'राष्ट्रवादी'चं विसावं वरीस धोक्याचं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 08:25 AM2019-06-10T08:25:59+5:302019-06-10T08:26:32+5:30

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज (10 जून) द्विदशकपूर्ती साजरी करत आहे.

Twenty years after its formation, NCP faces a battle for survival | 'राष्ट्रवादी'चं विसावं वरीस धोक्याचं? 

'राष्ट्रवादी'चं विसावं वरीस धोक्याचं? 

Next

- नंदकिशोर पाटील 
शरद पवारांचाराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज (10 जून) द्विदशकपूर्ती साजरी करत आहे. या 20व्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या शुभेच्छा! साधारणपणे माणसाच्या आयुष्यात वयाच्या दहा ते वीस वर्षांपर्यंत कालखंड हा संक्रमणाचा काळ मानला जातो. कारण याच वयात मुलाची शारीरिक, मानसिक वाढ होऊन शहाणपण आलेलं असतं. आयुष्यात आपणांस कुठं जायचंय, काय मिळवाचंय, याचा निर्णय देखील याच टप्प्यावर घ्यावा लागतो. या वयाला ' पौगंडावस्था' असंही म्हणतात.

राष्ट्रवादीची सध्याची अवस्था आणि आजवरच्या वाटचालीवर नजर टाकली तर दिसते ते एवढेच की, स्थापनादिनी (10 जून 1999) या पक्षाच्या घड्याळात दहा वाजून दहा मिनिटं झाली होती. आणि आजही तेवढीच आहेत ! सांगायचं तात्पर्य काय, तर हा पक्ष 20 वर्षांनंतरही आहे तिथेच आहे. धड ना वृद्धी, ना घट. या अवस्थेला मुडदूस अवस्था म्हणतात. हे असं का झालं? शरद पवार यांच्यासारखा चाणाक्ष, धूर्त, अत्यंत  महत्त्वाकांक्षी आणि हवेची दिशा अचूक ओळखणारा जाणता नेता, सोबत जिल्ह्या-जिल्ह्यातील मातब्बर सुभेदार, त्यांनी उभारलेलं संस्थात्मक जाळं , त्यावर पोसलेले कार्यकर्ते एवढं सगळं असताना राष्ट्रवादी का वाढली नाही? पवारांच्याच शब्दांत सांगायचं तर 'भाकरी न फिरवल्यामुळं'!

राजकारण प्रवाही असतं. ते विशिष्ट व्यक्ती अथवा घराण्यात अडकून राहिले तर त्याचं डबकं होतं. पवारांच्या राष्ट्रवादीचं असंच डबकं झालंय का? पवार, मोहिते, भोसले, क्षीरसागर, पाटील, देशमुख, भुजबळ, सोळंके, टोपे, नाईक, निंबाळकर आणि तटकरे अशा बारा घरांचा हा पक्ष. (आडनावं वानगीदाखल. बरोबर असतील तर निव्वळ योगायोग !) पंचायत समिती,  जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा असो की साखर कारखाना, दूध संघ, बाजार समिती असो. सगळं काही या घराण्यात. सतरंजी उचलणारे थकून भागून शेवटी शिवसेना- भाजपाच्या आश्रयाला गेले. कार्यकर्त्यांनी सतरंजी झटकली तसे हे सुभेदार उघडं पडले. शरद पवार यांचं आजवर सगळं राजकारण ऊस आणि साखर कारखानदारीभोवती फिरत आलं आहे. पवारांनी नेहमीच धनिक बागायतदारांची बाजू घेतली. ऊस, द्राक्षे आणि डाळिंबासाठी पवारांनी जेवढे प्रयत्न केले तेवढा ओलावा त्यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांबद्दल दाखवला नाही, ही वस्तुस्थिती त्यांचे समर्थकही मान्य करतील. 

जागतिक बाजारपेठेमुळे गेल्या दहा वर्षांत साखर कारखानदारी अडचणीत आली. पण त्या अगोदर 2004 ते 2009 या पाच वर्षांत सत्तेच्या बळावर सहकारी साखर कारखाने कुणी मोडीत काढले? तोट्यात चालणारे हेच कारखाने खासगी मालकीचे होताच नफ्यात कसे आले? साखर कारखान्यांचे जे झाले तेच दूध संघाचे. सरकारी आणि सहकारी दूध संकलन यंत्रणा मोडीत काढून ती स्वतःच्या मालकीची कुणी केली? या व्यवहारात नेते मातब्बर झाले, पण सहकार संपला आणि पवारांच्या राजकारणाला घरघर लागली.

राजकीय पक्षाकडे किमान काही ध्येय, धोरण असावे लागते. कालानुरूप त्यात बदल होऊ शकतो, पण मुळात काहीतरी 'असावं' लागतं. या निकषांवर राष्ट्रवादीकडे काय आहे? सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्द्यांवर काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले ( वस्तुतः हकालपट्टी ) शरद पवार, तारिक अन्वर आणि पी. ए. संगमा या तीन महत्त्वाकांक्षी नेत्यांनी एकत्र येऊन 'राष्ट्रवादी काँग्रेस' हा पक्ष स्थापन केला. 1999ची विधानसभा लढविली आणि निकालानंतर सोनिया गांधी यांच्या काँग्रेस पक्षासोबत सरकार स्थापन केले! पवारांना दहा वर्षं राज्य आणि केंद्रात सत्ता मिळाली खरी, पण ती देखील काँग्रेसच्या आश्रयाला जाऊन. जिथे पर्याय म्हणून उभं राहायला हवं होतं तिथंच ते परावलंबी बनले!

शरद पवार यांच्या राजकारणाला धरसोडीचा शाप आहे. त्यांच्याविषयी कुणालाच खात्री बाळगता येत नाही. आज भलेही ते भाषणात शाहू, फुले, आंबेडकर या थोरांची नावं घेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जातीयवादी ठरवत असतील, 1978च्या पुलोद सरकारमध्ये जनसंघाला त्यांनीच सत्तेत सहभागी करून घेतले होते. आजही काही जिल्हा परिषदेत ते भाजपासोबत आहेतच की! आज देशाला/ राज्याला सक्षम अशा पर्यायी राजकीय पक्षाची, नेत्याची गरज आहे. वयोमानानुसार पवारांच्यावर अनेक मर्यादा आहेत. पक्षाची आज दशकपूर्ती साजरी करताना काळाची पावलं वेळीच ओळखून एक तर हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा अथवा अपेक्षित/ वंचित घटकातील तरुणांच्या हाती पक्षाची धुरा सुपूर्द करून आपण मार्गदर्शक व्हावे, एवढाच फुकटचा ( न मागता दिलेला ) सल्ला! पुनःश्च एकदा शुभेच्छा!!
( कार्यकारी संपादक, लोकमत )

Web Title: Twenty years after its formation, NCP faces a battle for survival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.