शहरी रस्ते कशासाठी? कोणासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 04:42 AM2019-01-22T04:42:12+5:302019-01-22T04:42:18+5:30

कोणत्याही शहरात नागरी समस्यांचा विषय निघाला की चर्चेची गाडी वळते ती रस्त्यावरील अनागोंदीची.

Why do the city roads? For whom? | शहरी रस्ते कशासाठी? कोणासाठी?

शहरी रस्ते कशासाठी? कोणासाठी?

googlenewsNext

- सुलक्षणा महाजन

कोणत्याही शहरात नागरी समस्यांचा विषय निघाला की चर्चेची गाडी वळते ती रस्त्यावरील अनागोंदीची. गेल्या पंचवीस वर्षांपासून वेगवान खासगी वाहने मोठ्या संख्येने रस्त्यांवर येऊ लागली आणि रस्ते अपुरे पडू लागले तेव्हा हातोडा पडला तो पदपथ आणि त्यावरील फेरीवाल्यांवर. रस्ते रुंद झाले परंतु ते नंतर व्यापले उभ्या केलेल्या गाड्यांनी. दोन पायांवर चालणारी माणसे दुचाक्यांवर तर दुचाक्यांवर पळणारी माणसे चार चाकांच्या गाडीत बसून प्रवास करू लागली. बस वाहतुकीत कमतरता असल्यामुळे तीन चाकी रिक्षा त्यांची कसर भरून काढू लागल्या. परिणामी रस्त्यावर स्पर्धा, भांडणे, मारामाऱ्या आणि अपघात वाढले. एकेकाळी मुंबईची शान असलेली बेस्टसुद्धा वाहनांच्या आक्रमणाने हतबल झाली. इतर महानगरांतील बससेवांची दुर्दशा काही वेगळी नाही. विविध वाहनांच्या भाऊगर्दीमुळे लोकांना रस्त्याने चालणे, रस्ता पार करणेही दिवसेंदिवस अवघड झाले आहे. चालणारी मुले, माणसे, आया-बाया हेच गुन्हेगार ठरू लागले आहेत. ‘रस्त्यावर नाही जागा तरी गाडी तळ हवा’ आणि ‘चौकातील कोंडीवर उड्डाणपूल बांधा’ हा राजकीय नेत्यांचा हट्ट झाला आहे.
म्हणूनच शहरातले रस्ते कशासाठी आणि कोणासाठी हे प्रश्न आता नागरिकांनी आपल्या नेत्यांना विचारायची वेळ आली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या वाहतूक गरजांसाठी काम करतील तेच यापुढे शहरांमध्ये निवडून येतील ही जाण नेत्यांना करून देणे आवश्यक आहे. देशाच्या पंतप्रधानपदी किंवा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणीही निवडून आले तरी ते या समस्येची उकल करू शकणार नाहीत. त्यासाठी आपण त्यांना निवडून देत नाही. नागरी समस्या राष्ट्रीय, धार्मिक किंवा जातीय अभिनिवेशातून नाही तर शहरांबद्दल आणि सार्वजनिक संपत्तीचे जतन करण्याची आस्था असेल तरच सुटणाºया आहेत. स्वत:च्या शहराचा अभ्यास आणि यशस्वी शहरांच्या अनुकरणातून, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने हे प्रश्न सुटू शकतील. पाश्चिमात्य देशातील अनेक शहरांनी गेल्या दहा-वीस वर्षांत हे दाखवून दिले आहे.
