आज  धनत्रयोदशी - धन्वंतरी जयंती !

By दा. कृ. सोमण | Published: October 17, 2017 04:13 PM2017-10-17T16:13:09+5:302017-10-17T16:14:49+5:30

आज मंगळवार, १७ ऑक्टोबर, धनत्रयोदशी- धन्वंतरी जयंती !   दीपावली हा दिव्यांचा उत्सव ! हा प्रकाशाचा उत्सव असतो. आनंदाचा उत्सव असतो. तुम्हा सर्वाना माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !

Today Dhanteras means Dhanvantari Jayanti! | आज  धनत्रयोदशी - धन्वंतरी जयंती !

आज  धनत्रयोदशी - धन्वंतरी जयंती !

googlenewsNext
ठळक मुद्देहा सण शरद ऋतूमध्ये येतो. शेतातून नवीन धान्य घरामध्ये येते, म्हणून हा आनंदोत्सव साजरा केला जातोआर्यांचे पूर्वज उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते. सहा महिन्यांची रात्र संपून सहा महिन्यांच्या दिवसाला प्रारंभ होतो म्हणून दीपावलीचा आनंदोत्सव साजरा केला जातोप्रभु रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवून सीतेसह अयोध्येत परत आले म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो

          आज मंगळवार, १७ ऑक्टोबर, धनत्रयोदशी- धन्वंतरी जयंती !   दीपावली हा दिव्यांचा उत्सव ! हा प्रकाशाचा उत्सव असतो. आनंदाचा उत्सव असतो. तुम्हा सर्वाना माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !  अज्ञान, आळस, अंधश्रद्धा , अनीती-  भ्रष्टाचार या काळोखाला घालवून आपण ज्ञान, उद्योगीपणा,वैज्ञानिक दृष्टिकोन, नैतिकता यांचा प्रकाश आणूया !
तसेच मनातील आणि शभोवतालचे प्रदूषण दूर करण्याचा प्रयत्न करूया.
                   ' दीप्यते दीपयति वा स्वं परं चेति इति दीप: '
          ----' स्वत: प्रकाशतो किंवा दुसर्याला प्रकाशित करतो तो दीप होय '. दीप हे अग्नीचे किंवा तेजाचेच एक रूप आहे. दीपावली या सणाची उपपत्ती पुढीलप्रकारे सांगितली जाते.
१) हा सण शरद ऋतूमध्ये येतो. शेतातून नवीन धान्य घरामध्ये येते, म्हणून हा आनंदोत्सव साजरा केला जातो.
२) आर्यांचे पूर्वज उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते. सहा महिन्यांची रात्र संपून सहा महिन्यांच्या दिवसाला प्रारंभ होतो म्हणून दीपावलीचा आनंदोत्सव साजरा केला जातो.
३) प्रभु रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवून सीतेसह अयोध्येत परत आले म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.
४) बळीराजाने वामनापाशी वर मागितला, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेला दीपोत्सव साजरा केला जातो.
५) सम्राट अशोकाने दिग्विजयाप्रीत्यर्थ दीपोत्सव सुरू केला.तीच परंपरा पुढे चालू राहिली. अर्थात भारतासारख्या शेतीप्रधान देशात या दिवसात धान्य घरात येते हेच कारण योग्य वाटते. 
                             दीपदानाचे महत्त्व
       आज मंगळवार , दि. १७ ऑक्टोबर रोजी प्रदोषकाळी आश्विन कृष्ण त्रयोदशी असल्याने आजच धनत्रयोदशी आहे. या दिवशी यमराजाला प्रसन्न करून घेण्यासाठी ' दीपदान ' करण्याची प्रथा आहे. आज उपवास करून विष्णू, लक्ष्मी,कुबेर,योगिनी, गणेश, नाग, आणि द्रव्यनिधी या देवतांचे पूजन करतात. अखंड दीप लावला जातो. दुधाचा नैवेद्य अर्पण केला जातो. काही लोकांमध्ये धने-गूळ यांचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. महत्वाची  गोष्ट म्हणजे गरजू लोकांना आज दीपदान करावयाचे असते. गरीबानाही दीपावलीचे पुढचे दिवस घरात दीप लावून आनंदोत्सव साजरा करता यावा हा यामागचा  हेतू आहे. तसेच केवळ दीपच नव्हे, तर त्याबरोबर गरजूंना नवीन कपडे व मिठाईचेही दान करावे. 
