आम्ही जातिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 01:30 AM2018-01-07T01:30:57+5:302018-01-07T01:31:17+5:30

आम्ही जातीत जन्मतो, जातीत मरतो. आयुष्यभर कपड्यासारखी जात अंगाला चिकटवून जगतो. जातीतल्या मुला-मुलींशी लग्न करतो. जातीचे संस्कार मुलांवर करतो. जातीच्याच देवाच्या पाया पडतो. जातीच्या लग्न कार्याला सजून जातो. एखादा यशस्वी कलाकार आपला जातवाला असल्याचा अभिमान बाळगतो, ते इतरांना फुशारकीने सांगतो.

We race | आम्ही जातिवंत

आम्ही जातिवंत

Next

-  विनायक पात्रुडकर

आम्ही जातीत जन्मतो, जातीत मरतो. आयुष्यभर कपड्यासारखी जात अंगाला चिकटवून जगतो. जातीतल्या मुला-मुलींशी लग्न करतो. जातीचे संस्कार मुलांवर करतो. जातीच्याच देवाच्या पाया पडतो. जातीच्या लग्न कार्याला सजून जातो. एखादा यशस्वी कलाकार आपला जातवाला असल्याचा अभिमान बाळगतो, ते इतरांना फुशारकीने सांगतो. जातीच्या मित्रांशी ओळखी वाढवतो. जातीतल्या माणसांवर अन्याय झाला, की त्वेषाने उठतो. जातीसाठी रस्त्यावर तावातावाने भांडतो. जातीच्या लोकांचे ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुप बनवतो. जातीच्या चालीरिती - रिवाज यांची जाणीव ठेवतो. तसे वागण्याचा, त्या चाली पाळण्याचा प्रयत्न करतो. जातीत आम्हाला सुरक्षितता वाटते. आम्ही जातवाल्यांच्या गल्ल्या बनवितो. एकत्रित कळपाने जगण्याचे सुख मिळते. आम्ही प्रत्येक गोष्टीत जात शोधतो. अगदी खानावळीत मिळणारी भाजीची चवही जातीच्या हातावर तोलतो. आम्हाला स्वयंपाकालाही गरीब घरातली, पण जातवालीच हवी असते. नातेवाइकांमध्ये जातीची चर्चा मोकळेपणाने करतो. इतर कुणा मुला-मुलीने परजातीशी लग्न केले असेल तर त्याची घरात ‘गॉसिपिंग’सारखी चर्चा करतो. त्यांच्या घरचे संस्कार बाहेर काढतो. आमच्या पोशाखात जात दिसते. आमच्या भाषेत जात दिसते. आमच्या लिखाणात जात दिसते. लिखाणामधल्या प्रतिमादेखील जातीचे संस्कार दाखवितात. आमच्या हाडा-मांसात, नव्हे मांसातल्या नसानसांत जातीचे रक्त सळसळत असते. आमच्या घराची ठेवण जात दाखविते. पहिल्या ओळखीवेळी आम्ही समोरच्याचे आडनाव विचारतो, त्यावर जात तपासतो. त्याच्याशी मैत्री किती वाढवायची, याचे गणित ठरवतो. इथल्या व्यवस्थेचाच हा संस्कार आहे. जातीत जन्मलेला कितीही मोठा झाला तरी जातीचाच होऊन मरतो. इतकेच काय आम्ही आरक्षणाच्या नावाने बोंबा मारतो. कार्यालयात वरचा अधिकारी कोणत्या जातीचा आहे, यावर कामाची गुणवत्ता ठरवितो. कुणी खालच्या जातीचा अधिकारी पदावर असेल तर त्याच्या दर्जाविषयी चर्चा करतो. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, जातीच्या गणितावर बºयाच गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही कितीही निखळ व्यावसायिक असा, तुमची जातच तुमची गुणवत्ता ठरविते. तुम्ही या व्यवस्थेचा भाग व्हा अथवा होऊ नका, जातीचा पर्याय अखंड असतो. आम्ही रात्रीच्या मैफलीत जातीअंताच्या गप्पा मारतो, आम्ही घराबाहेर वैचारिक पुढारलेपणाचा झेंडा मिरवतो. पण घरात पाऊल टाकताच, आम्ही जातीचे भाग होऊन जगतो. जातीच्या उतरंडीकडे पाहताना इतरांसारखा संघर्ष आपल्याला करावा लागला नाही, यातच सुख मानतो. आम्ही जेव्हा जातीवादी नसतो, तेव्हा प्रांतवादी असतो, अथवा भाषावादी असतो. कधी गांधीवादी असतो, आंबेडकरवादी असतो किंवा सावरकरवादीही असतो. आम्ही शिवाजी महाराजांना मानतो. पुतळ्याला नमस्कार करतो. तिथला भगवा रंग पाहतो. मग बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे जातो. तिथला निळा रंग पाहतो. मग आम्ही रंगात जात पाहतो. आम्ही इतिहासात डोकावतो, तिथल्या जाती शोधतो. त्यावर भांडत असतो. आम्ही राजकारणी, शिक्षक, कलाकार, खेळाडू यांच्या नावावरून जाती शोधतो. आम्ही जातीच्या बँका काढतो. जातीच्या लोकांना कर्जे देतो. जातीची माणसे मोठी होतील असे पाहतो. जातीसाठी अनेकदा खोटे बोलतो. आम्ही न्यायालयातही जात शोधतो. जातीचा वकील करतो. न्यायाधीशांचीही जात शोधण्याचा प्रयत्न करतो. आम्ही कधीकधी व्यापक हिंदुत्ववादीही होतो. मुसलमानामधला अतिरेकी शोधत बसतो. ख्रिश्चन मिशनºयांच्या नावाने खडे फोडतो. त्यांच्याविरोधात भाषणे ठोकतो किंवा तशा कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतो. पण जेव्हा घरी परत येतो तेव्हा जातीचे होऊन जातो. जातीचे जगताना सुरेश भटांच्या भाषेत सांगायचे तर इतकेच म्हणता येईल-
जाताना सरणावर इतकेच कळले होते,
जातीने केली सुटका, जातीनेच छळले होते!
आईच्या गर्भातून येताना जातीचा भाग बनलेले आम्ही काळाच्या पडद्याआड जाईपर्यंत जातीचेच म्हणून जगतो. आमच्यातला माणूस घडण्यापूर्वी जातीच्या घट्ट चौकटीतून सुटण्याचे भाग्य लाभत नाही. आमच्यातला माणूस आम्हालाच सापडत नाही. जातीच्या पल्याड पाहण्याची दृष्टी सापडतच नाही. जातीच्या अंधारात आयुष्य संपते. वर्षानुवर्षे हा प्रवास सुरू आहे. कदाचित पुढची कित्येक वर्षे तसाच सुरू राहील. जातीच्या शापातून सुटण्याचा सध्यातरी उपाय नाही. कितीही उपदेशाचे डोस दिले तरी जातीची जाणीव ठळक आहे. ती आहे तोपर्यंत आम्ही जातिवंत म्हणून जगणार. माणूस अजून सापडायचा आहे.

(लेखक लोकमत मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)

Web Title: We race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.