निसर्गाने केलेली रंगाची मुक्त उधळण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2016 01:06 PM2016-03-13T13:06:19+5:302016-03-13T06:06:19+5:30

फुलपाखरू हे गेल्या कित्येक वर्षांपासून आपले असित्व टिकवून असले तरी मागच्या काही वर्षांत फुलपाखरांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. 

Natural color-free evaporation | निसर्गाने केलेली रंगाची मुक्त उधळण

निसर्गाने केलेली रंगाची मुक्त उधळण

googlenewsNext
ong>प्रतिवर्षी पावसाळ्याच्या सुमारास आपणास फुलझाडांच्या बागेत विविध रंगांची व चित्रविचित्र नक्षीने युक्त असलेल्या पंखांची फुलपाखरे या फुलावरून त्या फुलावर स्वच्छंदपणे उडताना पाहतो. रंगीत व मनोहर पंखांमुळे हे कीटक उडताना लहानथोरांचे लक्ष आपल्याकडे सहजतेने आकर्षून घेतात. फुलपाखरू हे गेल्या कित्येक वर्षांपासून आपले असित्व टिकवून असले तरी मागच्या काही वर्षांत फुलपाखरांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

ही संख्या वाढावी, या देखण्या फुलपाखरांचे महत्त्व नव्या पिढीलाही कळावे, यासाठी पाश्चिमात्य देशात दरवर्षी 14 मार्च रोजी   Learn About Butterflies Day Spring  म्हणजेच फुलपाखरांचा दिवस साजरा केला जातो. या दिवशी मुलांना फुलपाखरांची माहिती देण्यासाठी बाहेर किंवा बागेत फिरायला घेऊन जाता यावे व या निमित्ताने निसर्गाने सृष्टीवर उधळलेल्या विविध रंगाची माहिती मिळावी हा यामागचा उद्देश आहे.

हे कीटक लेपिडॉप्टेरा गणातील आहेत. ‘लेपिडॉप्टेरा’ या शब्दाचा अर्थ ‘ज्याच्या पंखावर विपुल खवले आहेत असा प्राणी’ असा आहे. याच गणात पतंगांचाही अंतर्भाव होतो फुलपाखरांच्या पंखाला हात लावला असता आपल्या हाताला धुरळ्यासारखे लहान रंगीत कण लागतात. काही रंगीत कण खवल्यांच्या आतील बाजूला चिकटलेले असतात. या खवल्यांतील रंगीत कणांमुळेच पंख रंगीत भासतात.

फुलपाखरांच्या पंखांवरील विविध रंगीबेरंगी नक्षीकाम कापडधंद्यातील लोकांना कापडावर निरनिराळ्या रंगांची व आकृतींची छपाई करण्यासाठी नमुन्यादाखल उपयोगी पडते. पापुआ न्यू गिनीतील पाचशेहून अधिक खेड्यांत फुलपाखरांची मोठ्या प्रमाणावर पैदास करण्यात येते. याकरिता फुलझाडांची मंडलाकार लागवड करून मधल्या भागात डिंभांना खाण्यासाठी उपयुक्त असलेल्या पानांच्या झुडपांची लागवड करण्यात येते. असंख्य वन्य फुलपाखरे येथे येत असल्यामुळे त्यांची सतत पैदास होत राहते. येथील लाखो फुलपाखरे पकडून ती कीटकवैज्ञानिक, संग्रहालये, खाजगी संग्राहक इत्यादींना विकण्यात येतात. सामान्यत: पंख प्लास्टिकमध्ये बसवून शोभिवंत वस्तू बनविण्याकरिता वापरण्यात येतात.

फुलपाखरांच्या पैदाशीची ही पद्धती नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या फुलपाखरांच्या जातींचे संरक्षण करण्यासाठीही वापरणे शक्य आहे. फुलपाखरांसोबत जगण्याचा आणि त्यांची माहिती जाणून घेत त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे. म्हणूनच आज आम्ही फुलपाखरांचे संगोपण करण्याच्या पाच खास टीप्स वाचकांशी शेअर करीत आहोत. 



