अमेरिकी माध्यमांचा कौतुकास्पद निर्धार

By विजय दर्डा | Published: November 19, 2018 12:25 AM2018-11-19T00:25:55+5:302018-11-19T00:26:21+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेथील माध्यमांना खुलेआम देशद्रोही म्हणावे यावरूनच परिस्थिती किती गंभीर आहे, याची कल्पना यावी. खरे तर स्वत: ट्रम्प बेलगाम होत चालले आहेत, याचेच हे लक्षण आहे!

 Wonderful determination of American media | अमेरिकी माध्यमांचा कौतुकास्पद निर्धार

अमेरिकी माध्यमांचा कौतुकास्पद निर्धार

Next

एका परीने सर्व जगभरातील माध्यमांसाठी सध्याचा काळ संघर्षाचा आहे. परंतु लोकशाहीची पाळेमुळे घट्ट रोवलेल्या अमेरिकेसारख्या देशातही माध्यमांची गळचेपी करण्याचे जेव्हा प्रयत्न होतात तेव्हा ती गोष्ट नक्कीच चिंतेची ठरते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेथील माध्यमांना खुलेआम देशद्रोही म्हणावे यावरूनच परिस्थिती किती गंभीर आहे, याची कल्पना यावी. खरे तर स्वत: ट्रम्प बेलगाम होत चालले आहेत, याचेच हे लक्षण आहे!
‘सीएनएन’चे व्हाइट हाउसचे वार्तांकन करणारे प्रतिनिधी जिम अ‍ॅकोस्टा यांनी याच आठवड्यात विचारलेल्या एका प्रश्नाने ट्र्म्प यांचे पित्त खवळले. त्यांनी अ‍ॅकोस्टा यांना असभ्य म्हटले आणि अ‍ॅकोस्टा यांच्या हातातील माइक काढून घेण्यास त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. यावरून दोघांमध्ये गरमागरम बाचाबाची झाली. माध्यमे शत्रूसारखी वागत असल्याचा आरोप करण्यापर्यंत ट्रम्प यांची मजल गेली. मध्य अमेरिकेतील मेक्सिको या शेजारच्या देशातून होणारी घुसखोरी हा देशाला मोठा धोका असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. अ‍ॅकोस्टा यांनी यासंबंधी प्रश्न विचारला तेव्हा संतापून ट्रम्प अ‍ॅकोस्टा यांना म्हणाले, ‘मला देश चालवू द्या, तुम्ही सीएनएन चालवा!’ या पत्रकार परिषदेनंतर काही वेळातच अ‍ॅकोस्टा यांची व्हाइट हाउसच्या वार्तांकनाची मान्यता (अ‍ॅक्रिडिशन) रद्द केली गेली. भडकलेल्या ट्रम्प यांनी टिष्ट्वट केले की, ‘सीएनएन’ जगापुढे अमेरिकेचे विकृत चित्र मांडत आहे. याला ‘सीएनएन’ने टिष्ट्वटनेच उत्तर दिले, ‘जगापुढे अमेरिकेचे भलेबुरे चित्र मांडणे हे तुमचे काम आहे. आमचे काम फक्त बातम्या देणे आहे!’
ट्रम्प यांचा राग फक्त ‘सीएनएन’वरच आहे, असे नाही. याआधी ‘न्यू यॉर्क टाइम्स’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ यासारख्या जगन्मान्य वृत्तपत्रांविरुद्धही त्यांनी गरळ ओकलेली आहे. ट्रम्प यांच्या या वागण्याने माध्यमे हैराण झाली आहेत. अलीकडेच ‘न्यू यॉर्क टाइम्स’चे प्रकाशक ए. जी. सल्जबर्जर यांची ट्रम्प यांच्याबरोबर भेट झाली. राष्ट्राध्यक्षांनी माध्यमांशी असे खुले वैर धरणे अमेरिकेच्या दृष्टीने हानिकारक आहे, हे ट्रम्प यांना सल्जबर्जर यांनी समजावले. परंतु बैठकीनंतर ट्रम्प यांनी समाजमाध्यमांतून पुन्हा ‘न्यू यॉर्क टाइम्स’वरच तोंडसुख घेतले.
