भाषा विषयांचे मारेकरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 04:29 AM2018-07-24T04:29:58+5:302018-07-24T04:30:56+5:30

उच्च शिक्षणातील भाषा विषयांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी होत चालली आहे.

Who are the killers of languages? | भाषा विषयांचे मारेकरी कोण?

भाषा विषयांचे मारेकरी कोण?

Next

उच्च शिक्षणातील भाषा विषयांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी होत चालली आहे. याचे प्रमाण चिंताजनक आहे. यात मराठी, हिंदीसह सर्वच प्रादेशिक भाषा विषयांचा समावेश आहे. याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याची, आपल्या भाषांचा विकास व्हावा, त्यात सातत्याने नवनिर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची मानसिकताच कुणाची दिसत नाही.
सध्या व्यावसायिक शिक्षणाची चलती आहे. त्यामुळे दहावी, बारावी झाले की विद्यार्थी प्रथम अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेकडे वळतात. तेथे संधी मिळाली नाही तर अन्य शाखांचा, शेवटी कला शाखेचा, भाषा विषयाचा विचार होतो. काही जण ठरवून कला शाखेत करिअर करण्याचा प्रयत्न करीत असतीलही; पण त्यांचे प्रमाण नगण्य आहे.
आज प्रत्येक भाषा हा अस्मितेचा विषय आहे. मराठी, हिंदी असो की इंग्रजी, सर्वच भाषांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी कमी होत आहेत. त्यामुळे पटसंख्या टिकविण्यासाठी महाविद्यालये अनेक फंडे वापरत आहेत. कारण विद्यार्थ्यांचा कोटा पूर्ण झाला नाही तर दोनमधील एक प्राध्यापक कमी करावा लागतो. त्याची नोकरी, महाविद्यालयाचा लौकिक टिकविण्यासाठीच हा आटापिटा?
दुसरी बाब म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यार्थ्याला केंद्रिभूत मानून तयार केले जात नाहीत. ते सक्षम आणि आव्हानात्मक अभ्यासक्रम नसतात. जास्तीत जास्त विद्यार्थी कसे उत्तीर्ण होतील, हे पाहणारे असतात. त्यामुळे बुद्धिमान विद्यार्थी या विषयाकडे वळत नाहीत. त्याचप्रमाणे आज शिक्षणाच्या प्रत्येक शाखेची सांगड रोजगाराशी घातली जात आहे. भाषा विषयातील शिक्षण म्हणजे शिक्षक, प्राध्यापक होण्यासाठीच असा एक समज आहे. शिक्षक, प्राध्यापक होण्यासाठी किती अर्थपूर्ण दिव्य करावे लागते, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे रोजगार देणारे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना जवळचे वाटतात.
भाषा विषयातही रोजगार संधी आहेत. मात्र, त्या अधोरेखित करण्याचा प्रयत्न कुणी फारसा करीत नाही. भाषांतर, संपादन, दुभाषी अशा अनेक क्षेत्रात संधी आहेत; पण विद्यार्थ्यांना सांगायला हव्यात. अशा संधी त्यांना निर्माण करून द्यायला हव्यात.
शिवाजी विद्यापीठात पदवी परीक्षेचा निकाल लागला त्याच्या दुसºयाच दिवशी आॅनलाईन प्रवेशअर्ज भरण्याची मुदत संपली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला एका दिवसात निकाल हातात घेऊन सायबर कॅफेत जाऊन अर्ज करणे शक्य होईल का, याचा साधा विचारही विद्यापीठ प्रशासनाने केला नाही. प्रवेशअर्ज कमी आल्याने काही दिवसांनी पुन्हा जाहिरात देण्यात आली. त्यानंतर दिलेल्या मुदतीत तीन-चार दिवस सर्व्हर डाऊन होता. दरम्यान, आॅफलाईन प्रवेश असलेल्या ठिकाणी विद्यार्थी प्रवेश घेतात. पण या सर्वांचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल याचा विचार केला जात नाही.
एकंदरीत विचार करता अभ्यासक्रम तयार करणारी मंडळे, शासन, विद्यापीठ प्रशासन या सर्वांनीच भाषा विषयांकडे लक्ष देऊन होणारी अधोगती टाळायला हवी, अन्यथा भाषा विषयांचे मारेकरी कोण, याचा शोध भाषाभिमान्यांनाच घ्यावा लागेल.
- चंद्रकांत कित्तुरे
 

Web Title: Who are the killers of languages?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.