     यमदीपदानासंबंधी एक कथा सांगितली जाते. एकदा यमराजाने यमदूताना विचारले - " तुम्ही जेंव्हा प्राणिमात्रांचे जीव हरण करता तेंव्हा तुम्हाला दया येत नाहीका ? कधी असा कठोर प्रसंग आला आहे का ? "
     त्यावेळी यमदूत म्हणाले -" ज्यावेळी कमी वयाच्या माणसाचे प्राण हरण करावयाचे असतात त्यावेळी जो आकांत होतो तो खूप ह्रदयद्रावक असतो. म्हणून महाराज, अपमृत्यू  टाळण्यासाठी तुम्ही काहीतरी उपाय सांगा. "
     यांवर यमराज म्हणाले -" धनत्रयोदशीच्या दिवशी जो दीपदान, वस्त्रदान, अन्नदान करून परोपकार करील त्याच्या घरात कधीही अपमृत्यू होणार नाहीत."
    महर्षी व्यास आणि संत तुकारामानी सांगितले आहे की गरीबाना मदत हेच पुण्यकर्म ! आणि गरीबाना त्रास देणे म्हणजे पाप कर्म ! गरीबांना समाजातील इतर  लोकांनी मदत करावी म्हणून दीपावलीच्या प्रारंभी धनत्रयोदशीच्या दिवशी  हे परोपकाराचे कार्य करण्यास सांगितलेले आहे.
      तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी दागिन्यांची स्वच्छता करण्याची प्रथा आहे. दीपावलीच्या दिवसात हे दागिने घालावयाचे असतात म्हणून ही प्रथा पडली असावी. या दिवशी काही लोक धन आणि दागिने यांची पूजा करतात. तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी व्यापार लोक शुभ चौकडी मुहूर्त पाहून नवीन वर्षाचे हिशोब लिहीण्यासाठी वह्या खरेदी करतात.
                                                  धन्वंतरी पूजन
             आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी यांचा जन्म धनत्रयोदशीच्या दिवशी झाला असे काही संशोधकांचे मत आहे. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी पूजन करण्याची प्रथा आहे. तसेच आज धनत्रयोदशीच्या दिवशी गावातील एका ज्येष्ठ, श्रेष्ठ डाॅक्टरांचा ' धन्वंतरी पुरस्कार ' देऊन सत्कार केला जातो. पूर्वी फॅमिली डाॅक्टरची प्रथा होती त्यावेळी लोक आपल्या फॅमिली डॉक्टरचाही फुले देऊन सत्कार करीत असत.
           प्राचीनकाळी दोन धन्वंतरी होऊन गेल्याचा उल्लेख सापडतो. यापैकी पहिले धन्वंतरी  ' देवांचें वैद्य ' होते. हे विष्णूचा अवतार होते. समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून जी चौदा रत्ने बाहेर पडली त्यात या धन्वंतरींचा समावेश होता. " धनु: शल्यशास्त्रं, तस्य अंत:पारं इरति गच्छतीति धन्वंतरी: " 
म्हणजे जो शल्यशास्त्र पारंगत आहे तो धन्वंतरी होय. धन्वंतरीना आदिदेव, अमरवर, अमृतयोनी, सुधापाणी इत्यादी नावे आहेत. याच धन्वंतरीनी ' चिकित्सा-तत्त्वविज्ञान ' नावाचा ग्रंथ लिहीला असे काही संशोधकांचे मत आहे. या धन्वंतरींच्या हातामध्ये अमृतकलश दाखविलेला असतो. 
        दुसरे धन्वंतरी हे आद्य धन्वंतरीचे पुनरावतार मानले जातात. यांचा जन्म काशीच्या चंद्रवंशी राजकुलात झाल्याचा उल्लेख सापडतो. हे धन्वंतरी हे आयुर्वेदाचे प्रवर्तक मानले जातात. त्यांनी भारद्वाजांकडून आयुर्वेद ज्ञान प्राप्त करून त्याची आठ भागांत विभागणी केली. तसेच त्यांनी ते ज्ञान आपल्या अनेक शिष्यांना दिले. त्यांनी चिकित्सादर्शन, चिकित्साकौमुदी, योगचिंतामणी, सन्निपातकलिका, गुटिकाधिकार, धातुकल्प, अजीर्णामृतमंजरी, रोगनिदान, वैद्यचिंतामणी, विद्याप्रकाशचिकित्सा, धन्वंतरीनिघंटू, वैद्यकभास्करोदय आणि चिकित्सासंग्रह असे तेरा ग्रंथ लिहीले.  प्राचीन काळी ज्यावेळी कोणतीही साधने नव्हती त्यावेळी संशोधन करून ग्रंथाद्वारे शिष्यांना दिलेले हे ज्ञान पाहून आपले हात त्यांना वंदन करण्यासाठी सहजपणे जोडले जातात.
