तुमच्या चेतनेत कृष्णाला जागवा आणि जन्माष्टमी साजरी करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 03:42 AM2018-09-03T03:42:10+5:302018-09-03T03:42:35+5:30

जन्माष्टमीला श्रीकृष्ण जन्म साजरा केला जातो. कृष्ण म्हणजे एक व्यक्ती नसून एक शक्ती आहे. कृष्ण माझ्यातच आहे, कुणी वेगळा नाही, हे जाणून घेण्यासाठी हा दिन साजरा करण्यात येतो.

 Wake up Krishna in your consciousness and celebrate Janmashtami ... | तुमच्या चेतनेत कृष्णाला जागवा आणि जन्माष्टमी साजरी करा...

तुमच्या चेतनेत कृष्णाला जागवा आणि जन्माष्टमी साजरी करा...

Next

- श्री श्री रवि शंकर,
(आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते)

जन्माष्टमीला श्रीकृष्ण जन्म साजरा केला जातो. कृष्ण म्हणजे एक व्यक्ती नसून एक शक्ती आहे. कृष्ण माझ्यातच आहे, कुणी वेगळा नाही, हे जाणून घेण्यासाठी हा दिन साजरा करण्यात येतो. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने म्हटले आहे, जो माझ्यात सर्वांना पाहतो आणि सर्वांमध्ये मला पाहतो, अशा व्यक्तीसाठी मी कधीच लपून राहणार नाही. माझ्यापासून ती व्यक्ती दूर राहू शकत नाही.
श्रीकृष्णाच्या जीवनात नऊ रस होते. उदाहरणार्थ, तो लहान मुलासारखा खोडकर होता, एक योद्धा, आनंदी व्यक्ती आणि ज्ञानाचा स्रोत. ते एक आदर्श मित्र आणि गुरूही होते. जन्माष्टमीला झालेला त्यांचा जन्म हा आध्यात्मिक आणि भौतिक संसारावर प्रभुत्व दाखवितो. ते खूप छान शिक्षक आणि परिपूर्ण राजनीतीज्ञ होते, तसेच ते योगेश्वर (अशी अवस्था ज्या ठिकाणी प्रत्येक योगीला जायचे असते) होते आणि चोरही होते. त्यांचे वर्तन हे सर्व बाजूने संतुलित होते. त्यामुळेच त्यांचे व्यक्तिमत्त्व जाणून घेणे इतके कठीण आहे. ते द्वारकाधीश आणि योगेश्वर असे दोन्ही होते.
श्रीकृष्णाला समजून घ्यायचे असेल, तर राधा, अर्जुन किंवा उद्धव बनावे लागेल. तीन प्रकारचे लोक ईश्वराचा आश्रय घेतात. प्रेम करणारे, दु:खी असणारे आणि ज्ञानी. उद्धव ज्ञानी होते, अर्जुन दु:खी आणि राधा प्रेम होते. कोणीही कोणापेक्षा चांगला नाही, तर सर्व जण एकसमान आहेत. सर्वच चांगले आहेत. श्रीकृष्णाची शिकवण आपल्या काळासाठी अतिशय योग्य आहे. म्हणजे असे की, भौतिक गोष्टींमध्ये आपण पूर्णपणे हरवून जात नाही, तसेच आपण त्यातून पळूनही जात नाही. एखादी खचून गेलेली व्यक्ती त्यांच्या बोलण्याने पूर्णपणे उत्साही होते, तसेच संतुलित होते. श्रीकृष्ण आपल्याला भक्तिभावासोबतच कौशल्यही शिकवितात. जन्माष्टमी साजरी करणे म्हणजे चांगले गुण आत्मसात करणे आणि आपल्या जीवनात ते प्रत्यक्षात आणणे होय.
श्रीकृष्ण अर्जुनला सांगतात की, ‘तू मला अतिशय प्रिय आहेस.’ त्यानंतर म्हणतात की, आत्मसर्मपण करावे. आत्मसर्मपण हे आपल्या मानण्यावर असते. अगोदर तुम्हाला ते समजून घ्यायचे आहे आणि तशी वृत्ती बनवायची आहे. तुम्ही हे समजा की, तुम्ही त्या दिव्य शक्तीच्या प्रिय आहात, तरच तुम्हाला आत्मसर्मपण करता येईल. आत्मसर्मपण हे करण्याची गोष्ट नसून, ती मनाने मानण्याची आहे. ते केले नाही, तर आपण अज्ञानी आणि भ्रमात असतो. त्यामुळेच गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, जो सारखे लोकांचे धन्यवाद मानत नाही आणि कोणाचीही घृणा करीत नाही. धन्यवाद देणे म्हणजे तुम्ही दिव्य शक्तीला न मानता, दुसऱ्या कोणत्या तरी अस्तित्वाला मानत आहात. जेव्हा तुम्ही समाधान मानता, तेव्हा कर्माच्या तत्त्वाला किंवा दैवी शक्तीला आदरार्थी समजत नाही.
लोक जसे आहेत, तसे तुम्ही त्यांना सामावून घेतले पाहिजे. ते काय करतात, त्यासाठी त्यांना धन्यवाद देऊ नका, नाहीतर तुमची कृतज्ञता तुमच्या अहंकारावर केंद्रित होऊ शकते. तुम्ही आभारी राहा, पण कोणत्याही कार्यासाठी राहू नका. प्रत्येक व्यक्ती त्या परमशक्तीच्या हातातील बाहुले असते. सर्व काही ती परमशक्ती करीत असते. अशीच भावना तुम्ही तुमच्या मनात जागृत केली पाहिजे. जन्माष्टमी ख-या अर्थाने तेव्हाच साजरी होईल, जेव्हा तुम्ही तुमच्यात कृष्णाला जागवला. कृष्ण हा तुमच्यापासून दूर नाही, तर तो तुमच्यातच आहे. स्वत:मधील चेतना जागृत करा आणि जन्माष्टमी साजरी करा.

Web Title:  Wake up Krishna in your consciousness and celebrate Janmashtami ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.