गूढ कथाकाराची जन्मशताब्दी...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 12:02 PM2022-07-10T12:02:14+5:302022-07-10T12:04:20+5:30

श्रेष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला  १० जुलैपासून प्रारंभ होत आहे. जीए कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, अक्षरधारा यांच्यावतीने वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त...  

The birth centenary of the mysterious storywriter G.A. Kulkarni | गूढ कथाकाराची जन्मशताब्दी...

गूढ कथाकाराची जन्मशताब्दी...

Next

- प्रा. मिलिंद जोशी 

आधुनिक मराठी लघुकथेच्या क्षेत्रात जी. ए. कुलकर्णी यांनी कथाकार म्हणून अतुलनीय निर्मिती केली आहे. त्यांचे नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी. जन्म बेळगावचा. वडील कोर्टात लिपिक होते. जी. ए. लहान असतानाच ते वारले. ते शाळेत जाऊ लागल्यानंतर आईचेही निधन झाले. बहिणीदेखील अकाली वारल्या. लहान वयातच नियतीच्या तडाख्यांमुळे त्यांचे अंत:करण विदीर्ण झाले. त्यामुळेच जीवनाची अर्थशून्यता आणि नियतीवाद हा लहानपणापासून त्यांच्या चिंतनाचा विषय बनला. ज्याला नियती म्हटले जाते. तीच माणसांची आयुष्ये निर्धारित करते, हा सारा कळसूत्राचा खेळ आहे. लौकिक अर्थाने त्याला योगायोग म्हटले जाते पण हे नियतीदानच आहे. अशा नियतीच्या हातचे खेळणे बनलेली माणसेच जीएंच्या बहुतांश कथांच्या केंद्रस्थानी आहेत. 

१९३१ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. इंग्रजी विषय घेऊन त्यांनी लिंगराज महाविद्यालयात प्रवेश घेतला. एम.ए. झाल्यानंतर ते काही काळ मुंबईच्या सरकारी कचेरीत नोकरीला होते. १९४७ला ते परत बेळगावला आले आणि हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. असांकेतिक, अनोख्या, आक्षेपार्ह मानवी व्यवहारासंबंधी त्यांना प्रचंड कुतूहल होते. काही अमानुष सिद्धी, शक्ती साध्य करण्यासाठी जी साधना माणसे गुप्तपणे करतात. तिची माहिती मिळविणे हाही त्यांच्या कुतूहलाचा भाग होता. ही माहिती त्यांना त्यांच्या महाविद्यालयातला शिपाई तिरकाप्पा देत असे. या साऱ्यातून अनुभवाचा मोठा खजिना त्यांच्या हाती लागला. ‘माणूस नावाचं बेट’ या कथेमुळे जीएंनी वाचकांचे लक्ष वेधून घेतले. 

स्थळ काळात असणारी आयुष्याची सुख दु:खे, त्यांच्या तळाशी असणारे अविनाशी सत्य त्याचे दर्शन घडविण्याचा, वेध घेण्याचा प्रयत्न या गंभीर प्रकृतीच्या कथाकाराने केला. जीएंनी चार प्रकारच्या कथा लिहिल्या. पारंपरिक पद्धतीच्या कौटुंबिक कथा, ज्यांचा दु:खांत शेवट असतो. मानवी व्यवहारात काही घटना व संघर्ष मूलभूत स्वरुपाचे असतात, त्यांच्या कथा. आधुनिक काळाशी संदर्भित रूपक कथा अगर बोधकथा आणि ग्रीक, पाश्चिमात्य साहित्यातील गाजलेल्या कथांचा, आधुनिक काळाशी सुसंगत अर्थ व्यक्त करणाऱ्या कथा. काही समीक्षकांना जीएंनी कथेत गुंतून न पडता कादंबरीकडे वळायला हवे होते, असे वाटते. त्याबद्दल जीएंनी स्वत: एक महत्त्वाचा लेख लिहिला. त्यात ते म्हणतात, ‘मी केवळ कथा लिहिल्या कारण, हा साहित्य प्रकार मला आव्हानात्मक वाटतो. कथालेखन हा कादंबरी लेखनासाठी केलेला रियाज नसतो. कोळ्याने विणलेल्या जाळ्याला जसा केंद्रबिंदू असतो. त्याप्रमाणे लघुकथेलाही एक सेंद्रिय स्वरुपाचे केंद्र असते.’ जीएंना आपल्या मित्रांना, चाहत्यांना पत्रे लिहिण्याचा छंद होता. साहित्यिक जगातल्या सांकेतिक मान-सन्मानांपासून ते तसे दूरच राहिले. दोन सन्मान त्यांना मिळाले. साहित्य अकादमीचे पारितोषिक  त्यांच्या काजळमाया कथासंग्रहाला मिळाले. ते त्यांनी स्वीकारले पण  तांत्रिक कारणांसाठी जेव्हा वाद झाला तेव्हा त्यांनी ते परत केले.  

जीएंच्या निधनानंतर पुण्यातल्या एका रस्त्याला जी. ए. कुलकर्णी पथ असे नाव दिले. त्या समारंभाला पु. ल. देशपांडे उपस्थित होते. जीएंच्या नावाची पाटी उंच असल्यामुळे तिचे अनावरण करताना पुलंना थोडी यातायात करावी लागली. भाषणात पूल म्हणाले, ‘जीए नावाच्या पाटीपर्यंत पोहोचण्यासाठी इतके कष्ट पडतात. त्यांच्याइतकी प्रतिभेची उंची गाठणे किती अवघड आहे, हे सांगायलाच नको. जीए हे मराठी कथेतले उत्तुंग शिखर आहे. त्याला अभिवादन करण्यातच मी धन्यता मानतो.’ पुलंची ही भावना समस्त मराठी माणसांची आहे.

(लेखक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत.)

Web Title: The birth centenary of the mysterious storywriter G.A. Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.