अर्जेंटिनाने सपशेल शरणागती पत्करली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 04:11 AM2018-06-23T04:11:20+5:302018-06-23T04:11:41+5:30

ज्यांनी त्याला देवत्व बहाल केले, तेच चाहते आता त्याच्यावर दगडफेक करतील काय, अशी भीषण परिस्थिती लिओनेल मेस्सीसमोर उभी ठाकली आहे.

Argentine surrendered surrender | अर्जेंटिनाने सपशेल शरणागती पत्करली

अर्जेंटिनाने सपशेल शरणागती पत्करली

Next

- रणजीत दळवी
ज्यांनी त्याला देवत्व बहाल केले, तेच चाहते आता त्याच्यावर दगडफेक करतील काय, अशी भीषण परिस्थिती लिओनेल मेस्सीसमोर उभी ठाकली आहे. त्याच्या गतवेळच्या उपविजेत्या संघावर पहिल्याच फेरीत बाद होण्याचे मोठे संकट आले आहे. पाच वेळा अंतिम फेरी गाठून ती दोन वेळा जिंकणाऱ्या अर्जेंटिनाला आता शेवटच्या मुकाबल्यामध्ये नायजेरियाला मोठ्या फरकाने लोळवावे लागेल. क्रोएशियाने गुरुवारी रात्री दमदार विजयासह आगेकूच केली आहे.
मात्र, या गटातून दुसरा संघ कोणता, याचा निकाल फार गुंतागुंतीचा बनला आहे. सर्व काही उर्वरित तीन संघांच्या निकालांवर अवलंबून राहील. नायजेरिया - आइसलँड सामन्याचा निकाल काहीही लागो, अर्जेंटिनाला आपली नायजेरियाशी होणारी शेवटची लढत फारच मोठ्या फरकाने जिंकावी लागणार हे नक्की.
आपल्या १२-१३ वर्षांच्या प्रदीर्घ क्लब आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये प्रथमच मेस्सी असा कोंडीत सापडला आहे. मधल्या काळात कर चुकवेगिरीच्या वादात तो अडकला आणि इतकी वर्षे जगातील सर्वोत्तम बिरूद त्याला ज्यांनी चिकटविले, त्याने तो पूर्णपणे कोसळला आहे. का बरे त्याच्याकडून एवढ्या अपेक्षा? का त्याच्यावर कायमचे जिंकण्याचे ओझे? एखाद्या राष्ट्राच्या सेनापतीने सतत युद्ध करावे आणि केव्हाच हरू नये, असा त्याच्यावर दबाव?
तसे पाहावयास गेले, तर कालच्या पराभवाचे खापर एकट्या मेस्सीवर फोडता येणार नाही. त्यात खरा गुन्हेगार होता चेल्सीचा गोलरक्षक विली कॅबेयारा. बॅकपास केलेला चेंडू खेळताना केलेली चूक महागडी ठरली. केवढा निष्काळजीपणा! हल्ली फुटबॉल बारकाईने पाहणारा शाळकरी पोरगाही अशी चूक करणार नाही. विलीची मस्तीच भोवली. त्यानंतर, लुका मॉड्रिकच्या अप्रतिम गोलने अर्जेंटिनाच्या जखमांतून आणखीन रक्त भळभळून वाहू लागले. अर्जेंटिनाने सपशेल शरणागती पत्करली. उद्या अर्जेटिना स्पर्धेबाहेर गेला, तर कॅबेयारा मायदेशी परतू शकेल किंवा मेस्सी तिकडे जाण्याचे धाडस दाखवेल. ही लॅटिन अमेरिकन फुटबॉलची नव्हे, तर एकूण तेथली संस्कृतीच तशी आहे!
दुसरीकडे, स्पेनला नशिबाने चांगलाच हात दिला. दिएगो कोस्टाला तो विजयी गोल झाला कसा हे समजलेच नाही. मात्र, चेंडू गोल जाळीत विसावताच, त्याला जल्लोष कसा करावयाचा ते अवश्य समजले. त्यानंतर, इराणने स्पेनवर गोल केला. एझातोलाहीला तो केल्याचे समजले व सर्वत्र जल्लोष झाला, पण तिकडे असिस्टंट रेफरी मॉरिसिओ एस्पिनोझा यांचा झेंडा वर गेला. एझातोलाही ‘आॅफ साइड’ असल्याचे व्हिडीओ असिस्टंट रेफ्रीने (वार) पुष्टी करताच, माजी जगज्जेत्यांच्या गोटात जल्लोष झाला. एवढ्यातून नैय्या पार पडल्यावर त्यांनी खरे तर सामन्याचा निकालच लावून टाकायला हवा होता. त्यामुळे स्पेन शेवटपर्यंत ‘गॅस’वर होता. खेळ संपण्यास दहा मिनिटे असताना, जर आमिरिच्या क्रॉसवर मेहदीचा तो जोरदार हेडर जर अचूक असता तर? खरोखरंच स्पेन नशीबवान!
स्पेनची शेवटची साखळी लढत होईल मोरोक्कोशी, ज्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे, पण डोकेदुखी होणार आहे पोर्तुगालला. इराणचे स्पर्धेतले आव्हान जिवंत आहे. त्यांना जर विजय मिळविता आला, तर पोर्तुगालच्या हाती परतीचे तिकीट! स्पेनला शेवटच्या लढतीत बरोबरी चालू शकते, पण ते खेळतील विजयासाठीच! स्पॅनिश आरमार आता बºयापैकी स्थिर झाले आहे. हेलकावे थोडे फार बसत आहेत, पण एकदा का त्यांना सफाईने गोल करण्यात यश आले, तर त्यांच्या शिडात हवा भरेल आणि मग काय? तोफा धडाडू लागतील. फुटबॉलच्या सच्च्या चाहत्यांना तर तेच हवे आहे.

Web Title: Argentine surrendered surrender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.