- फुलांची बाग तयार करा
फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी व त्यांचे सौंदर्य जपण्यासाठी सर्वांत सोपा मार्ग म्हणजे फुलपाखरांसाठी बाग तयार करणे. विशेष म्हणजे यात लाल रंगाच्या फुलांचा समावेश असलेल्या फुलझाडांचा समावेश असणे गरजेचे आहे. त्यापाठोपाठ पिवळ्या फुलांची झाडे लावावित. बागेत लावलेल्या झाडांमध्ये व्यवस्थित अंतर असावे. सूर्यप्र्रकाश जमिनीपर्यंत पोहचायला हवा. फुलपाखरांची संख्या वाढण्यासाठी गोडपदार्थांची गरज असते. यामुळे येथे काही गोड चव असणारी छोटी रोपटी लावावित. बागेत दगडांची व्यवस्था असावी सोबतच जमिनीत ओलावा राहवा यासाठी प्रयत्न केले पाहिजे. भारतातील काही शहरांत अशा बागा तयार करण्यात आल्या आहेत. अभ्यासक व शालेय विद्यार्थी तेथे फुलपाखरांची माहिती मिळवितात. 

- फु लपाखरांची गाणी गा
फुलपाखरू हे लहान मुलांना कायम हवेहवेसे वाटत असते. लहानपणी अनेकांनी फुलपाखरू पडकण्यासाठी त्यांचा पाठलाग केलाच असेल. आई देखील आपल्या मुलासाठी ‘फूलपाखरू’ हे विशेषन वापरते. प्रेमी युगुल देखील एकमेकांना ‘फुलपाखरू’ अशी उपमा देऊन प्रेम व्यक्त करताना दिसतात. यावरून फुलपाखरू हे आपल्या किती जवळ आहे याची जाणीव होते. फुलपाखरू दिवसाच्या निमित्ताने फुलपाखरांवरील गाणी गाता येतील. अशी अंताक्षरी देखील बागेत जाऊन खेळता येईल. फुलपाखरांवरील अनेक गीते तुम्हाला इंटरनेटवर मिळू शकतात. 

- आवडणारी रेसिपी बनवा
लहान मुलांना जसे गोड पदार्थ आवडतात त्याच प्रमाणे फुलपाखरांना देखील गोड पदार्थ म्हणजेच फळे,फळांचा व फुलांचा रस आवडतो. या दिवशी फळांपासून तयार केलेल्या रेसिपी पालकांनी मुलांना करून द्याव्यात. विशेष म्हणजे, काही फळांना फुलपाखरांचा आकार देता येतो. सफरचंदाचे उभे पातळ काप केले तर त्याला फुलपाखरासारखा आकार मिळतो. फ्रुट ज्यूस व फुलांनी सजविलेल्या खाद्यपदार्थांची लज्जतदार पार्टी या निमित्ताने ठेवता येईल. 



- फुलपाखरांच्या माहितीचे आदान- प्रदान 
फुलपाखरांच्या शरीराचे तापमान 86 फॅरेनाईटच्यावर पोहोचल्यावर त्याला उडता येत नाही. हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. अशाच काही गोष्टींची माहिती तुम्हाला आपल्या मुलांना देता येईल. फुलपाखरांबद्दलची सर्व माहिती जरी देता आली नाही तरी निसर्गात फुलपाखरांची भूमिका या विषयावरील चर्चा मुलांसोबत करावी. यामाध्यमातून मुलांना फुलपाखराबद्दल बरेच काही माहिती होऊ शकते.

- फुलपाखरांवरील चित्रे काढा 
फुलपाखरांच्या पंखावरील विविध रंग मुलाना चित्रे काढण्यासाठी प्रेरित करू शकते. या माध्यमातून निसर्गाशी जवळीक निर्माण केली जाऊ शकते. फुलपाखरांच्या आकाराचे ग्रिटिंग्स देखील मुलांना भेट म्हणून देऊ शकता. एखाद्या क्रॉफ्ट टीचरची यात मदत मिळाल्यास फारच उत्तम ती फुलपाखरांच्या आकाराच्या विविध वस्तूंची माहिती नक्कीच मुलांना देईल.

Web Title: Natural color-free evaporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.