जेव्हा शशी थरूर यांचा देह, मन आणि बुद्धीही चोरली जाते... AI वाले थरूरच प्रश्न विचारत होते...  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 10:27 AM2024-02-26T10:27:16+5:302024-02-26T10:27:31+5:30

तिरुवनंतपुरम येथील मातृभूमी आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवात शशी थरूर यांच्या AI अवताराने त्यांचीच मुलाखत घेतली. थक्क करणाऱ्या त्या अनुभवाबद्दल....

When Shashi Tharoor's body, mind and intellect are stolen... AI wala Tharoor was asking the question... | जेव्हा शशी थरूर यांचा देह, मन आणि बुद्धीही चोरली जाते... AI वाले थरूरच प्रश्न विचारत होते...  

जेव्हा शशी थरूर यांचा देह, मन आणि बुद्धीही चोरली जाते... AI वाले थरूरच प्रश्न विचारत होते...  

- अनंत घोटगाळकर, लेखक, अनुवादक
शशी थरूर यांनी आजवर शेकडो मुलाखती दिल्या असतील. पण काही दिवसांपूर्वी तिरुवनंतपुरम येथील मातृभूमी आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवात त्यांना द्याव्या लागलेल्या मुलाखतीचं स्वरूप त्यांनाही नवखं होतं, कारण मुलाखत घेणाऱ्या आणि देणाऱ्याच्या चेहऱ्यात, भावमुद्रांत आणि लकबीतही तिळमात्र अंतर नव्हतं. दोघांचीही उच्चारण शैली, शब्दनिवड आणि शब्दफेक एकसारखीच! मुलाखतकाराने थरूर यांचा देहच नव्हे तर त्यांचं मन आणि बुद्धीही जणू चोरली होती. हे आक्रीत बहुचर्चित कृत्रिम बुद्धिमत्तेनं (AI) घडवून आणलं होतं. हा मुलाखतकार कुणी जिवंत माणूस नव्हताच, तो थरूर यांचा AI अवतार होता. नखशिखांत थरूर अंतर्बाह्य थरूर, आभासी प्रतिमा जिवंत व्यक्तीसारखा विचार करू शकत होती. मुलाखतीत एका प्रश्नाला मिळालेलं उत्तर समजून घेऊन प्रतिसाद देत पुढला प्रश्न विचारत होती. अत्यंत तंत्रस्नेही असूनही साक्षात थरूरही यामुळे आरंभी थक्क झाले होते. माहिती असणं वेगळं आणि प्रत्यक्ष अनुभवणं वेगळं, एखाद्या मुरब्बी मुलाखतकाराच्या थाटात तन्हेत-हेचे प्रश्न विचारून या अवताराने थरूरांचं व्यक्तित्व श्रोत्यांसमोर उभं करण्याचा प्रयत्न केला.

बहुस्वरता हे या साहित्य महोत्सवाचं मुख्य सूत्र होतं. साहित्य आणि बहुस्वरता यांच्यामधील संबंध उलगडून दाखवताना थरूर म्हणाले की, 'लोकशाही जीवनपद्धतीत तऱ्हेतऱ्हेच्या मतांचा स्वीकार आणि आदर करणं आणि साहित्यातही अशा विविधतेचा पुरस्कार करणं हे परस्परपूरक असून, त्यातून बहुस्वरता पुष्ट होते. समाजातील बहुस्वरतेची गळचेपी करावयाची असेल तर साहित्यातही मतभिन्नता दडपणं ओघानेच येतं; समाजातील आणि साहित्यातील बहुस्वरता अशी परस्परावलंबी असते.'

समाजाच्या धारणा घडवण्यात या डिजिटल माध्यमांची भूमिका कोणती, या प्रश्नावर ते म्हणाले, 'आपण या माध्यमात सुरुवातीला उतरलो तेव्हाच्या आणि आताच्या अवस्थेत फारच फरक पडला आहे. सुरुवातीला या माध्यमात डोकावणाऱ्या लोकांची संख्या अगदी मर्यादित होती. त्यांच्या विचारांवर प्रभाव पाहणं त्यावेळी अधिक प्रमाणात शक्य होतं. कारण त्यात खऱ्याखुऱ्या व्यक्ती खऱ्याखुऱ्या नावाने वावरत होत्या. आता संघटित जथ्थे तिथं गोळा झाले आहेत. राजकीय पक्षांनी आपले आयटी सेल्स बनवले आहेत. ते लोकांवर आपल्या राजकीय दृष्टिकोनाचा अखंड मारा करत आहेत. एका अक्षराचा फरक नसलेले शेकडो मेसेज एकाचवेळी अनेक खात्यांवरून सामान्य माणसाच्या डोळ्यांवर आदळत आहेत. त्यामुळे योग्य दृष्टिकोन घडवण्याचं काम कठीण बनलं आहे. हल्ली माणसं स्वतःच्या मताला पुष्टी देणारे संदेशच केवळ वाचतात. एकांगी बनलेली माध्यमं पूर्वग्रहांचं दृढीकरण करण्याचं साधन बनली आहेत. तथापि सार्वजनिक संवाद घडतो तिथं मतं प्रभावित होतातच. म्हणूनच ही माध्यमं सोडून द्यावीतसं वाटत नाही.' 

कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रश्न तयार केले आणि तिनेच बनवलेल्या त्यांच्या स्वत:च्याच प्रतिमेने त्यांना ते विचारले, हा अनुभव कसा वाटला, या प्रश्नावर थरूर म्हणाले, 'आपल्याला हवी ती उत्तरं शोधून देणारं इंटरनेट स्वतःच प्रश्न तयार करतं ही मोठी गमतीची गोष्ट वाटली. परंतु माझी प्रतिमा माझ्याच आवाजात ते प्रश्न विचारते यामुळे मात्र काहीशी धास्तीही वाटली. कृत्रिम बुद्धिमत्तेला आपल्या दिसण्याची, आवाजाची तंतोतंत नक्कल करता येणं हे भयावह आहे. उद्या काहीही भयानक गोष्टी एखाद्याच्या तोंडी घातल्या जाऊ शकतील आणि त्याला गोत्यात आणलं जाऊ शकेल, काळजी तर वाटणारच'

ही सारी गंमत मानायची की आपण कुठल्यातरी धोकादायक गुहेचे दार उघडून आत जात आहोत, असा प्रश्न थरूर यांना पडला तसाच तो आपल्यालाही पडेल यात शंका नाही. आपल्याच बुद्धीने निर्माण केलेली ही करामत आपल्याला कुठं घेऊन जाणार आहे, कुणास ठाऊक?

Web Title: When Shashi Tharoor's body, mind and intellect are stolen... AI wala Tharoor was asking the question...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.