घड्याळाचा गजर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 05:04 PM2019-04-04T17:04:25+5:302019-04-04T17:05:49+5:30

जनाधार असलेल्या नेतृत्वाचे खच्चीकरण आणि हुजरेगिरी करणाऱ्यांना पदांची खैरात असे जर होत असेल तर पक्ष रुजणार, वाढणार कसा, हा प्रश्न आहे. रावेरच्या निमित्ताने धोक्याची घंटा वाजली आहे.

Watch alarm! | घड्याळाचा गजर !

घड्याळाचा गजर !

Next


मिलिंद कुलकर्णी
महाराष्टÑाच्या राजकारणावर गेल्या ५० वर्षांपासून हुकूमत गाजविणाऱ्या शरद पवार यांना जळगाव जिल्ह्याविषयीचा त्यांचा अंदाज दोनदा चुकल्याची नोंद इतिहासात झाली आहे. प्रचंड अभ्यास, दांडगा जनसंपर्क, अचूक निरीक्षणशक्ती, राजकीय परिस्थितीचे नेमके भान हे पवार यांचे गुण आहेत. त्यांच्या तोडीचा नेता महाराष्टÑात विरळा म्हणावा लागेल. कधीकाळी राजकीय गुरु म्हणून पवारांचा उल्लेख करणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्टÑात वर्धा आणि गोंदियात सभा घेताना पवारांना लक्ष्य करावे लागले, यावरुन त्यांचे राजकारणातील महत्त्व अधोरेखित होते.
राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर १९९९ मध्ये त्याकाळातील जळगाव लोकसभा मतदारसंघात पवार यांनी जे.टी.महाजन यांना उमेदवारी दिली होती. २००४ मध्ये काँग्रेस पक्षासोबत आघाडी झाल्याने ही जागा काँग्रेसकडे गेली. २००७ मध्ये आघाडीत जागावाटपाविषयी नवा फॉर्म्युला तयार झाला. ज्या जागेवर सलग दोनदा पराभव झाला असेल तर त्या पक्षाने दावा सोडावा आणि दुसºया पक्षाला ती जागा द्यावी, यानुसार २००७ ते २०१४ पर्यंत म्हणजे तीन पंचवार्षिक निवडणुका राष्टÑवादीने ही जागा लढवली. यश एकदाही मिळाले नाही. डॉ.अर्जुन भंगाळे, अ‍ॅड.रवींद्र पाटील, मनीष जैन यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु, भाजपाचा बालेकिल्ला अभेद्य राहिला.
यंदा तर पक्षाच्या उमेदवारीचा घोळ संपता संपेना. पवारांनी वेगवेगळी नावे चर्चेत आणून जनमताचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, परंतु, तो फारसा यशस्वी ठरला नाही. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे नाव असेच गुगली म्हणून पुढे आले. विधानसभेचे अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांची नावे चर्चेत होती. परंतु, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि या मतदारसंघावर मजबूत पकड असलेल्या एकनाथराव खडसे यांच्या स्रुषा रक्षा खडसे यांच्यापुढे टिकाव लागू शकेल, असा उमेदवार पक्षाला शोधूनही सापडत नव्हता. काँग्रेसकडे डॉ.उल्हास पाटील यांच्या रुपाने उमेदवार होता. त्यांनाही पाचोरा दौºयात पवार यांनी राष्टÑवादीत येण्याची आॅफर देऊन पाहिली. परवा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पक्षप्रवेशाचे आमंत्रण दिले. पण डॉ.पाटील त्यांना बधले नाही. राष्टÑवादीपुढे पेच निर्माण झाला होता. नगरच्या जागेविषयी प्रचंड आग्रही असणाºया राष्टÑवादीने आढेवेढे घेत अखेर रावेरची जागा ऐनवेळी सोडली. याला दोन कारणे आहेत. जळगाव मतदारसंघात उमेदवार निश्चित झाला होता, रावेरमध्ये मात्र ठरत नव्हता. पक्षाकडे सक्षम उमेदवार नाही, असा संदेश त्यातून जाऊ शकतो हे कारण एक आणि दुसरे म्हणजे, भाजपमधील असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे यांना पवार आणि राष्टÑवादी सहकार्य करीत असल्याचा समज पसरत होता. दोन्ही कारणे ही पक्षाची प्रतिमा आणि विश्वासाला धक्का पोहोचविणारी असल्याने राष्टÑवादीने अखेर हा निर्णय घेतला.
उमेदवाराअभावी मतदारसंघ मित्रपक्षाला सोडण्याची वेळ राष्टÑवादीवर आली, असाच एक योगायोग पवार यांच्याविषयी जळगावात झालेला आहे. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निकटवर्तीय मुंबईकर अरुण मेहता यांना उमेदवारी देण्यात आली. स्थानिक उमेदवाराऐवजी बाहेरील उमेदवार दिल्याने स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. परंतु, पवारांना विरोध कोण करणार? सुरेशदादा जैन यांनी पुढाकार घेतला आणि अ‍ॅड.शरद वाणी यांना उमेदवारी देण्यात आली. मेहता यांना सूचक व अनुमोदक देखील न मिळाल्याने आल्या पावली ते परत गेले.
स्थानिक नेतृत्वाला विश्वासात न घेणे, बळ न देणे याचे परिणाम आता राष्टÑवादी काँग्रेस पक्षाला २० वर्षानंतर जाणवू लागले आहेत. माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनी परवा महाआघाडीच्या मेळाव्यात धोक्याची घंटा वाजवली आहेच. दोन्ही काँग्रेसने एकत्र येऊन ही निवडणूक जिंकली नाही, तर पुढे उमेदवार सुध्दा भेटणार नाही, ही भीती त्यांनी व्यक्त केली. हे का घडले, याचा शोध आणि बोध राष्टÑवादी नेतृत्वाने घ्यायला हवा. जनाधार असलेल्या नेतृत्वाचे खच्चीकरण आणि हुजरेगिरी करणाऱ्यांना पदांची खैरात असे जर होत असेल तर पक्ष रुजणार, वाढणार कसा, हा प्रश्न आहे. रावेरच्या निमित्ताने धोक्याची घंटा वाजली आहे. घड्याळातील गजर किती जणांना ऐकू येतो, किती जण ऐकून त्यावर कार्यवाही करतात, किती कानाडोळा करतात, त्यावर पक्षाची पुढील वाटचाल अवलंबून राहणार आहे.
 

 

 

Web Title: Watch alarm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव