स्वातंत्र्य आहे, पण निंदा-नालस्तीचे नव्हे!

By विजय दर्डा | Published: May 20, 2019 04:53 AM2019-05-20T04:53:43+5:302019-05-20T04:54:04+5:30

मालेगावमधील दहशतवादी बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आणि भाजपच्या तिकिटावर भोपाळमधून लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विखारी वक्तव्यांनी संपूर्ण देश ...

There is freedom, but not condemnation! | स्वातंत्र्य आहे, पण निंदा-नालस्तीचे नव्हे!

स्वातंत्र्य आहे, पण निंदा-नालस्तीचे नव्हे!

googlenewsNext

मालेगावमधील दहशतवादी बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आणि भाजपच्या तिकिटावर भोपाळमधून लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विखारी वक्तव्यांनी संपूर्ण देश स्तंभित झाला आहे. आधी या प्रज्ञासिंह यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा अपमान केला. मला आरोपी ठरविल्याने लागलेले सुतक त्यांच्या निधनामुळे सुटल्याचे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले. तो वाद शमतो न शमतो तोच नंतर त्यांनी ब्रिटिशांच्या गुलामीतून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त ठरविले. साहजिकच प्रश्न पडतो की, प्रज्ञासिंह यांना अशी हिम्मत झालीच कशी? याचे उत्तर सरळ आहे. आपल्याच विचारसरणीचे सरकार आहे व ते आपल्या पाठीशी उभे राहील, अशा खात्रीनेच प्रज्ञासिंह यांनी हे वक्तव्य केले. याचे दुसरे कारण असे की, काँग्रेस व त्यांच्याशी संबंधित संघटना काही बोलत नाहीत. ज्या व्यक्तीने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांच्याविषयी अशी भावना असूच कशी शकते? खरे तर या प्रज्ञासिंह यांचा देशात सर्वदूर धिक्कार व्हायला हवा होता, परंतु तसे होताना दिसत नाही, हे दुर्दैव आहे.


प्रज्ञासिंह यांच्या या बरळण्याने संपूर्ण देशाप्रमाणे मीही व्यथित झालो. प्रज्ञासिंह यांना याची कल्पनाही नसेल की, ज्यांच्या मारेकऱ्याला आपण राष्ट्रभक्त म्हणत आहोत, त्या महात्माजींमुळे केवळ भारतालाच नव्हे, जगातील तब्बल ४० देशांना स्वातंत्र्य मिळाले होते. बापूंची हत्या ही केवळ एका व्यक्तीची हत्या नव्हती, तर गांधीवादी विचार संपविण्याचा तो प्रयत्न होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये केलेले भाषण मला चांगले आठवते. त्यात ते म्हणाले होते की, महात्मा गांधी नसते, तर कदाचित मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षही होऊ शकलो नसतो. थोर वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटले होते की, महात्मा गांधी यांच्यासारखी व्यक्ती या जगात कधी काळी होऊन गेली, यावरच कोणी सहज विश्वास ठेवणार नाही. महात्माजींचे व्यक्तिमत्त्व एवढे महान होते.


महात्मा गांधींच्या मारेकऱ्याला कोणी देशभक्त म्हणूच कसे शकतो, हेच मला कळत नाही. अशा बेताल वक्तव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने समर्थन तर अजिबात केले जाऊ शकत नाही. भारतीय संविधानाने नागरिकांना बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, याचा अर्थ मनाला येईल ते बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, असा बिलकूल नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वत: महात्मा गांधी या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते होते, याची या प्रज्ञासिंहना कल्पना तरी आहे का? ‘यंग इंडिया’ या आपल्या साप्ताहिकात सन १९२२ मध्ये लिहिलेल्या एका लेखात महात्माजींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केला होता. त्या वेळी गुलामीत असलेल्या देशासाठी ती एक खूप मोठी गोष्ट होती.


प्रज्ञासिंह यांना याचेही स्मरण द्यायला हवे की, गांधीजींच्या आधी राजा राममोहन रॉय व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनीही समाजाला मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य असेल, तरच व्यवस्थेत बदल करणे शक्य होते, हा विचार ठामपणे मांडला होता. यामुळेच स्वातंत्र्यानंतर भारताने स्वीकारलेल्या संविधानाच्या अनुच्छेद १९(१) अन्वये प्रत्येक नागरिकास अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत हक्क मिळाला. भविष्यात कधी भारतात प्रज्ञासिंह नावाची व्यक्ती येईल व आपण देत असलेल्या या स्वातंत्र्याचा सर्रास दुरुपयोग करेल, याची कल्पनाही घटनाकारांनी केली नसेल.


मला तर भारतीय जनता पक्षाच्या प्रामाणिकपणावरच शंका येते. याचे कारण म्हणजे, या पक्षाने प्रज्ञासिंह यांच्याविरुद्ध एक शब्दही काढलेला नाही. भाजपचे हे मौन म्हणजे त्या पक्षाने केलेले प्रज्ञासिंंह यांचे समर्थन मानायचे का? मध्य प्रदेशात खरगोण येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त एवढेच म्हणले की, गोडसे संबंधीच्या वक्तव्याबद्दल मी प्रज्ञासिंहना मनापासून कधीही क्षमा करू शकणार नाही! देशाच्या पंतप्रधानाने केवळ एवढेच सांगणे पुरेसे आहे? नक्कीच नाही! खरे तर संपूर्ण भाजप या संदर्भात प्रज्ञासिंह यांच्या ठामपणे पाठीशी आहे, ही वस्तुस्थिती आहे. भोपाळची एक जागा जिंकण्यासाठी भाजपने प्रज्ञासिंहना केवळ पक्षात घेतले. एवढेच नव्हे, तर त्यांना तेथून उमेदवारीही दिली. असा पक्ष प्रज्ञासिंह यांच्याविरुद्ध कारवाई करेल, अशी अपेक्षा तरी कशी करावी?


मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार असल्याने, ते तरी प्रज्ञासिंह यांच्याविरुद्ध कडक कारवाई करतील, अशी अपेक्षा होती, परंतु तसे काही झाले नाही. मला असे विचारायचे आहे की, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात केलेल्या भाषणाबद्दल कन्हैय्या कुमार यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदला जातो, उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे व्यंगचित्र काढणाºयावर कायद्याचा बडगा उगारला जातो व ममता बॅनर्जी यांचे विकृत चित्र समाजमाध्यमांवर टाकणाºया प्रियांका शर्माला अटक होऊ शकते, तर मग प्रज्ञासिंह यांच्यावर तशीच कारवाई का होऊ नये, पण मध्य प्रदेश सरकारचे स्वस्थ बसणे आश्चर्यजनक आहे. काँग्रेसच्या दृष्टीने हे खूपच नुकसानकारक ठरू शकते.

- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड, लोकमत समूह.

Web Title: There is freedom, but not condemnation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.