No time for make up. Use these 7 make up tips. | घाई घाईत तयार होताय. या सात टिप्स वापरा आणि सुंदर दिसा!

ठळक मुद्दे* केस धुवायला वेळ नाही. पण केसांचा अवतार तर नीट करायचाय. अशा वेळी कोरड्या शाम्पूचा पर्याय वापरावा.* आॅफिसमधून लगेचच कुठे बाहेर जायचं असेल आणि केसांची जरा आकर्षक स्टाइल हवी असेल तर ती दोन मिनिटात करता येते. यासाठी पर्समध्ये बनाना क्लिप ठेवावी.* चेहरा सतत फुललेला दिसण्यासाठी तो छान ओलसर दिसणं गरजेचा असतो. यासाठी गुलाब पाण्याचा वापर करावा.- माधुरी पेठकर


नोकरदार महिला म्हणजे सतत घाईत असणा-या. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत कामात. स्वत:कडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही. मग निवांत आरशासमोर वेळ घालवून मेकअप करणं तर त्यांच्या आयुष्यातला दुर्मिळ योग.
पण सतत घाई आणि कामं असली तरी छान तर त्यांनाही दिसायचं असतं. घर आणि आॅफिस सांभाळून त्यांनाही कुठे छोट्या मोठ्या पार्टीला, कार्यक्रमाला जायचं असतं. तिथे जाताना नेहेमीचा चेहे-यावरचा थकवा आणि त्रासलेलपण बाजूला ठेवून छान दिसावं असं त्यांनाही वाटतं. पण छान दिसायचं तर मग मेकअप हवा. आणि मेकअपसाठी तास दोन तास वेळ घालवण्याएवढा वेळ कुठे असतो? पण म्हणजे नोकरदार महिलांनी, सतत कामात असलेल्या महिलांना मेकअप करायचाच नाही का? तर असं मुळीच नाहीये. खरंतर सतत घाईत असलेल्या महिलांसाठी घाईतल्या मेकअपचा पर्यायही उपलब्ध आहे. त्यासाठी हे सात उपाय करायला हवेत. हे सात उपाय करून कितीही घाई असली आणि कार्यक्रमाला पटकन पोहोचायचं असलं तर आपण छान आणि आकर्षक दिसू शकतो.

 


 

घाईतल्या मेकअपच्या सात युक्त्या

1) एकदम सकाळी एखाद्या कार्यक्रमाला जायचंय . पण केस धुवायला वेळ नाही. पण केसांचा अवतार तर नीट करायचाय. अशा वेळी कोरड्या शाम्पूचा पर्याय वापरावा. हा स्प्रे फॉर्ममध्येही मिळतो. हा शाम्पू केसांच्या मुळांवर स्प्रे करावा. आणि नंतर केसांवर कंगवा फिरवावा. केसांमधलं सर्व तेल आणि कचरा यामुळे निघून जातो आणि केस स्वच्छ दिसतात. दुस-या दिवशी सकाळी डोकं धुवावं. आणि समजा तेव्हाही घाई असेल तर केस धुतल्यानंतर लगेच टॉवेलमध्ये किंवा कॉटनच्या टी शर्टनं बांधावेत. टी शर्टमध्ये केसांचा ओलावा लवकर शोषला जातो. आणि केसांमधली नैसर्गिक आद्रता टिकून राहाते. याचा उपयोग केस सुंदर दिसण्यासाठी होतो. किंवा केस धुतल्यावर केसांना सिरम लावावं.
2) हात -पाय छान दिसण्यासाठी पेडिक्युअर आणि मॅनिक्युअरचा पर्याय असतो. पण त्यासाठी पार्लरमध्ये जावून ते करायला वेळ नसेल तर घरच्या घरी अगदी कमी वेळेत हात पायाला पेडिक्युअर आणि मॅनिक्युअरचा इफेक्ट देता येतो. यासाठी हाता पायांना झोपण्यापूर्वी रोज पेट्रोलियम जेली लावावी. रात्रीभर ठेवावी. जेली लावून झाल्यावर हाता पायात सॉक्स घालावेत.
3) कधी रात्री एखाद्या कार्यक्रमावरून परतताना उशिर होतो. मग झोपायलाही उशिर होतो. सकाळी रोजच्या वेळेत तयार व्हावं लागतं. त्यामुळे पुरेशी झोप होत नाही. अशा वेळेस डोळे सुजल्यासारखे दिसतात. ज्यामुळे आपला पूर्ण लूक बिघडतो. यासाठी स्किन कलरची किंवा पांढ-या रंगाची पेन्सिल डोळ्याच्या खालच्या भागावर फिरवावी. आणि लगेच आय लायनर लावावं.
4) आॅफिसमधून लगेचच कुठे बाहेर जायचं असेल आणि केसांची जरा आकर्षक स्टाइल हवी असेल तर ती दोन मिनिटात करता येते. यासाठी पर्समध्ये बनाना क्लिप ठेवावी. ही क्लिप वापरून केस वर बांधून केसांची पफ स्टाइल करता येते. किंवा मग केस मस्त उंच बांधून पोनी टेलची स्टाइल करावी.

 

5) प्रत्येकीच्या घरात काही विविध रंगाच्या लिपस्टिकचा सेट नसतो. पण कधी कधी एखाद्या विशिष्ट रंगाच्या लिपस्टिकची अतिशय गरज वाटते. मग यासाठी ओठांना चांगल्या प्रतीचं मॉश्चरायझर किंवा जेली लावावी. आणि हवा असलेला शेडचा आयशॅडो लिपस्टिक म्हणून लावावा. अशा पध्दतीनं आय शॅडोचा उपयोग लिपस्टिकची गरज भागवू शकतो.
6) चेहरा सतत फुललेला दिसण्यासाठी तो छान ओलसर दिसणं गरजेचा असतो. यासाठी गुलाब पाण्याचा स्प्रे   चेहे-यावर अधून मधून फवारावा.
7) पापण्या छान टोकदार दिसण्यासाठी कापसाचा बोळा बेबी पावडरमध्ये बुडवावा. आणि पापण्यांभोवती फिरवावा. यानंतर परत एकदा मस्कारा लावावा.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.