अखेर अ‍ॅकोस्टा यांची प्रेस मान्यता रद्द करण्याविरुद्ध ‘सीएनएन’ने न्यायालयात धाव घेतली. प्राथमिक सुनावणीनंतर न्यायालयाने अ‍ॅकोस्टा यांची मान्यता कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे. हा ट्रम्प यांना मोठा झटका व तेथील माध्यमांचा मोठा विजय आहे. सत्तेवर आल्यापासून ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ची नवराष्ट्रवादी घोषणा दिली आहे. याचाच भाग म्हणून ट्रम्प माध्यमांवरही प्रहार करत आहेत. काही करून माध्यमांना दबावाखाली ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. माध्यमांनी फक्त आपले गुणगान करावे, ही त्यामागे सुप्त इच्छा आहे.
ट्रम्प यांच्या या अरेरावीला जशास तसे उत्तर देण्यासाठी माध्यमांनीही कंबर कसली आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी अमेरिकी माध्यमांनी एक अनोखे व ऐतिहासिक पाऊल उचलले. ‘बोस्टन ग्लोब’ या १४६ वर्षे जुन्या दैनिकाने देशभरातील वृत्तपत्रांना एका ठरलेल्या दिवशी ‘वृत्तपत्र स्वातंत्र्य’ या विषयावर संपादकीय लिहिण्याचे आवाहन केले. मजेची गोष्ट अशी की ज्या दिवशी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत होतो त्याच दिवशी अमेरिकेतील ३०० वृत्तपत्रांचे संपादक ट्रम्प यांच्या मनस्वी आणि एककल्ली वागण्यावर आसूड ओढणारी संपादकीय लिहित होते. ही संपादकीय १६ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध झाली!
त्यापैकी ‘न्यू यॉर्क टाइम्स’मधील संपादकीयचा मी येथे आवर्जून उल्लेख करेन. त्यांनी लिहिले होते की, यंदाच्या वर्षी सरकारकडून वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बरेच हल्ले झाले. बातम्यांमध्ये काही कमी-जास्त होऊ शकते. काही ठळकपणे तर काही लहान आकारात छापून आल्या असतील. काही चुकीचे छापले असेल तर त्यावर टीका जरूर व्हायला हवी. वार्ताहर व संपादक हेसुद्धा शेवटी माणूसच आहेत. त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात. झालेल्या चुका सुधारणे हे आमचे कर्तव्य आहे. परंतु आपल्याला ज्या बातम्या पसंत नाहीत त्यांची ‘फेक न्यूज’ म्हणून हेटाळणी करणे हानिकारक आहे. पत्रकारांना जनतेचा शत्रू म्हणणे हेही धोकादायक आहे. इतरही अनेक वृत्तपत्रांनी अशाच स्वरूपाची संपादकीय लिहून ट्रम्प यांना हे समजविण्याचा प्रयत्न केला की, त्यांनी माध्यमांची गळचेपी करू नये. माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे हे माध्यमांचे आद्य कर्तव्य आहे.
ट्रम्प यांच्या आक्रमक नवराष्ट्रवादापुढे गुडघे टेकण्यास नकार देणाºया अमेरिकी माध्यमांच्या संघर्षाची वाहवा करायलाच हवी. लोकशाहीसाठी हे नितांत गरजेचे आहे. कारण सत्तेपुढे माध्यमे नतमस्तक झाली की कोणीही सत्ताधीश हुकूमशहा व्हायला वेळ लागत नाही. माध्यमे गुळमुळीत झाली तर भ्रष्टाचार व गैरव्यवहार बाहेर येणार नाहीत व सत्ताधाºयांना आपल्या मर्जीनुसार वाट्टेल ते करण्यास रान मोकळे होईल. म्हणूनच सत्तेवर माध्यमांचा अंकुश असणे गरजेचे आहे. केवळ अमेरिकेतच नव्हे तर प्रत्येक देशातील लोकशाही टिकून राहण्यासाठी माध्यमे स्वतंत्र असणे ही अपरिहार्य गरज आहे.

Web Title:  Wonderful determination of American media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.