आधी वंदू तुज मोरया - दुपारी 2.30 पर्यंत कधीही श्रीगणेशमूर्तीची स्थापना व पूजन केले तरी चालतं

By दा. कृ. सोमण | Published: August 25, 2017 07:00 AM2017-08-25T07:00:00+5:302017-08-25T07:00:00+5:30

आज शुक्रवार, दि. २५ ऑगस्ट रोजी मध्यान्हकाली भाद्रपद शुक्ल चतुर्थी असल्याने आजच पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा व षोडशोपचार पूजा करावयाची आहे. यासाठी विशेष वेळ किंवा मुहूर्त पाहण्याची जरूरी नाही

Shri Ganesh idol can be installed till 2.30 PM | आधी वंदू तुज मोरया - दुपारी 2.30 पर्यंत कधीही श्रीगणेशमूर्तीची स्थापना व पूजन केले तरी चालतं

आधी वंदू तुज मोरया - दुपारी 2.30 पर्यंत कधीही श्रीगणेशमूर्तीची स्थापना व पूजन केले तरी चालतं

Next
ठळक मुद्देगणेशपूजा करताना  प्रथम   संकल्प करून प्राणप्रतिष्ठा करावीनंतर आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य,आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत,गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार या सोळा उपचारांनी षोडशोपचार पूजा करावीश्रीगणपती अथर्वशीर्ष पठण करावे. नंतर आरती करून मंत्रपुष्पांजली मंत्र किंवा पसायदान प्रार्थना म्हणावी. 