आज संपूर्ण जगाला भारतीय आयुर्वेदाचे महत्त्व पटलेलेआहे.
                                                  आकाशकंदील 
      दिवाळीच्या दिवसात आकाशकंदील लावण्याची परंपरा आहे. आजपासून कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत आकाशकंदील लावला जातो. आकाशकंदील बाजारातून विकतआणण्यापेक्षा स्वत: तो तयार करण्यात खूप आनंद मिळतो हे मी माझ्या अनुभवांवरून तुम्हाला सांगत आहे. मी लहान असताना बांबूच्या काड्यांपासून षट्कोनी आकाराचा आकाशकंदील तयार करीत होतो. नंतर मी 'पायलीचा आकाशकंदील ' करू लागलो. कागदाचा गोलाकार करून त्या कागदामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांची चित्रे कापून बाहेर दुसरा कागदाचा गोलाकार असे. आकाशकंदिलात मध्ये पणतीचा दिवा ठेवला की आतला गोल फिरू लागे. मग ती चित्रे बाहेरच्या गोलावर दिसू लागत. कदाचित तुम्हीही तुमच्या लहानपणी असे आकाशकंदील करीत असाल. त्यावेळेस स्वत: आकाशकंदील करतांना खूप मज्जा यायची.
      आकाश कंदील घराबाहेर लावण्याचा मूळ हेतू असा आहे की, आपण लावलेल्याया आकाशकंदिलांचा प्रकाश आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो अशी समजूत आहे. गंमत म्हणजे चीन, जपान आणि तिबेटमध्येही अशीच समजूत आहे. आकाश कंदीलांची मूळ कल्पना चिनी लोकांचीच आहे. विमानाकृती, मत्स्याकृती,बहुकोनाकृती, गोलाकृती, हंसाकृती,  तारकाकृती आकाशकंदील दीपावलीची शोभा वाढवीत असतात.
                                              इकोफ्रेंडली दिवाळी
      मध्यंतरी फटाक्यांवर बंदी आणण्यासंबंधी सर्वत्र चर्चा सुरू होती. आपले सण-उत्सव हे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी असतात. पर्यावरणाचे भक्षण करण्यासाठी नसतात.  सणांचा मूळ उद्देश पर्यावरणाचे रक्षण हाच आहे. आपण जर निसर्गाला जपले तरच निसर्ग आपणास जपणार आहे. म्हणून कोणताही सण साजरा करीत असतांना जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, वायूप्रदूषण होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. शाळांमधून हजारो विद्यार्थी " फटाके वाजविणार नाही " अशी प्रतिज्ञा घेतात. त्यामुळे मागील दोन वर्षे आपण पाहिले तर फटाके वाजविण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. हा प्रश्न केवळ कायदे करून सुटणारा नाही. इथे जन जागृती, समाज प्रबोधन करण्याची जरूरी आहे. पर्यावरण सांभाळून प्रदूषण न करता साजरी केली जाणार्या दिवाळीला ' ' इकोफ्रेंडली दिवाळी ' म्हणतात. आजपासून दिवाळीला प्रारंभ होत आहे. आकाशकंदीलात प्लॅस्टिकचा, थर्मोकोलचा वापर आपण टाळूया. फटाके लावून ध्वनिप्रदूषण आणि वायूप्रदूषण करणे आपण टाळूया आणि आपण दीपावलीचा प्रकाशाचा उत्सव आपण आनंदात साजरा करूया. आपण आनंदात असतांना इतरांच्या जीवनातही आनंद निर्माण करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया.
(लेखक पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक आहेत)

Web Title: Today Dhanteras means Dhanvantari Jayanti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.