Small mouth ... | लहान तोंडी...
लहान तोंडी...

सत्तेतले लहानसेही पद मिळाले की काहींना ज्ञानाची नसलेली शिंगे फुटू लागतात. मग अशी माणसे आपला आवाका लक्षात न घेता भल्याभल्यांनाच नव्हे तर मोठमोठ्या क्षेत्रांनाही उपदेशाचे धडे ऐकवू लागतात. काही वर्षांपूर्वी असेच एका नव्या पदाधिकाºयाने आपले वय व क्षमता विसरून ‘डॉ. मनमोहनसिंगांना अर्थशास्त्र कळत नाही’ असे ‘ज्ञानोद्गार’ काढले होते. त्यावेळी याच स्तंभातून त्याला त्याचा व डॉ. मनमोहनसिंग यांचा अर्थक्षेत्रातील अधिकार समजावून सांगण्याचे कटू कार्य आम्हाला करावे लागले होते. आता पुन्हा तीच वेळ भाजपच्या प्रथमच लोकसभेत प्रवेशकर्त्या झालेल्या पूनम महाजन या खासदार महिलेने आमच्यासकट देशातील अनेक संपादकांवर आणली आहे. आपले वडील व भाजपचे एकेकाळचे कमालीचे वजनदार नेते स्व. प्रमोद महाजन यांचे नाव वाजपेयी आणि अडवाणी यांच्यानंतर त्यांच्या पक्षात घेतले जात असतानाही त्यांनी जो अगोचरपणा केला नाही तो त्यांच्या या सुविद्य कन्येने आता केला आहे. मत व अभिव्यक्ती यांचे स्वातंत्र्य देणारे या देशात साहित्यिकांनी व विचारवंतांनी कोणत्या विषयावर लिहावे आणि कशावर लिहू नये हे सांगण्याचे न पेलणारे औद्धत्य त्यांनी केले आहे. बडोद्याला झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना संमेलनाध्यक्षांनी आजच्या घटकेला होत असलेल्या मतस्वातंत्र्याच्या शासकीय व राजकीय गळचेपीबाबत मत व्यक्त करून ‘राजा’ला काही खडे बोल सुनावले. लेखकांनी काय लिहावे, कवींनी कोणत्या रचना कराव्या, चित्रकारांनी कशी चित्रे काढावी, संगीतकारांनी कसे संगीत उभे करावे आणि गायकांनी कसे गावे हे ठरविणे हा त्यांचा घटनादत्तच नव्हे तर जन्मसिद्ध अधिकार आहे. विचारांना राजकारणाचे क्षेत्र वर्ज्य नाही. किंबहुना सारा विचारच राजकारणापासून सुरू झाला अशी आताची स्थिती आहे. काही समाजशास्त्रज्ञांच्या मते ‘पाळण्यापासून समाधीपर्यंत आणि त्याहीपुढे’ राजकारणाचे मानवी जीवनावरचे नियंत्रण कायम असते. साहित्य व संस्कृतीचे क्षेत्रही तेच आणि तेवढेच व्यापक आहे. त्यामुळे ‘तुम्ही आमच्या क्षेत्राताला शिवू नका’ असे एखादा राजकारणी माणूस वा स्त्री साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील अभ्यासकांना व विचारवंतांना म्हणत असेल तर ते त्याच्या किंवा तिच्या अजून राहिलेल्या कच्चेपणाचे लक्षण समजले पाहिजे. लहान तोंडी मोठा घास घेता येतो पण गिळता येत नाही. राजकारणातली माणसे साहित्याच्या व्यासपीठावर जातात. त्यात काँग्रेसपासून भाजपपर्यंतची सारी पुढारी माणसे समाविष्ट असते. प्रसंगी ही माणसे त्या व्यासपीठावर नको तसे बोलतही असतात. त्यांनी तेथे जाऊ नये असे म्हणण्याचा प्रयत्न काही काळापूर्वी झाला. पण तो दोन्ही पक्षी फारसा मनावर घेतला गेला नाही. राजकारणानी केलेल्या गळचेपीविरुद्ध लिहून तुरुंगवासापासून मृत्युदंडापर्यंतच्या सगळ्या शिक्षा ओढवून घेणारे थोर साहित्यिक जगात झाले. समाजकारणातील राजकीय धुरीणांचे रोष ओढवून मृत्यू पत्करणारी माणसे महाराष्ट्रात व कर्नाटकात अलीकडेच झाली. रशिया, चीन, मंगोलिया, अरब देश, द. आफ्रिकेतील राष्टÑे, अनेक हुकूमशाह्या व लष्करशाह्या यातील किती साहित्यिकांनी व कवींनी मानवी जीवनाच्या राजकीय गळचेपीविरुद्ध लिहून स्वत:ला जाचात टाकले याचा इतिहास व त्या इतिहासाने विस्तारलेले राजकीय व सामाजिक स्वातंत्र्याचे क्षेत्र हे नव्या राजकारण्यांनी अभ्यासण्याजोगे आहे. या गळचेपीविरुद्ध लढूनच या देशाने स्वातंत्र्य मिळविले. या गळचेपीविरुद्ध लढा उभारूनच १९७५ ची आणीबाणी देशातून हटविली गेली. या लढ्यात राजकीय नेत्यांएवढेच साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रातील लोकांचे योगदानही महनीय आहे. हे लक्षात न घेता उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे कुणी करीत असेल तर तो वा ती आपल्या प्रतिमेएवढी आपल्या पक्षाची व सरकारचीही प्रतिमा डागाळत असते हे संबंधितांनी लक्षात घेतले पाहिजे. राजकारणात येऊन जरड झालेल्यांना हे सांगण्यात फारसा अर्थ नाही. मात्र त्यातील नवोदितांनी तरी हे वास्तव ध्यानात घेतलेच पाहिजे. अधिकार नसताना केलेले वाचाळपण हे नुसते हास्यास्पदच नाही तर तिरस्करणीय होते हेही त्यांनी समजून घेतले पाहिजे.


Web Title:  Small mouth ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.