...हा तर मूल्यांचाच खून!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 06:38 AM2019-01-09T06:38:25+5:302019-01-09T06:38:51+5:30

यवतमाळच्या साहित्य संमेलनाने निर्माण केलेला पेच केवळ साहित्यिकांच्या वर्तुळापुरताच मर्यादित नाही. तो साऱ्या समाजालाच एका कोंडीत उभा करणारा आहे.

This is the value of blood!, issue of nayantara sehgal | ...हा तर मूल्यांचाच खून!

...हा तर मूल्यांचाच खून!

सुरेश द्वादशीवार

यवतमाळच्या साहित्य संमेलनाने निर्माण केलेला पेच केवळ साहित्यिकांच्या वर्तुळापुरताच मर्यादित नाही. तो साऱ्या समाजालाच एका कोंडीत उभा करणारा आहे. मतस्वातंत्र्य वा अभिव्यक्तीस्वातंत्र्य हा राज्य घटनेने भारतीय नागरिकांना दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि त्याचे मूल्य साºयाच जाणकारांना समजणारे आहे. १९७५ च्या आणीबाणीत प्रस्तुत लेखकासह अनेक जण तुरुंगात असताना ‘मतस्वातंत्र्य हा केवळ काही राजकीय टीकाखोरांचा, धनवंत असंतुष्टांचा व सरकारवर रुष्ट असणाºया थोड्या लोकांचा मागणीचा मुद्दा आहे,’ असे ऐकविले जात होते. आता ही भाषा बदल करून ‘ही केवळ स्वत:ला प्रतिभावंत समजणाºयांची मिजास आहे,’ असे म्हटले जात आहे. वास्तव हे की, श्रीमंत वा प्रतिष्ठितांची कामे टेलिफोनवरही होत असतात. आपल्या प्रश्नांसाठी आक्रोश करीत गरिबांनाच रस्त्यावर यावे लागते. त्यामुळे मतस्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा कोणत्याही एका वर्गाचा नव्हे, तर समाजातील प्रत्येकच नागरिकाचा मूलभूत व जन्मसिद्ध म्हणावा असा अधिकार आहे.

या अधिकाराचा सर्वात मोठा जल्लोष करणारे व्यासपीठ साहित्य संमेलनाचे आहे. त्यात प्रतिभावंतांचा व विचारवंतांचा वावर असतो. ही माणसे समाजाने मार्गदर्शक म्हणून पाहिलेली असतात. आपल्या स्वातंत्र्याच्या व अन्य अधिकारांच्या अभिव्यक्तीसाठीही त्याला याच माणसांकडे पाहावे लागत असते. त्यामुळे हे व्यासपीठ केवळ बोलके नव्हे, तर निर्भीड व स्वातंत्र्याभिमुख असले पाहिजे. ते तसे राखण्याचे काम आजवरच्या संमेलनांनी केलेही आहे. यवतमाळच्या संमेलनाने या इतिहासाला एक दुबळे व दरिद्री वळण दिले आहे.
गेल्या काही वर्षांपासून मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला एका अमराठी विचारवंताला पाचारण करण्याची प्रथा पडली आहे. त्या प्रथेनुसार यवतमाळच्या आयोजकांनी प्रसिद्ध विचारवंत व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू आक्रमकपणे लढवीत असलेल्या नयनतारा सहगल यांना या संमेलनाचे उद्घाटक म्हणून आमंत्रित केले. सहगल यांनी आजवर केलेल्या लिखाणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाºया सरकारांना धारेवर धरले आहे. तसे करताना त्यांनी त्या सरकारांच्या पक्षीय भूमिकेचा विचार केला नाही. परिणामी, भाजपाएवढी काँग्रेसची सरकारेही त्यांच्या टीकेचे लक्ष्य ठरली आहेत. गेल्या चार वर्षांत साºया देशात दुहीचे राजकारण उफाळून वर आले आहे. त्यात धर्मांधता आहे, जात्यंधता आहे, स्त्रीद्वेष आहे, ग्रामीण जनतेविषयीचा दुस्वास आहे आणि गरिबांविषयीची घृणा आहे. नयनतारा सहगल यांनी या साºयांवर आपली लेखणी तलवारीसारखी चालविली आहे.

