‘प्रत्येक डोळ्यातील अश्रू मिटवणं’ हे गांधीजींचं उद्दिष्ट...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 06:15 AM2018-08-23T06:15:30+5:302018-08-23T06:16:12+5:30

गांधीजींच्या जीवनकार्य व तत्त्वज्ञानाचा विचार केल्यास हे स्पष्ट जाणवते की, ते निसर्गवादी आहेत.

wiping every tear from every eye was mahatma gandhis motto | ‘प्रत्येक डोळ्यातील अश्रू मिटवणं’ हे गांधीजींचं उद्दिष्ट...

‘प्रत्येक डोळ्यातील अश्रू मिटवणं’ हे गांधीजींचं उद्दिष्ट...

Next

- प्रा. एच. एम. देसरडा

भारताला स्वातंत्र्य मिळून सात दशकं लोटली तरी आजमितीला आम्हाला हे का साध्य करता आलं नाही? हा सरकार, समाज व समस्त देशवासीयांसमोरील अव्वल प्रश्न आहे. ३० जानेवारी १९४८ रोजी गांधी हत्येच्या भीषण घटनेनंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले : ‘आमच्या जीवनातून प्रकाश गेला आहे.’ (लाईट हॅज गॉन आऊट आॅफ अवर लाईफ) लगोलग गांधीजींच्या वरील वचनाचा उल्लेख करीत ते म्हणाले, ‘महामानवाच्या या स्वप्नाची पूर्ती करणे हे अवघड काम आहे. मात्र, आपण अश्रू मिटवण्याचं हे काम करूया... हीच बापूला खरी आदरांजली होईल.’
२ आॅक्टोबर २०१८ पासून गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने सरकार, सार्वजनिक, शैक्षणिक संस्था व लोक अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. तथापि, हा एक नित्याचा सोपस्कार न होता बापूंच्या स्वप्नाच्या भारताकडे आगेकूच करण्याचा एक कृतिशील आशयगर्भ उपक्रम असावयास हवा. त्यासंदर्भात व्यापक संवादार्थ हा एक दृष्टिक्षेप.
आधुनिकीकरण, औद्योगीकरण व विकासाच्या गोंडस नावाने नैसर्गिक संसाधनांची जी बर्बादी बेमुर्वतखोरपणे चालली आहे त्याला आवर घालणे हे तातडीचे आव्हान आहे. एकतर मुळातच आज संपूर्ण जग पृथ्वीच्या धारणक्षमतेच्या (कॅरिंंग कॅपिसिटी) जवळपास दीड दोन पट संसाधने दरवर्षी वापरत (स्पष्ट शब्दांत फस्त) आहोत. सोबतच जवळपास निम्म्या लोकसंख्येला मानवी जीवनाला आवश्यक गरजांपासून वंचित राहावे लागते! अर्थातच ही एक अन्याय विसंगती असून, त्याचे समाजावर प्रतिकूल परिणाम होत आहेत.
प्रचलित विकास प्रकल्पांच्या परिणामी जगामध्ये विषमता, विसंवाद व निसर्गव्यवस्थेचा विध्वंस होत आहे. मानव हक्कांचे हनन होत असून, हिंसा, उद्रेक, दहशतीमुळे स्थलांतर, प्रतिरोध, प्रतिशोधामुळे जग तणावग्रस्त बनले आहे.
खरंतर वाढवृद्धीप्रवण, चैनचंगळवादी, निसर्गाची ऐसीतैसी करणाऱ्या विकासप्रणालीला गांधीजींनी नि:संदिग्ध शब्दांत विरोध दर्शविला होता. १९०९ साली लिहिलेल्या ‘हिन्द स्वराज’ या चिंतनात्मक परिवर्तनकारी पुस्तकात याकडे जगाचे लक्ष वेधले होते. निसर्ग, मानव व समाज या त्रयीच्या परस्परावलंबनाविषयी मूलगामी विवेचनविश्लेषण त्यांनी संपादक व वाचक याच्या संवाद स्वरूपात केले आहे. अर्थात, गांधीजींच्या विश्वदृष्टीचे (वर्ल्ड व्ह्यू) हे मौलिक चिंतन समजणे, त्याचे नेमके आकलन होणे हे एक आव्हानात्मक काम आहे. त्यांच्या या शंभरेक पाणी छोटेखानी पुस्तिकेवर जगभर अनेकविध विचारव्यूह, राजकीय विचारसरणीच्या कोणातून पंडितचर्चा व राजकीय मंथन झाले आहे. उत्तरोत्तर त्यांचे युगप्रवर्तक विचार दिशादर्शक होत आहेत. किंबहुना वसुंधरेच्या आणि मानवाच्या सुरक्षेसाठी अन्य तरणोपाय नाही.
