वाहून जाणारं पाणी वाचवलं, तरच मुंबई वाचेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 12:07 PM2019-07-09T12:07:11+5:302019-07-09T12:10:25+5:30

अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसाचे गटारात जाणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी पालिकेने अद्याप काहीही केलेले नाही.

water conservation will save mumbai from water scarcity and water logging | वाहून जाणारं पाणी वाचवलं, तरच मुंबई वाचेल

वाहून जाणारं पाणी वाचवलं, तरच मुंबई वाचेल

googlenewsNext

- विनायक पात्रुडकर

पाणी जपून वापरा, असे आवाहन महापालिका दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी करते. रेंगाळलेला मान्सून, तलावात कमी झालेला जलसाठा, अशी अनेक कारणे महापालिका देते. नागरिक ते मान्य करतात. पाणी कपातीपेक्षा नियम पाळणे कधीकधी सोयीचे असते. हा दरवर्षी ठरलेला क्रम कधी थांबेल हे सांगता येणार नाही. अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसाचे गटारात जाणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी पालिकेने अद्याप काहीही केलेले नाही. मध्यंतरी शिवाजी पार्क येथे पावसाचे पाणी साठवण्यासाठी एक प्रयोग झाला होता. पुढे त्यात सातत्य राहिले की नाही, हे अधिकाऱ्यांनाही माहिती नसेल. असो विषय पाणी वाचवण्याचा आहे.

भविष्यात एकतर मुंबई पाण्यात बुडेल किंवा पाण्यावाचून तिला प्राण सोडावे लागतील, अशी परिस्थिती सध्या आहे. किमान पुढच्या पिढीची चिंता करून तरी पाण्यासाठी योग्य नियोजन करायला हवे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, याचे तरी भान पालिकेची सत्ता हाकणाऱ्यांनी ठेवायला हवे. प्रशासनाला मुंबईची काळजी नसली तरी काही सामाजिक संघटना या शहरासाठी योगदान देत आहेत. एका सामजिक संघटनेने दहिसर नदीवर बंधारा बांधला आहे. याद्वारे पावसाचे पाणी साठवले जाणार आहे. या बंधाऱ्यातून सुमारे पाच कोटी लिटर पाणी साठवले जाईल. हे पाणी सार्वजनिक शौचालयासाठी तसेच अग्निशमन दल आग विझवण्यासाठी वापरणार आहे. असे अजून काही बंधारे बांधले जाणार आहेत. हा प्रयोग यशस्वी करायला हवा व असे आणखी मार्ग शोधायला हवेत.

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसात एवढे पाणी समुद्रात वाहून गेले की त्यात दोन धरणे भरली असती. हे पाणी वाचवले असत तर मुंबईकरांना किमान धुणीभांडी करण्यासाठी तरी पाणी मिळाले असते. मुंबईत पाच नद्या आहेत. त्यातील मिठी नदीला मुंबईकर आणि प्रशासनाने ठार केले आहे. उर्वरित नद्यांचे रूपांतर नाल्यांमध्ये झाले आहे. या नद्या वाचवल्या जाऊ शकतात. त्यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. तिच पालिका प्रशासनाकडे नाही. त्याचे परिणाम शहराला व येथील नागरिकांना भोगावे लागत आहेत.

जगभरात अशी अनेक शहरे आहेत, जेथे मुंबईसारखी अतिवृष्टी होते. तेथील प्रशासनांनी अशाप्रकारे नियोजन केले आहे की, पाऊस कितीही पडला तरी जनजीवन विस्कळीत होत नाही. पाणी गटारात वाया जात नाही. आपले लोकप्रतिनिधी परदेश दौरे करतात. शहर नियोजनाचे सूत्र शिकून घेतात. मात्र त्याची अंमलबजावणी कासव गतीने होते. ही गती वाढली नाही तर हे शहर नक्कीच पाण्याखाली जाईल. तेव्हा पाण्याचे नियोजन आता तरी गांभीर्याने करायला हवे.
 

Web Title: water conservation will save mumbai from water scarcity and water logging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.