स्वत: सहगल या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी महिलेच्या, श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांच्या कन्या आहेत. उत्तर प्रदेशातील बहुसंख्याकवाद्यांनी गोमांसाच्या संशयावरून मुसलमानांच्या केलेल्या हत्या, गुजरातमधील दंगलीत तेथील सरकारने घडवून आणलेल्या मुस्लीमविरोधी दंगली, स्त्रियांना संरक्षण देणारे कायदे अस्तित्वात असतानाही, त्यांना स्वातंत्र्य नाकारणाºया सबरीमालासारख्या घटना, बँकांकडून व सरकारकडून जनतेला दिली जाणारी खोटी आश्वासने आणि एकूणच समाजाची होणारी फसवणूक या साºया गोष्टी त्यांच्या निशाण्यावर आहेत. यवतमाळला येण्याआधीच त्यांनी त्यांचे जे भाषण आयोजकांकडे पाठविले, त्यात त्यांच्या याच निष्ठांचा त्यांनी पाठपुरावा केला आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची असहिष्णू वृत्तींनी केलेली निर्घृण हत्या, इकलाखच्या कुटुंबाएवढीच मालेगाव, हैदराबाद व अन्यत्र झालेली अल्पसंख्याकांची कत्तल, नक्षलवादाचा आरोप ठेवून केवळ संशयावरून तुरुंगात धाडल्या गेलेल्या अनेक निरपराध्यांची होरपळ अशा साºयाच गोष्टी त्या भाषणात आहेत. साहित्य हा समाजाचा आरसा असेल, तर त्यात समाजाच्या सद्गुणांएवढेच हे दुर्गुणही फार स्पष्टपणे दिसले पाहिजेत. सारेच चांगले आहे, असे म्हटल्याने कोणत्याही दुरुस्तीला वाव उरत नाही. जनतेच्या मागण्या व स्वप्ने वाढत आहेत आणि सरकार ती पूर्ण करण्यात अपुरे पडत असल्याने प्रसंगी त्यांची गळचेपी करण्याच्याच प्रयत्नाला लागले आहे.

जनतेचे दरदिवशीचे प्रश्न रोजगारीचे आहेत, बेकारीचे आहेत, अन्नधान्याचे आहेत, शेतमालाला मागायच्या भावाचे आहेत. सरकार मात्र त्याकडे पाठ फिरवून पुतळे उभारण्याच्या, गावांची नावे बदलण्याच्या आणि साºया निळ्या आकाशाला भगवा रंग फासण्याच्या प्रयत्नात गुंतले आहे. नयनतारा सहगल यांचा सारा रोष या प्रवृत्तीवर आहे. त्यांच्या या रोषातून दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगलीही सुटल्या नाहीत. त्यांनी जेवढी टीका मोदींवर केली, तेवढीच ती इंदिरा गांधींवर व पुढे राजीव गांधींवरही केली आहे. गांधी कुटुंबात जन्माला येऊनही आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे जिवाच्या आकांतानिशी जपणाºया नयनतारा सहगल यांना निमंत्रण देऊन पाचारण करणे व मागाहून त्यांना ‘तुम्ही येऊ नका’ असे सांगणे, या एवढा लाचार साहित्यप्रकार दुसरा असणार नाही. कोणीतरी धमक्या देतो आणि अखिल भारतीय संमेलने अडवून धरतो, याएवढी समाजाची व सरकारचीही भयभीत आणि पडखाऊ अवस्था दुसरी नाही.


( लेखक नागपूर आवृत्तीत संपादक आहेत ) 

Web Title: This is the value of blood!, issue of nayantara sehgal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.