स्वदेशी ‘मीटू’ स्वागतार्ह; या चळवळीची दखल घ्यायलाच हवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 03:32 AM2018-10-12T03:32:13+5:302018-10-12T03:32:28+5:30

स्त्रियांच्या मौनाचा गैरवापर करून वर्षानुवर्षे सत्तेत राहणाऱ्या, प्रसिद्धीत झळकणा-या आणि संपत्तीत बोलणा-या माणसांच्या विकृत कथा त्यामुळे समाजासमोर आल्या तर ते येथे इष्टच ठरणार आहे. अखेर समाज हाच संस्कृतीचा व नैतिकतेचा खरा रक्षक आहे.

Take note of Swadeshi #MeToo'; The current movement is like the voice raised against the abuse. | स्वदेशी ‘मीटू’ स्वागतार्ह; या चळवळीची दखल घ्यायलाच हवी!

स्वदेशी ‘मीटू’ स्वागतार्ह; या चळवळीची दखल घ्यायलाच हवी!

Next

तनुश्री दत्ता या नटीने नाना पाटेकरला आरोपीच्या पिंज-यात उभे केल्यापासून भारतात अमेरिकेतील ‘मी-टू’ या चळवळीचा आरंभ झाला आणि एकेक करीत स्त्रिया पुढे येऊन त्यांच्यावर ओढवलेल्या लैंगिक आपत्तीच्या कहाण्या लोकांना व माध्यमांना सांगू लागल्या. त्यातल्या खरे-खोटेपणाची शहानिशा होऊन त्यातले सत्य बाहेर यायचे तेव्हा येईल. मात्र या चळवळीने स्त्रियांना व विशेषत: तरुण मुलींना त्यांच्यावर लादल्या जाणा-या अनैसर्गिक आपत्तींना तोंड द्यायला बळ दिले ही महत्त्वाची, समाजाला कलाटणी देणारी व स्वागतार्ह बाब आहे. अमेरिकेतील अनेक नट्यांनी त्यांच्याशी दिग्दर्शक व अन्य कलावंतांनी केलेल्या असभ्य व अमंगळ वर्तनाच्या ज्या गोष्टी बाहेर आणल्या त्यात सात वेळा हाउस आॅफ रिप्रेझेेंटेटिव्हझ्मध्ये निवडून आलेल्या आपल्या बापाने आपल्याशी तसेच चाळे केले हे सांगायला एक विवाहित व तरुण स्त्रीही धाडसाने पुढे आली. ज्या कोवलानची निवड अमेरिकेच्या सिनेटने परवा सर्वोच्च न्यायालयावर केली त्याच्याविरुद्ध तसे बोलायला तरुणींची एक फौजच पुढे आलेली दिसली. सिनेटमधील आपल्या सदस्यसंख्येच्या बळावर रिपब्लिकन पक्षाने त्याच्या निवडीला मान्यता दिली असली तरी तो सत्पुरुष आणि ते सर्वोच्च न्यायालय यापुढे जगाला डागाळलेलेच दिसणार आहे.

भारतात ज्या आघाडीवरच्या महाभागांची नावे यात पुढे आली त्यात संपादक, पत्रकार, मान्यताप्राप्त लेखक व एम.जे. अकबर हे मंत्रीही आहेत. या मंत्र्यावर तसे आरोप करायला सात स्त्रिया पुढे आल्या. त्यातल्या कुणीही त्यांच्यावरील आरोप मान्य केले नाही व तसे ते करण्याची शक्यताही अर्थातच नाही. मात्र एवढ्या नामांकित व्यक्तीच्या कथित लैंगिक अध:पतनाबद्दल स्त्रिया भारतात बोलू लागल्या हा देशात येऊ घातलेल्या लैंगिक व नैतिक स्वच्छतेचाच पायगुण समजला पाहिजे. स्त्रीने केलेला प्रत्येकच आरोप खरा मानण्याचे कारण नाही. मात्र असा आरोप करीत समोर यायला जे मानसिक बळ लागते ते नक्कीच महत्त्वाचे व समाजाच्या हिताचे मानले पाहिजे. या स्त्रियांचा हेतू छळाचा नाही, पैसे उपटण्याचा नाही आणि प्रसिद्धी मिळविण्याचाही नाही. तो आहे अन्यायाला वाचा फोडण्याचा आणि ही वाचा आज नाही तर उद्या आणि वर्षानुवर्षांनीही फोडली तरी ती ऐकून घेणेच समाजाला भाग आहे. या मुलीनी एवढी वर्षे त्यांच्यावरील अन्यायाबाबत मौन राखले म्हणून त्या दोषी आहेत व त्यांच्यातच काही खोट आहे, असे म्हणणे हा निव्वळ दांभिकपणा आहे. तसे म्हणणारे लोक थेट महाभारतातील कुंतीपासून इतरांना नावे ठेवीत आहेत असेच मग म्हटले पाहिजे.

स्त्री हा समाजाच्या सांस्कृतिक सन्मानाचा विषय असेल तर तिचे गाऱ्हाणे तसेच ऐकले गेले पाहिजे. या घटनांचा काही स्त्रिया गैरफायदा घेतील ही शक्यता नाकारता येत नाही. मात्र असा गैरलाभ आजवर ज्या पुरुषांनी घेतला त्यांचे काय? स्त्री बोलत नाही, अपमान गिळते आणि मुकाट्याने सारे गैरप्रकार पचविते या विश्वासामुळेच तर तिच्यावर असेच प्रसंग लादले जातात. ते थांबवायचे असतील तर त्यासाठी सरकार पुरेसे नाही, पोलीस पुरेसे नाहीत आणि आता तर कुटुंबही पुरेसे राहिले नाही. त्यासाठी स्त्रियांनी पुढे येऊन बोलण्याची गरज आहे. त्यात जर कुणी लबाडी केली तर तीही लगेच चव्हाट्यावर येईल आणि संबंधित तिला शिक्षाही होईल. आजवर समाजानेच पुरुषांना संरक्षण दिले व प्रसंगी त्यांचे गैरव्यवहार खपवून घेतले. आता त्याला स्त्रियांबाबतही आपली संरक्षणाची जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल. पोलीस येतील, सरकारही येईल, स्त्रियांच्या संघटनाही मागे राहणार नाही. मात्र जी स्त्री स्वत:हून पुढे येऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाची कहाणी सांगते तिचा विचार पोलिसांच्या साध्या ‘एफआयआर’हून अधिक गंभीरपणे केला जाणे व संबंधित विकृताला तत्काळ धडा शिकविणे हे आता सरकारसह समाजालाही करावे लागेल. पापे कानावर येत नाहीत म्हणून ती घडत नाहीत असे समजणे हा निव्वळ शहामृगी प्रकार आहे. तो समाजातील अपप्रकार खपवून घेतो व वाढवितो. आताची ‘मी-टू’ ही चळवळ या अपप्रकाराविरुद्ध उठविलेल्या आवाजासारखी आहे.

Web Title: Take note of Swadeshi #MeToo'; The current movement is like the voice raised against the abuse.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.