वक्रतुण्ड महाकाय कोटीसूर्यसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे देव शुभकार्येषु सर्वदा ।।
        आज शुक्रवार, दि. २५ ऑगस्ट रोजी मध्यान्हकाली भाद्रपद शुक्ल चतुर्थी असल्याने आजच पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा व षोडशोपचार पूजा करावयाची आहे. यासाठी विशेष वेळ किंवा मुहूर्त पाहण्याची जरूरी नाही. प्रात:कालापासून मध्यान्हकाल संपेपर्यंत म्हणजे दुपारी २-३० पर्यंत कधीही श्रीगणेशमूर्तीची स्थापना व पूजन केले तरी चालेल. 
       भारत हा शेतीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यांत शेतामध्ये धान्य तयार होत असते. अशावेळी पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव म्हणजे मातीच्या गणेश मूर्तीचे पूजन करण्यास सांगितले असावे. म्हणून गणेश चतुर्थीला पूजावयाची गणेशमूर्ती ही मातीचीच असावी. गणेशमूर्ती आकाराने लहान असावी. श्रद्धा - भक्ती महान असावी. घरात स्वच्छता करावी. गणरायासाठी फुलांची आरास करावी.
      पूजा करण्यामागचा  उद्देश -- पूजा केल्यामुळे आपल्यात चांगला बदल व्हावयास हवा. मनोबल वाढून निर्भयता प्राप्त 
व्हावयास हवी. शरीर, मन व बुद्धीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी लागणारे सामर्थ्य आपल्यात  निर्माण व्हावयास हवे. निर्व्यसनी व नीतिमान राहण्यासाठी आपल्याला  मानसिक बळ प्राप्त व्हावयास हवे. गरीबाना मदत करण्यासाठी आपल्यात  दातृत्वशक्ती निर्माण व्हावयास हवी. जास्त व योग्य दिशेने मेहनत करण्यासाठी लागणारी मनाची शक्ती आपल्यात  निर्माण व्हावयास हवी, सद्विचारांची व सदाचारी माणसांची संगत लाभण्यासाठीची जाणीव आपल्यात निर्माण व्हावयास हवी. निसर्गावर प्रेम करण्याची संवय आपणास लागावयास हवी. घरात प्रसन्न व संस्कारक्षम वातावरण निर्माण व्हावयास हवे हाच गणेशपूजेचा मूळ उद्देश आहे. क्वालिटी लाइफ हे अपघाताने किंवा दैवाने प्राप्त होत नसते. त्यासाठी कठोर परिश्रमांची, निर्भयतेची आणि कणखर मनाची जरूरी असते. म्हणून पूजा करताना तंत्र-मंत्रांपेक्षा जागृत मानसिकतेची जास्त जरूरी असते. नाहीतर पूजा करणे व्यर्थ ठरते. पूजा केल्याने संकटे आपोआप दूर होत नसतात तर संकटांवर मात करण्यासाठी लागणारे मनोधैर्य आपणास प्राप्त होत असते. अर्थात तेच आपल्या हातात असते. पूजा करीत असताना आपण  सारे दु:ख विसरून जातो. त्यावेळी आपण सात्विक प्रसन्नता आणि समाधान अनुभवत असतो. मग आपण आनंदाच्या क्षणांची वाट पाहत बसत नाही. तर मिळालेला प्रत्येक क्षण आनंदाने घालवू लागतो. त्यामुळे आपण आयुष्यात नेहमीच आनंदी राहतो. तशी आपणास संवयच लागते. म्हणून गणेशपूजा ही भीतीने किंवा जबरदस्तीने करावयाची नसते तर ती आनंदाने, प्रसन्न मनाने, श्रद्धेने करावयाची असते. ईश्वर हा नेहमी क्षमाशील व कृपाळू असतो. गणपती चौदा विद्या चौसष्ट कलांचे दैवत आहे. तो सेनापती आहे. तो बुद्धीमान आहे. तो सामर्थ्यवान आहे. तो जसा राजकारणपटू आहे तसा तो महान मुत्सद्दी आहे. तो मातृ-पितृभक्त आहे. म्हणून त्याचा महान आदर्श आपण डोळ्यांसमोर ठेऊन पूजा करीत असतो. ही एका आदर्शाचीच पूजा असते. 
                  पाप आणि पुण्य यांची सुंदर व्याख्या महर्षी व्यास आणि संत तुकाराम यांनी केली आहे. इतराना त्रास देणे म्हणजे पाप आणि गरीब, गरजूंना मदत करणे म्हणजे पुण्य ! आपण गणेशोत्सव साजरा करीत असताना गरीब, गरजू लोकांना मदत करावी.आपण जीवनात नीतिमान राहून स्वत:चे कर्तव्य प्रामाणिकपणे केले तर तीही ईश्वराची पूजाच असते. 
      गणेशपूजा सामुग्री -- गणेशमूर्ती स्थापन करण्यासाठी लाल रंगांचा पाट, चौरंग किंवा देव्हारा, पूजास्थानाच्यावर आणि प्रवेश दरवाजावर बांधण्यासाठी  आंब्याची डहाळी, कवंडळे, ओल्या सुपार्या,तांब्या-फुलपात्रे, पळी- ताम्हन, उदबत्तीचे घर, कापूरपात्र, धूपपात्र, पंचामृतासाठी कचोळे, निरांजन, समई, नैवेद्य-पात्र, पूजा करण्यासाठी बसावयाचा पाट, पाटावर घालण्यासाठी वस्त्र,पूजेच्यावेळी नेसण्यासाठी स्वच्छ धूतवस्त्र,हात पुसण्यासाठी  एक स्वच्छ पंचा किंवा टॉवेल, घंटा, शंख वगैरे.
