सांगा देवेंद्रजी, ५१ हजार कोटींच्या वाळूचे काय झाले ?

By राजा माने | Published: November 23, 2017 11:55 PM2017-11-23T23:55:33+5:302017-11-23T23:56:59+5:30

राज्यातील धरणांमधील गाळ काढण्याचे ऐतिहासिक धोरण फडणवीस सरकारने अवलंबिले.

Say Devendra, what happened to the sand of Rs 51 thousand crore? | सांगा देवेंद्रजी, ५१ हजार कोटींच्या वाळूचे काय झाले ?

सांगा देवेंद्रजी, ५१ हजार कोटींच्या वाळूचे काय झाले ?

Next

राज्यातील धरणांमधील गाळ काढण्याचे ऐतिहासिक धोरण फडणवीस सरकारने अवलंबिले. उजनी धरणातही ५१ हजार कोटी रुपये किमतीची गाळमिश्रित वाळू आहे म्हणे!
शोलेचा ‘अरे ओ सांबा’ हा डायलॉग जसा वर्षानुवर्षे गाजला, तसाच १९७० च्या दशकात आपल्या जामखेडचे सुपुत्र, आमचे वात्रटिकाकार नाना अर्थात रामदास फुटाणे व आमच्या सोलापूरचे डॉ. जब्बार पटेल यांच्या ‘सामना’ या सिनेमातील एक डायलॉग असाच गाजला. तो असा, ‘मालक, मारुती कांबळेचं काय झालं?’ मास्तर डॉ. श्रीराम लागू आणि मालक राजकारणी निळू फुले यांच्यातील संवाद जुगलबंदीत एकूण सिनेमाचाच केंद्रबिंदू ठरलेला तो डायलॉग आज आठवण्याचे कारण काय? हा प्रश्न तुमच्या मनात उभा राहिला असेल. तर त्याचे झाले असे की, एका विषयावरून मास्तर ज्या तन्मयतेने आणि निष्ठेने ‘काय झालं?’ हा प्रश्न विचारत होते, तेवढ्याच तीव्रतेने आता सोलापूर जिल्ह्यानेही एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. तो प्रश्न म्हणजे, ‘सांगा मुख्यमंत्री देवेंद्रजी, आमच्या उजनी धरणातील ५१ हजार कोटी रुपये किमतीच्या वाळूचे काय झाले?’ खरेतर हा प्रश्न राज्यातील सर्वच नेत्यांना तसेच नोकरशाहीला विचारायला हवा. पण काहीही महत्त्वाचे असेल तर कुटुंब प्रमुखाला जाब विचारणे हा आपला एक सामाजिक शिरस्ता आहे. त्या शिरस्त्यानुसार राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच तो सवाल!
२०१३ साली जन्म घेतलेल्या या विषयाला आता हात घालण्याचे कारणही तसे मनोरंजकच म्हणावे लागेल. त्या विषयाच्या जन्मावेळी आमचा सोलापूर जिल्हा राजकारणात दंग होता. राजकारणाच्या पलीकडे फारसे महत्त्व दिले जावे अशी कोणाची भावनाही दिसत नाही. त्याच कारणाने केंद्रीय जल आयोगाच्या सूचनेनुसार दिल्लीच्या तोजो विकास इंटरनॅशनल प्रा. लि. या कंपनीने शास्त्रशुद्ध पद्धतीने उजनी धरणातील गाळाचा अभ्यास केला. त्या अभ्यासातून ११७ टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या या धरणाच्या उदरात १५ टीएमसी एवढा वाळूमिश्रित गाळ असल्याचा निष्कर्ष निघाला. त्यातील वाळूची किंमत ५१ हजार कोटी रुपयांहूनही अधिक असल्याचाही शोध त्या अभ्यासातून पुढे आला. वास्तविक त्यानंतर ५१ हजार कोटी या रकमेचा विचार करू जाता जिल्हाच नव्हे तर राज्यातील प्रशासन व राजकारण्यांनी खडबडून जागे होणे अभिप्रेत होते. माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील वगळता कोणीही या विषयाला महत्त्व दिले नाही. तो कुठल्याही कृती वा चर्चेविना भिजत पडला.
उजनी धरणाच्या भूमिपूजनप्रसंगी नवमहाराष्टÑाचे शिल्पकार तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, ‘हे विठ्ठला, तुझी चंद्रभागा तुझ्या अंगणात पंढरपुरात पोहोचण्यापूर्वीच आज आम्ही वारकºयांनी तिला अडवलंय. हे विठ्ठला, आता तू या पाण्यात मिसळून या गरीब शेतकºयांच्या शेतात जा आणि त्यांना सुखी कर.’ विठुरायांनी यशवंतरावजींची इच्छा बºयाच अंशी पूर्ण केल्याची प्रचिती आज येते. राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन करणारा मालदांडी ज्वारीबरोबरच डाळिंब, द्राक्षे अन् सीताफळ उत्पादनातही जागतिक कीर्ती संपादन करणारा जिल्हा ही ख्याती तेच सांगते. उजनी धरण पुणे, अहमदनगरसह सोलापूर जिल्ह्यातील ३१४ गावांमधील ४० लाखांहून अधिक लोकांना पिण्याचे पाणी देते. या पार्श्वभूमीवर ५१ हजार कोटींची वाळू हा विषय खरा की खोटा याचा निकाल लागला पाहिजे. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्रजींना ‘तो’ लाखमोलाचा सवाल!

Web Title: Say Devendra, what happened to the sand of Rs 51 thousand crore?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.