नेत्यांच्या मुलांची पळवापळवी अचानक आहे का ठरवूनच?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 11:45 AM2019-03-21T11:45:44+5:302019-03-21T11:46:48+5:30

प्रेमात सगळं काही माफ असतं असे म्हटले जाते. आता हेच वाक्य राजकारणातही लागू पडावे अशी आजची परिस्थिती आहे.

Why is the boycott of leaders' sons suddenly? | नेत्यांच्या मुलांची पळवापळवी अचानक आहे का ठरवूनच?

नेत्यांच्या मुलांची पळवापळवी अचानक आहे का ठरवूनच?

googlenewsNext

- धनाजी कांबळे

प्रेमात सगळं काही माफ असतं असे म्हटले जाते. आता हेच वाक्य राजकारणातही लागू पडावे अशी आजची परिस्थिती आहे. अनेक दिगग्ज, मातब्बर नेते लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असताना त्यांची मुले मात्र मोठ्या प्रमाणात दल बदलायला लागली आहेत. नेत्यांची माघार आणि त्यांच्या मुलांचा भाजप प्रवेश ही अप्रत्यक्षपणे भाजपलाच मदत ठरण्याचीच शक्यता आहे. अहमदनगर, माढा आणि मावळ मतदारसंघातील ही स्थिती महाराष्ट्राच्या इतरही मतदारसंघात थोड्याफार फरकाने अशीच आहे हे ध्यानात घेतले पाहिजे.

सध्या महाराष्ट्रात भाजपविरोधात चर्चा असली, तरी काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल फारसे चांगले मत नाही. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपण निवडून येऊ याची शाश्वती वाटत नसल्याने मातब्बर दिग्गज नेते लोकसभा निवडणुकीत आपण उभे राहणार नाही, असे सांगत आहेत. एकीकडे उमेदवारीतून माघार घेत भाजपला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणाऱ्या नेत्यांची मुले मात्र भाजपमध्ये बिनधास्तपणे प्रवेश करीत आहेत. हे अचानक घडत नसून यासाठी राजकारण्यांनी ठरवून केलेली ही सत्तेसाठीचे खेळी असावी का अशी शंका घेण्यास वाव आहे. एकीकडे राफेल, नोटबंदी, काळा पैसा, जीएसटी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी अशा अनेक प्रश्नांवर भाजपची कोंडी करण्यासाठी तोंडसुख घेणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते अप्रत्यक्षपणे भाजपलाच मदत होईल अशा पद्धतीने सध्याचे राजकारण करीत असल्याचे स्थिती आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीसाठी आपले सर्वस्व पणाला लावलेले असताना काँग्रेस-राष्ट्रवादीतून त्यांनी लढावे असे प्रयत्न केले जात असल्याचे दाखविण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात काँग्रेसचा उमेदवार अहमदनगरमधून विजय होणार नाही याची खात्री पटल्यानेच सुजय विखे यांना भाजपमध्ये जाऊ दिले की काय असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तीच परिस्थिती माढा मतदार संघातील आहे. महाराष्ट्रातील राजकारणी घराणी विशेषतः ज्या घराण्यांमध्ये सत्ता एकवटली आहे, त्यापैकी मोहिते पाटील हे एक घराणे. विजयसिंह मोहिते-पाटील यांना माढा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहायचे होते. त्यामुळेच शरद पवार या मतदारसंघातून उभे राहतात असे खुद्द पवार यांनीच माध्यमांना माहिती दिल्यापासून विजयसिंह मोहिते पाटील नाराज होते. त्याचप्रमाणे माढा मतदारसंघाचा बारामती सारखा विकास करू, असे आश्वासन दिले असतानाही माढा मतदारसंघात फार काही विकासकामे झालेली नाहीत असे तेथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मतदारसंघात गाठीभेटी घेताना शरद पवार यांनी अलीकडेच धनगर समाजाबद्दल वक्तव्य केले होते. 'फायदा घ्यायला आमच्याकडे आणि मते द्यायला भाजपकडे' असे चालणार नाही असे ते म्हणाले होते. त्यामुळे धनगर समाज त्यांच्या विरोधात गेला आहे. त्यामुळेच पराजयाचा अंदाज आल्याने शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून माघार घेत आपण निवडणूक लढवणार नाही असे सांगितले होते. मात्र यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळेल असे वाटले होते. परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाप्रमाणे मावळ मतदारसंघात अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाल्याने आपल्या घरातील पुढची पिढी राजकारणात यावी, यासाठी मोहिते-पाटील यांनी देखील रणजीत मोहिते पाटील यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती. मात्र त्यांना विरोध झाल्याने उमेदवारी मिळत नाही हे माहीत झाल्यावर विजयसिंह मोहिते-पाटील यांचा मुलगा रणजीत मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