        गणेशपूजा साहित्य -- पांढरे आणि रक्त चंदनाचे लाल गंध, शेंदूर, हळद, कुंकू, रांगोळी, अक्षता, अत्तर, तांबड्या रंगाची फुले, दूर्वा , एकवीस दूर्वांची जुडी, कमळ, केवडा, जानवेजोड, कापसाची वस्त्रे, निरांजन वातीचे , तूप, समईसाठी वाती , तेल, उदबत्ती धूप, कापूर, काड्यापेटी, दूध, दही, तूप, मध, साखर, विड्याची पाने, सुपार्या, दक्षिणेसाठी पैसे, नारळ, फळे, प्रसादासाठी मोदक किंवा पेढे, थंड व गरम शुद्ध पाणी वगैरे साहित्य.
          गणेशपूजेसाठी पत्री-- मधुमालती, माका, बेल, पांढर्या दूर्वा, बोरी, धोतर, तुळस, शमी, आघाडा , डोरली, कण्हेर, रूई, अर्जुनसादडा, विष्णुक्रांत, डाळिंब, देवदार, पांढरा मारवा, पिंपळ, जाई, केवडा आणि अगस्ती.
अर्थात गणेशपूजेसाठी लागणारी सामुग्री, साहित्य आणि पत्री सर्वच उपलब्ध होईल असे नसते. जे असते त्यांचा मनोभावे वापर करावा.गणेशपूजा सांगण्यासाठी पुरोहित मिळाले नाहीत तर पूजा गणेशपूजेच्या पुस्तकावरून करावी. कोणतीही चिंता करू नये. हातून काही चूक झाली तरी ईश्वर क्षमा करीत असतो. म्हणून निर्भयपणे श्रद्धेने गणेशाचे पूजन करावयाचे असते. म्हणून पूजा करताना प्रत्येक गोष्ट नीट समजून घेणे गरजेचे आहे. गणेशमूर्तीचे तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे असावे. तसे शक्य नसेल तर कुठेही चालेल. घरात लहान मुले असल्यास गणेशमूर्ती उंचावर ठेवावी. गणेशमूर्ती जवळ आरास करताना थर्मोकोल किंवा प्लॅस्टिकचा वापर करू नये.यासाठी फुलांच्चा किंवा कागदाचा वापर करावा. या काळात काही व्यापारी पेढे व मिठाईत भेसळ करतात. त्यासाठी सावधानता ठेवावी. किंवा नैवेद्यासाठी फळांचा वापर करावा.
       गणेशपूजा करताना  प्रथम   संकल्प करून प्राणप्रतिष्ठा करावी. नंतर आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य,आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत,गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार या सोळा उपचारांनी षोडशोपचार पूजा करावी. श्रीगणपती अथर्वशीर्ष पठण करावे. नंतर आरती करून मंत्रपुष्पांजली मंत्र किंवा पसायदान प्रार्थना म्हणावी. 
       श्रीगणपतीची स्थापना व पहिली महापूजा झाल्यावर दुपारी आपल्या भोजनापूर्वी गणपतीला पवित्र भोजन पदार्थांचा महानैवेद्य अर्पण करावा.  त्या दिवशी रात्रीच्या प्रारंभी स्नान करून धूतवस्त्र नेसून श्रीगणपतीला धूपारती करावी. त्यावेळी गंध, अक्षता, फुले, धूप, दीप हे उपचार अर्पण करावेत. आरती मंत्रपुय्प म्हणून पुष्पांजली वाहावी. दुसर्या दिवसापासून विसर्जनापर्यंत दररोज सकाळी नित्याच्या देवपूजेप्रमाणे श्रीगणपतीची पूजा करावी व भोजनापूर्वी महानैवेद्य अर्पण करावा. तसेच दररोज रात्रीच्या प्रारंभी धूपारती करावी. गणपतीची पूजा महिलांनी केली तरी चालते.
         रोज पूजा झाल्यावर नमस्कार करून घरातील सर्वांनी गणपतीकडे पाहत मन एकाग्र करून पुढील प्रार्थना म्हणावी. किंवा घरातील मोठ्या व्यक्तीने प्रार्थनेची एकेक ओळ म्हणावी नंतर घरातील सर्वानी ती ओळ पुन्हा म्हणावी.
" हे श्रीगजानना, मी माझ्या शरीराच्या व मनाच्या आरोग्याकडे  नीट लक्ष देईन. माझा राष्ट्राभिमान मी नेहमी जागृत ठेवीन. मी नेहमी चांगल्या विचारांची संगत ठेवीन. मी नेहमी नीतिमान राहीन. मी पर्यावरणाची काळजी घेईन. मी माझ्या व घराच्या प्रगतीसाठी नेहमी कार्य करीन. मी सर्वांशी आदराने व प्रेमाने वागेन. मी माझ्यातील आळस, मत्सर, असूया, क्रोध, दुर्बलता दूर ठेवण्याचा प्रयत्न करीन. याप्रमाणे वागण्यासाठी तू मला शक्ती व बुद्धी दे. त्यासाठी तू मला आशीर्वाद दे !"
(दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक आहेत. त्यांचा ई-मेल आयडी dakrusoman@gmail.com )

Web Title: Shri Ganesh idol can be installed till 2.30 PM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.