रस्ते ही प्रत्येक शहराची सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची सार्वजनिक मालमत्ता असते. वाहतुकीच्या रस्त्यांच्या जागांची समान नाही तर न्याय्य वाटणी करावी लागते. गरजा, ऐपत आणि लोकांची मानसिकता, वृत्ती अशा सर्वांचा विचार करून रस्त्यांची रचना, बांधणी करायची असते. सामान्य लोकांसाठी मोटारींच्या तावडीतून रस्ते मुक्त करण्याची अनेक उदाहरणे क्रांतिकारक आहेत. न्यूयॉर्क, लंडन, मॉस्को, पॅरिस अशासारख्या अनेक शहरांमध्ये रस्त्यांचे असे पुनर्वाटप करण्यात आले आहे. वाहने आणि मोटारींना अवास्तव ‘भाव’ देऊन गतकाळात केलेल्या ‘मोटारचुका’ दुरुस्त केल्या जात आहेत. उड्डाणपूल पाडून टाकले जात आहेत. गरीब नागरिक मोटारीने नाही तर श्रीमंत नागरिक जेथे सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतात तेच शहर संपन्न असते हा नवा वाहतूक मंत्र झाला आहे. विसाव्या शतकात मोटारींच्या आक्रमणाने व्यापलेले अनेक रस्ते एकविसाव्या शतकात मोटारमुक्त झाले आहेत.
कोणत्याही स्थावर मालमत्तेची वाटणी जेव्हा असमान होते तेव्हा कलह निर्माण होतात. त्याचा प्रत्यय आज प्रत्येक भारतीय शहरातल्या प्रत्येक रस्त्यावर येत आहे. एका नागरिकाला रस्त्यावरून चालण्यासाठी १ चौ. मी. जागा लागते तर सायकलला दोन, स्कूटरला ५ आणि मोटारीला २५ चौ. मी. जागा लागते. म्हणूनच माणशी १० इतका रस्ता कर असेल तर सायकलला २०, स्कूटरला ५० आणि मोटारीला २५० या प्रमाणात रस्ता कर आकारला जातो. असा वार्षिक कर फक्त रस्त्यावर चालण्यासाठी किंवा वाहने पळविण्यासाठी असतो. सार्वजनिक ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी वेगळे शुल्क असतेच असते. अशा धोरणामुळे नगरपालिकेच्या तिजोरीत भर पडतेच, शिवाय रस्त्याचा पार्किंगसाठी होणारा वापर कमी होऊन वाहतूक सुरळीत होते. रस्त्यावरील गाडीतळातून मिळणाºया पैशातून सार्वजनिक वाहतूक वाढवायला, सायकल मार्ग करायला मदत होते. पदपथ रुंद केले की पादचारी आणि सायकलस्वार सुरक्षित होतात, शिवाय तेथे पादचारी आणि फेरीवाले यांची तजवीज करता येते. अधिकृत फेरीवाला जागा मोठ्या प्रमाणावर निर्माण करून स्वयंरोजगार आणि शहराचा आर्थिक विकास होतो. फेरीवाले समस्या न बनता उपयुक्त ठरतात. त्यांच्याकडून नगरपालिकेला भाडे मिळते आणि जागोजागी स्वच्छतागृहे, बैठकीच्या जागा तयार करता येतात. अशा पादचारीप्रेमी रस्त्यांच्या रचनेमध्ये झाडांना मोकळेपणाने वाढता येते आणि लोकांना सावली मिळते. हे सर्व शहाणपण आपण विकसित शहरांच्या अनुभवातून शिकणे आवश्यक आहे.
सार्वजनिक मालमत्तेची म्हणजेच शहरातील प्रत्येक रस्त्याच्या उपलब्ध जागेची वाटणी न्याय्यपूर्ण करणे हे शहर सुधारणेचे सर्वात तातडीचे आणि धाडसाचे काम आहे. रस्ते ही सार्वजनिक मालमत्ता आहे, आपण ती कशीही वापरायला मुक्त आहोत ही जबाबदार नागरी वृत्ती नव्हे. मोकाट गुरांपेक्षाही मोकाट वाहने जास्त घातक असतात. वाहने शहरांना आणि नागरिकांना उद्ध्वस्त करतात. लोकांचे जीव घेतात, हात-पाय मोडतात, रोजगार बुडवतात, लठ्ठपणा देतात आणि पैसा वाया घालवतात. याचा सर्वात जास्त फायदा होतो तो हाडांचे डॉक्टर, इस्पितळे आणि जिम यांना.
(लेखिका शहर नियोजन तज्ज्ञ आहेत.)

Web Title: Why do the city roads? For whom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.