ते चिंचेचे झाड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 03:20 AM2018-06-05T03:20:44+5:302018-06-05T03:20:44+5:30

 That tamarind tree ... | ते चिंचेचे झाड...

ते चिंचेचे झाड...

Next

‘ते चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी’ या मराठी भावगीतात भलेही चिनार वृक्षाचे गुणगान गायले असले तरी चिंचही काही कमी नाही. किंबहुना चिंचेचा भाव वधारला आहे. शिवाय चिनार हा काश्मीरपुरता मर्यादित. त्याचे सौंदर्य असेलही, पण चिंचेच्या चवीची त्याला काय सर येणार? चिंच येथेच बाजी मारत नाही, तर बाजारातही तिचा भाव कायम वधारलेला असतो. ‘पैसे दिले, चिंचोके नाही’ असे म्हणत आपण चिंचोक्याला क्षुल्लक समजत असलो तरी याच चिंचोक्यांचा भाव ज्वारीपेक्षाही जास्त आहे. हे सारे चिंचेचे गुणगान यासाठी की वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी ‘शिवाई’ नावाचे एक नवीन वाण शोधून काढले. दहा वर्षांच्या संशोधनानंतर त्यांना यश मिळाले. अशा संशोधनाला वेळ द्यावा लागतो. शिवाय चिकाटीही हवी. चिंचेमध्ये टार्टारिक अ‍ॅसिड हा महत्त्वाचा घटक जो आंबटपणाचे प्रमाण ठरवतो. चिंचेचे हे वाण सरस असण्याचे कारण म्हणजे तिचे वजन, गराचे प्रमाण आणि उत्पादन याबाबतीत ती सरस ठरते. हे संशोधन कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे आहे. कोणत्याही नवीन मान्यता मिळविण्यासाठी काही निकष आहेत. प्रामुख्याने प्रस्थापित वाणांपेक्षा उत्पादन जास्त असले पाहिजे. कृषी विद्यापीठाच्या औरंगाबादस्थित हिमायतबाग फळ संशोधन केंद्राने यापूर्वी शोधून काढलेल्या नं. २६३ या वाणापेक्षा ‘शिवाई’ हे वाण १५ टक्के जास्त उत्पादन देणारे ठरले आहे. शाश्वत स्रोत. फळबागा या उत्पन्नाचे कायमचे साधन होऊ शकतात. त्यातही चिंचेचे महत्त्व अनन्यसाधारण. मराठवाड्यातील भूम-परंड्याचा परिसर, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पूर्वी विवाह ठरविताना शेतात चिंचेची झाडे किती, असा प्रश्न केला जाई. कारण ते हमखास उत्पन्नाचे साधन होते. आज आम्हाला झटपट पैसा हवा आहे, त्यामुळे चिंच लागवडीकडे कल कमी झाला आहे. हे उत्पादन लवकर कसे मिळविता येईल, यादृष्टीनेही संशोधन होण्याची गरज आहे. परवाच दादाजी खोब्रागडे या ‘बेअरफूट इनोव्हेटर’चा मृत्यू झाला. ज्याने तांदळाच्या जाती शोधल्या होत्या. कृषी विद्यापीठाने ‘शिवाई’ हे वाण शोधले. ते शेतकºयांसाठी उपयुक्त आहे. म्हणून अशाच संशोधनाची विद्यापीठांकडून गरज आहे. असे मूलगामी संशोधनच शेतीचे बिघडलेले अर्थशास्त्र सुधारण्यात मदत करू शकेल. मान्सूनच्या आगमनाची शुभ वार्ता, त्यापाठोपाठ डॉ. संजय पाटीलचे संशोधन शेती व शेतकºयांसाठी आश्वासक म्हणता येईल. पाण्याअभावी शेती हे शाश्वत उत्पन्नाचे साधन होऊ शकत नाही आणि कोरडवाहू शेती शाश्वत करण्यासाठी पावसावर अवलंबून राहावे लागते. शाश्वत शेतीच्या संकल्पनेला मूर्तरूप मिळण्यासाठी नैसर्गिक साधनांची उपलब्धता, पर्यावरण पोषकता हे घटक महत्त्वाचे ठरतात. सध्याच्या ग्लोबल वार्मिंगच्या काळात तर ऋतुचक्र बिघडण्याचे प्रमाण अधिक. रोहिण्या बरसल्या आणि मान्सून उंबरठ्यावर आला. ७ जून रोजी त्याचे आगमन म्हणजे मुहूर्त गाठण्याचा प्रकार, असा योग गेल्या बºयाच दिवसांत नव्हता; पण यावर्षी तो जुळून आलेला दिसतो. किंबहुना हा मान्सून एखादा दिवस अगोदरच अवचितपणे दारात येऊन उभा राहील. त्याची ही उभारी, वेग हे पुढचे चार महिने सातत्य टिकवेल का, हा खरा प्रश्न आहे. शाश्वत शेतीचा विचार करताना तो महत्त्वाचा ठरतो. मान्सून वेळेवर आला तरी जुलैमध्ये त्याची दांडी मारण्याची सवय गेल्या काही वर्षांत फार ठळकपणे लक्षात राहते. त्याची गैरहजेरी जेवढी जास्त तेवढे शेतीचे नुकसान जास्त. शाश्वत शेतीचा विचार करताना अशा प्रतिकूल गोष्टींना सामोरे जाण्याची तयारी अगोदरच करावी लागते. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून फळबाग लागवडीकडे शेतकरी वळतो. एकतर हाती पैसा पडतो, शिवाय बाजारपेठेत मागणीही कायम असते. आता या फळबागांमध्ये अत्यल्प पाणी लागणारे एक फळ म्हणजे चिंच. ज्याची गरज घरोघरी असते; पण त्याच्या बाजारपेठ मूल्याकडे आपण फार लक्ष देत नाही. या नवीन वाणाच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग म्हणून संपूर्ण राज्याला ही संधी चालून आली आहे.

Web Title:  That tamarind tree ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.