युद्ध मानसिकतेत होश पण हवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 05:51 AM2019-03-02T05:51:17+5:302019-03-02T05:51:20+5:30

गेला महिना आपला देश एका वेगळ्याच राष्ट्रीय मानसिकतेतून जात होता. पुलवामा हल्ल्यानंतर ते विंग कमांडर अभिनंदन वर्धमानची अटक व सुटकेपर्यंत देशातील नागरिक अनेक मानसिक आंदोलने अनुभवत आहेत.

The war mentality senses sensation | युद्ध मानसिकतेत होश पण हवाच

युद्ध मानसिकतेत होश पण हवाच

googlenewsNext

गेला महिना आपला देश एका वेगळ्याच राष्ट्रीय मानसिकतेतून जात होता. पुलवामा हल्ल्यानंतर ते विंग कमांडर अभिनंदन वर्धमानची अटक व सुटकेपर्यंत देशातील नागरिक अनेक मानसिक आंदोलने अनुभवत आहेत. यात पाकिस्तानबद्दल राग, द्वेष, बदल्याची तीव्र भावना. आपल्या देशाबद्दल किंवा कुटुंबांबद्दल हल्ले, युद्धसदृश परिस्थितीतून भीती, चिंता, काळजी, मृतांबद्दल दु:ख अशा अनेक भावनांचा समावेश आहे. बालाकोटवरील भारतीय वायुदलाच्या हल्ल्यानंतर ‘हाऊज द जोश’सारखे वाक्य समाज माध्यमांवर सतत गाजत होते. शत्रूला हरवल्याच्या तीव्र आनंदापासून ते देशभक्तीचे साजरीकरण अशा सकारात्मक व पुढे काय या अनिश्चितता, भीती अशा नकारात्मक भावनांचे हेलकावे लंबकाच्या आंदोलनाप्रमाणे दोन विरुद्ध भावनांवर देश आंदोलने घेत होता.
या सगळ्या भावना उत्स्फूर्त असल्या तरी आज समाजमाध्यमांमुळे या सगळ्या भावना अधिक प्रमाणात व्यक्त व झपाट्याने पसरणाऱ्या आहेत. पण या सर्व भावनांचा आपल्या तब्येतीशी, आपल्या प्रत्येकाच्या मानसिक परिस्थितीशी सहज न जाणवणारा पण निश्चित कुठे तरी, कुठल्या तरी स्वरूपात बाहेर येणारा मानसिक परिणाम आहे. या सर्व भावना देशभक्तीशी जोडून आपण त्याचे समर्थन करत असलो तरी शरीरात उठणाऱ्या प्रत्येक भावनिक तरंगांना शरीर व त्याची फीसीयॉलॉजी काहीतरी प्रतिसाद देतच असते. मानसशास्त्राच्या भाषेत याला मास हिस्टेरिया किंवा मास मेनिया म्हणत असले तरी राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर अशा अनिश्चिततेचा भावनावेग तीव्र होतो तेव्हा तेव्हा देशाच्या नागरिकाला त्याची मानसिक आजारांच्या, असंतुलनाच्या रूपात किंमत मोजावी लागली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा घडामोडी झाल्या तेव्हा त्याच्या मानसिकतेवर होणाºया नजीकच्या व दुरगामी परिणामांचा अभ्यास झाला आहे. जसे आधी युद्धे ही जमिनीवर लढली जायची, पुढे ती फक्त सैन्यांमध्ये लढली जाऊ लागली, नंतर सायबर हल्ले, विषाणू-जीवाणूंच्या रूपाने बायो टेररीझम अशी स्वरूपे बदलत गेली. पण त्याचा एक भाग हा असा मानसिक युद्धाचा असू शकतो हे या वेळी सामाजिक माध्यमांवरच्या व जनतेमधील भावनिक स्फोटाच्या रूपाने पुढे आला आहे. अर्थात रासायनिक अस्त्र, शस्त्रांप्रमाणे मानसिक युद्ध आणि त्याचे परिणाम, दुष्परिणाम यांची दखल घेणे आवश्यक आहे.