नेत्यांची पुढची पिढी राजकारणात येत असताना आजही काँग्रेस-राष्ट्रवादीला घराण्यातील सत्ता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देऊन विकेंद्रित करावी, असे वाटत नसल्याचे यावरून दिसते. त्यामुळे सत्तेची हाव असलेल्या राजकारण्यांनी स्वतःच्या मुलाच्या राजकीय करिअरसाठी आपले अस्तित्व पणाला लावल्याचे दिसत आहे. मात्र या सत्तेच्या साठमारीमध्ये भाजपला फार काही न करता सहजासहजी सत्ता मिळवून देण्याचा हा अप्रत्यक्ष डाव असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. एकीकडे पुन्हा भाजपची सत्ता आल्यास यानंतर लोकशाहीमध्ये होणाऱ्या निवडणूका देशात कधीच होणार नाहीत असे खुद्द भाजपच्या मंत्र्यांनी बोलून दाखवले आहे. त्याचप्रमाणे भाजपच्याच मंत्र्याने याआधी आम्ही संविधान बदलण्यासाठी सत्तेत आलो आहोत, असे बोलून दाखवले आहे.

इतकेच नव्हे, तर भारतीय संविधान दिल्लीत 'चौकीदारां'ची गर्दी असताना सुद्धा खुलेआमपणे जाळण्यात आले. याबद्दल ना कोणी खेद व्यक्त केला ना चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यांचे मौन म्हणजे अप्रत्यक्ष देशद्रोही कृत्याला पाठिंबाच म्हणावा लागेल. भाजपच्या मंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपला बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले सर्वव्यापी समताधिष्ठित संविधान बदलायचे आहे याचाच हा सगळा डाव असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांना वाटते. त्यामुळे भारतीय लोकशाही आणि संविधान धोक्यात आलेले असताना त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा अप्रत्यक्षपणे भाजपला पाठिंबा असल्याचे दिसत असून आता सर्व परिवर्तनवादी, संविधानवादी, लोकशाहीवादी पक्ष संघटना यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भूमिका घेताना अतिशय जागरूकपणे निर्णय घ्यावा लागणार आहे.

दुसरीकडे भाजपची बी टीम नेमकी कोण आहे हे आता मतदारांच्या लक्षात येत असून कुणी कितीही कुणाला अफजल खानाची उपमा दिली तरी हे सगळे सत्तेसाठी एकच आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत होईल अशीच रणनीती धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या पक्षांनी देखील घेतली आहे, अशीच परिस्थिती सध्या सगळीकडे दिसत आहे. घरातली सत्ता काहीही करून घरण्यातच, कुटुंबातच राहिली पाहिजे अशी व्यवस्था केली जात आहे. वडील एका पक्षात आणि त्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात हे आता सर्रास घडत असताना संविधानिक लोकशाही आणि भारतीय संविधानाच्या सुरक्षेसाठी आता बाबासाहेबांच्या अनुयायांनाच कंबर कसावी लागेल. अन्यथा समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूलभूत तत्वे केवळ आदर्श तत्वे म्हणूनच राहतील, त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात अंमल होताना दिसणार नाही. त्यामुळे सर्व लोकशाहीवादी, परिवर्तनवादी कष्टकरी श्रमिक जनतेने मतदान करताना डोळस आणि सजग राहण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Why is the boycott of leaders' sons suddenly?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.