लोकलच्या गर्दीत बायका शिवीगाळ, मारामारी करतात तेव्हा...

By Meghana.dhoke | Published: October 15, 2022 09:00 AM2022-10-15T09:00:02+5:302022-10-15T09:00:12+5:30

पूर्वी पाण्याच्या नळावर भांडणं होत, आता लोकल, बसमध्ये होतात!  लोकलमधली मारामारी ही बायकांच्या डोक्यातल्या प्रेशर कुकरची वाजलेली शिटी आहे फक्त!

when women abuse and fight in the mumbai local crowd | लोकलच्या गर्दीत बायका शिवीगाळ, मारामारी करतात तेव्हा...

लोकलच्या गर्दीत बायका शिवीगाळ, मारामारी करतात तेव्हा...

googlenewsNext

- मेघना ढोके, संपादक, लोकमत सखी डिजिटल

मुंबई ‘लोकल’मध्ये महिलांच्या तुंबळ हाणामारीचे दोन व्हिडिओ गेल्या आठ दिवसांत समाजमाध्यमात ‘व्हायरल’ झाले. कोण त्या मारामारीची चर्चा! बायका असून पुरुषांसारखी मारामारी करतात, बघा कशा एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अशी लेबलं लावलेल्या या व्हिडिओंची ढकलगाडी समाजमाध्यमात गिरक्या घेत राहिली.  काहींनी मारामारीचे व्हिडिओ चवीचवीने पाहिले, कुणी हसले, कुणी म्हणाले, काय हे, लाजच सोडली आता बायकांनी! शोभते का अशी निर्लज्ज मारामारी आणि भाषा बाईच्या जातीला? एका सीटवरून कुणी इतकं पिसाळल्यागत मारामारी करतं का? पुरेशी चर्चा झाली, चावट जोक्स झाले, बायकांना चार शहाणपणाच्या गोष्टी सांगण्याचं पांघरुण ओढून उपदेशही करून झाले.

यामागच्या मूळ समस्येचं काय? 

मुंबई लोकलमध्ये ‘रश अवर’ला चढणं-उतरणं, बसायला सोडाच पण उभं राहायलाही जागा मिळणं अवघड असतं. बायका भल्या पहाटे उठतात, घरचं सगळं काम, स्वयंपाक, मुलांचे डबे, पाळणाघरांची सोय, वडीलधाऱ्यांच्या पथ्याबिथ्याचं पाहून ऑफिसचं ‘पंच’ गाठायचं म्हणून धावत सुटतात. अक्षरश: धावतात. नोकऱ्या करतात, परफार्मन्स प्रेशर सांभाळतात, टार्गेटची ओझी  वाहतात आणि सायंकाळी पुन्हा घर गाठण्यासाठी तीच उरस्फोड करतात. स्टेशनला उतरून भाजी घ्यायची की  घरी जाऊन लगेच चुलीसमोर उभं राहायचं. सगळ्यांच्या वेळा सर्वत्र सतत सांभाळायच्या. चूक मान्यच नाही, क्षम्य असणं तर फार दूरची गोष्ट. मशिन होतं बायकांचं. ते अखंड राबतं. सतत पळतं. तिथं ना सुटी, ना सोय, ना सपोर्ट सिस्टीम. कोरोनाकाळात आणि आता त्यानंतरही हे सारे ताण प्रचंड वाढले. नोकरी टिकवण्यापासून ईएमआयच्या ओझ्यापर्यंत आणि वाढत्या महागाईपासून वाढत्या गरजांपर्यंत सगळं मानगुटीवर काचतच चाललं आहे. आणि या साऱ्याविषयी कुठं बोलायची सोय नाही कारण बायकांनी हे सगळं आणि ‘इतपत’ करणं तर ‘नॉर्मल’च आहे!!  

मग पुढचा प्रश्न, पुरुषांना हे ताण नाहीत का? आणि हे ताण आहेत म्हणून महिलांनी सार्वजनिक ठिकाणी मारामारी करावी का? 

- तर पुरुषांनाही ताण आहेतच. पण आपल्या कुटुंबव्यवस्थेत स्वयंपाकापासून मुलांचं पालनपोेषण, वडीलधाऱ्यांच्या आजारपणापर्यंतची सर्व जबाबदारी बायकांची आहे, पुरुषांची नाही. पुरुष घरात ‘मदत’ करतही असतील (नव्हे काही जण करतातच.) पण ती ‘मदत’, काम नव्हे. त्याउलट बायकांचं डोकं सतत प्रश्न, ताण, काम करत राहण्याचं ओझं, कामांच्या याद्या यांनी भंजाळलेलंच असतं. ताण हलका होणं हे त्यांच्या वाट्याला येतच नाही. त्यातून अनेक जणी सतत चिडचिड करतात, बडबडतात, थकतात, चिडतात. पण काम अखंड करतात. पूर्वी पाण्याच्या नळावर भांडणं होत, आता लोकलमध्ये, बसमध्ये, गर्दीच्या ठिकाणी होत असतील तर ती डोक्यातल्या प्रेशर कुकरची फक्त वाजलेली शिटी असते. डोक्यातलं प्रेशर भलतंच असतं, पण वड्याचं तेल वांग्यावर निघतं. प्रवासात किमान धड उभं राहायला जागा मिळावी ही  माफक अपेक्षाही पूर्ण होऊ नये याची चीड येणं इतकं अस्वाभाविक थोडंच आहे? आणि हे सारं फक्त मुंबईसारख्या मोठ्या शहरात घडतं असं नाही. लहान शहरं, मोठी होत जाणारी गावं  सर्वदूर घडतं. पण दिसत नाही आणि दिसलं तरी कुणालाही बायकांचं मनस्वास्थ्य, मानसिक आरोग्याचे प्रश्न, ताणाचा निचरा होणं, सपोर्ट सिस्टीम नसणं हे प्रश्न कधीच प्राधान्यक्रमावर येत नाहीत.

का येत नाहीत तर त्याचं उत्तर एकच, बायकांनी सारं निभावून न्यायचंच असतं, त्यात काय विशेष? हे समाजासह कुटुंब रचनेतही इतकं खोलवर रुजलेलं आणि बायकांकडून ठळक अपेक्षित आहे की बाईने शिवी दिली, बाईने हात उचलला की लगेच समाजात काहीतरी भयंकर झालेलं असतं.  मुंबई लोकलमधले व्हायरल व्हिडीओ त्यामुळेच अनेकांना भयानक-भयंकर वाटले आहेत.

अर्थात,  प्रौढ नागरिकांमध्ये कुठेही मारामारी, शिवीगाळ होणं कायद्याला आणि समाजस्वास्थ्याला धरून नाहीच. ते होताच कामा नये. मात्र समाजस्वास्थ्य नागरिकांच्या मनस्वास्थ्याशीही जोडलेलं असतं आणि त्याकडे केलेलं  सपशेल दुर्लक्ष असे स्फोट घडवून आणतं. चावट-टवाळ आणि टिंगलखोर चर्चेपलीकडे आपण या साऱ्याचा विचार करणार का हा खरा प्रश्न आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: when women abuse and fight in the mumbai local crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.