अमेरिकेत ९/११ घडले तेव्हा त्यानंतर तीव्र नैराश्य, असुरक्षिततेमुळे लोकसंख्येचा स्फोट अशा रूपात पुढे आला. भारताचा स्वातंत्र्य लढा हा त्या वेळी मानसशास्त्रात कुठलेही मोठे संशोधन झालेले नसताना स्वातंत्र्य लढ्यात कुठल्याही नकारात्मक भावनांचा भार पिढी पुढे घेऊन जाणार नाही, अशा स्वरूपात नियोजनबद्धरीत्या संपवला. ब्रिटनचेच राज्य असलेले आॅस्ट्रेलियासारखे देशही स्वतंत्र झाले, पण त्यांच्या पारतंत्र्यातील भावनांमुळे आजही त्यांच्या तिसºया पिढीत नैराश्याच्या तीव्र भावना व हा आजार आहे. जणू यामुळे त्यांच्यात जनुकीय बदलच झाले. म्हणूनच त्या देशात आजही ड्रग अ‍ॅडिक्शनचे प्रमाण खूप जास्त आहे. अनेक दुष्परिणाम त्यांना प्रभावीपणे जाणवत आहेत.
सध्या आपल्या देशातही व त्यातच गेल्या महिनाभरात अशा भावनिक लाटा येत आहेत. आपल्याला प्रत्येकाला आपल्या देशाबद्दल प्रेम आहे व ते व्यक्त करण्याचा अधिकार आहे. इतरांसारखा तो मलाही आहे. पण कुठल्याही भावनावेगाला योग्य रूप मिळाले नाही तर त्याचे दमन न होता ती ऊर्जा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात बाहेर पडणार. उदाहरणार्थ शत्रूला हरवल्याचा तीव्र आनंद व हा आनंद परत परत अनुभवण्याची मानसिकता, व्यक्त करण्याचे प्रकार यामुळे उन्माद होतो व रस्त्यावरील भांडणांचे, रागाचे, रस्त्यावर छोट्या-मोठ्या कारणांवरून खुनांचे प्रकार वाढतात. सतत बदल्याच्या भावनेपोटी नैराश्य येऊ शकते. राग, चिंता, बदल्याची भावना या सर्व गोष्टींचा आज हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह अशा आजारांशी संबंध सिद्ध झाला आहे. अगदी पाठदुखीसारख्या आजारांचा भावनिक संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे.
मग याचा अर्थ मी देशभक्ती व्यक्तच करायची नाही का? तर असे मुळीच नाही. पण अशा तीव्र भावना व्यक्त करताना किंवा अनुभवताना गरज असते रॅशनल थिंकिंग किंवा तारतम्य व विवेकी वैचारिक प्रक्रियेची. म्हणजेच शत्रुराष्ट्र किंवा देशाबद्दल माझ्या या भावना कितीही तीव्र असल्या तरी त्याच्यावर निर्णय घेणारी, त्याचे सतत विवेचन करणारी, या गोष्टीला वाहिलेली स्वतंत्र यंत्रणा माझ्या देशात आहे व ती सक्षम आहे. त्यावर मी स्वत: कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. याउलट आपल्या नकारात्मक भावनांच्या प्रदर्शनामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका वगैरे खूपच पुढच्या गोष्टी आहेत.
आधी आपल्या मानसिकतेला धोका व इतर राष्ट्राचा आपल्याला नकारात्मक भावनांच्या खाईत लोटण्याचा हेतू साध्य होऊ शकतो हे प्रकर्षाने समजून घ्यावे लागेल. ही सगळी बाजू लक्षात घेता या भावना जरूर असाव्यात. पण भावनावेगात वाहवत न जाणे हा आपल्या राष्ट्राच्या, राष्ट्रीय सुरक्षेच्या कर्तव्याचा भाग समजावा. म्हणूनच ‘हाउज द जोश’ला उत्तर ‘हाय बट इन माय हँड्स सर’ हे उत्तर जास्त समर्पक ठरेल.

- डॉ.अमोल अन्नदाते
आरोग्य तज्ज्ञ

Web Title: The war mentality senses sensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.