जे पाहिले, शोधले, तपासले, तेच लिहिले..! ख्यातनाम लेखिका वीणा गवाणकर यांच्याशी एक संवाद!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 07:44 AM2024-01-13T07:44:58+5:302024-01-13T07:45:17+5:30

ज्यांच्या पुस्तकांनी लक्षावधी वाचकांना प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची ओळख करून दिली,  त्या ख्यातनाम लेखिका वीणा गवाणकर काय म्हणतात... वाचा

What was seen, searched, checked, wrote that A conversation with famous writer Veena Gavankar | जे पाहिले, शोधले, तपासले, तेच लिहिले..! ख्यातनाम लेखिका वीणा गवाणकर यांच्याशी एक संवाद!

जे पाहिले, शोधले, तपासले, तेच लिहिले..! ख्यातनाम लेखिका वीणा गवाणकर यांच्याशी एक संवाद!

वाचनीयता कशात असते? मराठी वाचकांच्या आवडीची सरासरी तुम्हाला नेमकी काढता आली आहे का?

साहित्य समीक्षेची तांत्रिक परिभाषा मला काही माहीत नाही. मी माझ्या प्रवासाबद्दल सांगते. कलाशाखेत  मराठी विषय घेऊन पदवी मिळवल्यानंतर पुढे मी ग्रंथालयशास्त्राचा अभ्यास केला आणि औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून काम सुरू केले. वाचनाची आवड होतीच. मी सांगत असलेल्या गोष्टी ऐकताना माझ्या मुलांना उत्सुकता वाटते, हे माझ्या लक्षात आले होते. त्याच सुमारास जॉर्ज कार्व्हर या शेतीत क्रांतिकारक स्वरूपाचे काम केलेल्या शास्त्रज्ञावरचे एक पुस्तक वाचनात आले. मग आणखी काही पुस्तके शोधून वाचली आणि त्यांचा परिचय करून देणारे लेखन केले. ‘माणूस’मध्ये ते प्रसिद्ध झाले आणि लगेचच पुस्तकरूपाने आले. कार्व्हर हा अमेरिकेतील कृष्णवर्णीय कृषी शास्त्रज्ञ. जगभरातील शेतकऱ्यांना नवी वाट दाखवणाऱ्या या माणसाने केलेले काम मूलभूत स्वरूपाचे आणि प्रेरणादायी आहे, हे वाचकांच्या लक्षात येत गेल्याने त्या पुस्तकावर वाचकांच्या उड्या पडल्या. या एका पुस्तकाने माझे नाव लोकांसमोर आले आणि तिथून माझा लेखनप्रवास सुरू झाला.

साधारणत: तीन ते चार वर्षांनी तुमचे नवे पुस्तक येते. विषय ठरला की तुम्ही शक्य तेवढे सगळे संदर्भ धुंडाळून, प्रवास करून, संबंधितांच्या भेटीगाठी घेऊन तपशील जमवता. या अभ्यासाच्या मार्गावर तुम्हाला काही कडू-गोड अनुभव आले असतील?

एकदा विषय मनात उतरला की त्याच्याशी संबंधित पुस्तके मिळवून वाचणे, निवडलेला चरित्रनायक ज्या क्षेत्रातील असेल, त्यातील संकल्पना समजून घेणे असा हा अभ्यास होतो. माझा विषय विज्ञान नाही, पण मी निवडलेले चरित्रनायक वैज्ञानिक तसेच सामाजिक विज्ञानाच्या क्षेत्रातले! डॉक्टर खानखोजे यांच्या शोधाचा प्रवास थरारक होता. गदर क्रांतिकारक म्हणून खानखोजे यांची ओळख ठिकठिकाणी होती; परंतु त्यांनी कृषी क्षेत्रात मेक्सिकोमध्ये केलेले काम प्रकाशात आलेले नव्हते. खानखोजे यांचे एक हस्तलिखित मिळाले. पुढे मी नागपूर, दिल्ली, कलकत्ता, पुणे मुंबई अशी फिरले. ग्रंथालये धुंडाळली. मुलाखती घेतल्या, आठवणी नोंदवल्या. मेक्सिकोच्या  दूतावासाकडून काही अधिकृत कागदपत्रे  मिळाली. दिल्लीच्या नॅशनल अर्काइव्हजमधल्या अधिकाऱ्यांनी नियम बाजूला ठेवून सहकार्य केले. ग्राफिक डिझाइनच्या क्षेत्रात जागतिक कीर्तीच्या पहिल्या काही कलावंतांमध्ये समावेश असलेले रॉबी डिसिल्वा वसईत माझ्या घराच्या अगदी जवळ राहत होते. चरित्र विषयाला त्यांच्या हयातीत भेटून माहिती घेण्याचा हा पहिला प्रसंग, पण आपल्या महानतेचा लवलेशही या माणसाच्या वागण्यात दिसला नाही. समन्यायी पाणीवाटपाचा पुरस्कार करणारे विलासराव साळुंखे यांचे काम प्रत्यक्ष पाहण्यासाठीही मी पुष्कळ फिरले. या सगळ्या धडपडीत अगणित माणसांची मदत झाली. मिळालेली माहिती वस्तुनिष्ठ आहे याची खातरजमा करून घेणे माझे कर्तव्य होते. माझ्या परीने मी ते केले. आज गुगलच्या काळातही करते. या शोधयात्रेने मला समृद्ध केले. मी सिद्धहस्त लेखिका नाही, कष्टकरी लेखिका आहे; असे म्हणते ते म्हणूनच!

आपण हाताळलेल्या विषयांपासून, व्यक्तींपासून प्रेरणा घेऊन प्रत्यक्ष असे एखादे काम करावे, असे कधी वाटले का?

मी काय करू शकते हे मला ठाऊक होते. मर्यादाही कळत होत्या आणि कोणतेही काम आपली समग्र ताकद लावल्याशिवाय पूर्णतेकडे जात नसते याचे भान होते. कोणी सुचवला म्हणूनही एखादा विषय मी स्वीकारत नाही. शहानिशा करूनच अभ्यासाला लागते. कीर्ती किंवा अर्थप्राप्ती हे माझ्या लेखनाचे प्रयोजन नव्हते, नाही. ज्यांनी काही मूलभूत काम केले,  त्यांचा परिचय करून देणे हेच माझे जीवितकार्य झाले. ते मी भक्तिभावाने, बुद्धिप्रामाण्याने यथाशक्ती पार पाडले इतकेच!

चरित्रनायकांचे पायही मातीचे असतील तर ते दाखवणे तुम्ही टाळले आहे...?

ते असणारच, पण दाखवायचे कशाला? मला चांगली बाजूच दाखवायची होती.

तुम्ही अलीकडेच राजस्थान दौरा करून आलात. धौलपूरला गेला होतात...?

जोहडवाले राजेंद्रसिंहजी यांच्यावर मी लिहावे असे काहींनी सुचवले. अजून मी पक्का निर्णय घेतलेला नाही, पण त्यांचे काम पाहावेसे वाटले, त्यासाठी हा खडतर दौरा केला. कधी कधी आपल्या क्षमता वापरल्यावर आपल्याला कळतात. वयाच्या या टप्प्यावर तो प्रवास मी केला. आपल्यातल्या क्षमतांचा शोध घेत राहिले पाहिजे.

**
कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे झालेल्या जाहीर मुलाखतीचा अंश.

मुलाखत : अनंत येवलेकर

Web Title: What was seen, searched, checked, wrote that A conversation with famous writer Veena Gavankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.