सांप्रतकाळी भारत व जगासमोरील जीवन-मरणाच्या प्रश्नांसंदर्भात गांधीजींच्या जीवनकार्य व तत्त्वज्ञानाचा (सॉक्रेटिस, थोरो, रस्कीन, टॉलस्टाय यांच्या दिशादृष्टी परिप्रेक्षात) विचार केल्यास हे स्पष्ट जाणवते की, ते निसर्गवादी आहेत. समता, सादगी व स्वावलंबन यावर त्यांचा विशेष भर आहे. याचे महत्त्व जगाला १९६० च्या दशकानंतर अधिक प्रकर्षाने जाणवू लागले. १९७२ साली प्रसिद्ध झालेला क्लब आॅफ रोमचा अहवाल ‘लिमिटस टू ग्रोथ’ आणि त्याचवर्षी स्टॉकहोम येथे संपन्न झालेली ‘ह्युमन डेव्हलपमेंट कॉन्फरन्स’ यात जगाचे लक्ष गांधींच्या पर्यावरणस्नेही जीवनशैलीकडे वेधले गेले. १९९२ च्या वसुंधरा शिखर संमेलनाने (अर्थसमिट) गांधी विचारसरणीला वैश्विक परिमाण लाभले. सारांश, गांधी हे नाव आज जगात चिरस्थायी विकासाचे मूर्तिमंत प्रतीक मानले जाते.
‘जो बदल आपणास हवा तो स्वत: बना’ (बी द चेंज यू विश टू सी) आणि ‘पृथ्वी सर्वांच्या गरजा भागवू शकते; परंतु हाव नाही’ (अर्थ हॅज इनफ फॉर एव्हरीवन्स नीड, बट नॉट फॉर द ग्रीड) ही दोन प्रख्यात गांधी वचने आतातर जगभर उद्धृत केली जातात. थोडक्यात, जगाला विनाशापासून वाचविण्यासाठी ज्या पर्यावरणीय पारिस्थितिकी (इकॉलॉजिकल) तत्त्वज्ञानाची गरज मानवतावादी शास्त्रज्ञ, समाजधुरीण, प्रगल्भ राजकीय नेते, सच्चे पत्रकार आग्रहाने प्रतिपादन करीत आहेत त्याचा बीजरूप ठेवा गांधींच्या जीवनदृष्टीत आहे. म्हणूनच त्यांनी सांगितले, माझे जीवन हाच माझा विचार आहे. येथे हे ध्यानी घ्यावे की, गांधीजींनी ‘संदेश’ असे म्हटले नाही. खेदाची बाब म्हणजे ज्यांना ते शुद्ध पारदर्शी जीवन नाही, ते उठसूट संदेश देण्यात गर्क आहेत. मन की बात करीत आहेत; जनांचे देणे-घेणे नाही!
तथापि, गांधींना आपण आज केवळ ‘निर्यातवस्तू’, ‘वंदनीयमूर्ती’ बनवले आहे. होय, मोदीजींना परदेशात गांधी गुणगान फार सोयीचे असते. देशात मात्र ते अदानी-अंबानींचे कायम भागीदार असतात. अलीकडे लखनौतत्यांनी याची चक्क कबुली दिली, हेही नसे थोडके.
उपरिनिर्दिष्ट पार्श्वभूमी व परिप्रेक्ष्य लक्षात घेऊन भारतातील २०१८ सालच्या सामाजिक- आर्थिक- सांस्कृतिक- राजकीय वास्तवाचा विचार केल्यास हे स्पष्ट जाणवते की, आपण आजघडीला यच्चयावत भारतीयांच्या शुद्ध हवापाणी, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्यादी गरजा सहज भागवू शकतो. मुख्य म्हणजे आज देशात जेवढे उत्पादन व सेवा-सुविधा आहे त्यातच हे शक्य आहे. अधिक निरर्थक वाढवृद्धीची अजिबात जरूर नाही! येथे स्पष्ट बजावले पाहिजे की, मोटारवाहने, पेट्रोलियम पदार्थ, रसायने, प्लास्टिक या पर्यावरणाला व समाजस्वास्थ्याला घातक उत्पादने तात्काळ बंद केली पाहिजेत. ‘विनाशाखेरीज विकास’ हीच विकासाची मुख्य कसोटी असावयास हवी. याचा अर्थ विकासाला आंधळा विरोध नाही, तर आंधळ्या विकासाला ठाम विरोध हा आहे.
तात्पर्य, भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली समतावादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्था प्रगल्भ करण्यासाठी बुद्धांपासून गांधींपर्यंतचा पर्यावरणस्नेही अहिंसक मार्ग व फुले-आंबेडकरांनी विशेषत्वाने प्रतिपादित केलेला दलित-आदिवासी - शेतकरी - कष्टकºयांच्या मानवतावादी, सत्याचा मार्ग याला आजच्या मनुवादी सत्ताधाºयांकडून आव्हान दिले जात आहे. खºयाखुºया भारतीय संकल्पनेचे संरक्षण करणे हे आज देशासमोरील प्रमुख आव्हान आहे, ही बाब विसरता कामा नये. त्यासाठी सत्तेला सत्य सांगण्याचे अप्रिय काम करण्यासाठी प्रत्येकाने कृत संकल्प होणे हाच ‘आझादी से स्वराज की और’ आगेकूच करण्याचा मार्ग स्वीकारणे प्रत्येक इमानदार राष्टÑप्रेमी नागरिकाचे कर्तव्य आहे.

(लेखक नामवंत अर्थतज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य आहेत)

Web Title: wiping every tear from every eye was mahatma gandhis motto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.