतोपरी मदत करीत असतात. संपूर्ण गावाच्या पाठिंब्यामुळे उत्सवाला नागरिकांची गर्दी लाभते. गावात आनंद व उत्साहाचे वातावरण दोन दिवस असते.
१९८० च्या दरम्यान मी नोकरीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील पद्मापूर येथे कार्यरत होतो. तिथूनच तान्हा पोळा साजरा करण्याची प्रेरणा मला मिळाली. मागील पस्तीस वर्षांपासून सुरु असलेली ही परंपरा यापुढेही अखंड सुरुच राहावी हीच आपली इच्छा आहे, असे सुखदेव मुंडले यांनी याप्रसंगी सांगितले.
सर्वधर्मियांच्या पुढाकाराने तुळशीत साजरा होतो तान्हा पोळा
विष्णू दुनेदार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुळशी : जमीन कसून, पिकवून अन्नधान्य निर्माण करणारा शेतकरी खºया अर्थाने अन्नदाता. अन्नदात्याचा सखा असलेला बैल त्याच्या दृष्टीने जीव की प्राण असतो. अशा बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून बैलपोळा साजरा केला जातो. बैल पोळ्यानंतरचा दुसरा दिवस म्हणजे तान्हा पोळा. तुळशी येथे जि. प. शाळेत १९७५ मध्ये कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण बेत्तावार गुरुजींनी त्यावेळी तान्हा पोळयाची परंपरा सुरु केली. बेत्तावार गुरुजी मूळचे चिमूरचे. मात्र गुरुजींनी सुरु केलेली परंपरा ४० वर्षांपासून तुळशीवासीय जोपासत आहेत हे विशेष. तुळशी येथील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती. सुरवातील गावात १०० ते १५० बैल जोड्या होत्या व बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता.परंतु शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात काम करणाºया बेत्तावार गुरुजींनी मात्र मुलांच्याही मनात बैलांबद्दल, पशुधनाबद्दल प्रेम आणि जिव्हाळा निर्माण व्हावा या उद्देशाने त्यावेळी तुळशी येथील हनुमान मंदिराच्यासमोर तान्हा पोळा भरविण्याची परंपरा सुरु केली. ही पंरपंरा आजही तुळशीवाशीय जोपासत आहेत. तुळशी येथील तान्हा पोळयाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वधर्मीय बालगोपाल व गाववासीय हनुमान मंदिराच्या प्रांगणात एकत्र येतात. गावामधील काही मंडळी लोकांकडून लोकांच्या स्वच्छेने वर्गणी गोळा करतात. या निमित्याने बालकांसाठी स्पर्धांचे आयोजन करतात. गावातील मानाचा मोठ्या नंदीबैलाची गावकरी भजन ,दिंडीसह मिरवणूक वाजतगाजत हनुमान मंदिराजवळ आणतात. त्याठिकाणी मोठ्या नंदीबैलाची पूजा झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते छोट्या बालकांना बक्षीस दिल्या जाते. संदर्भ बदलेले तरी आदीम संस्कृतीशी नाते सांगणारा बैल पोळ्याच्या सणाचे अस्तित्व तान्हा पोळ्याच्या रूपाने इथल्या मातीशी व प्राणीमात्रांशी शेतकºयांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते जपण्याचा प्रयत्न तुळशीवासीय करत आहेत. येथील तान्हा पोळा हा त्याचेच निदर्शक आहे.

Web Title: 35-year-old fashion trends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.